सध्या उत्पादन क्षेत्रातील लघु उद्योजकांची आपले प्रश्न मांडण्याबाबतीत कुठलीही मिटिंग असेल तर त्यातील सगळ्यात जास्त कुठल्या प्रश्नावर चर्चा होत असेल तर तो आहे "आपल्याला माणसं मिळत नाहीत?". मोठी गमतीशीर गोष्ट आहे. एकीकडे १४० कोटी लोकांचा देश आहे असं आपण म्हणतो आणि त्यापैकी ४० ते ४५ कोटी रोजगार करू शकतील अशी तरुणाईची फौज आहे असंही म्हंटलं जातं आणि तरीही आम्हा लोकांचा "चांगली माणसं मिळत नाही" हा धोशा काही सुटत नाही.
इथं खरी मेख आहे. माणसं मिळतात पण "चांगली" माणसं मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे. चांगली म्हणजे रोजगारक्षम. म्हणजे कोण तर निष्ठेने आपल्या कामाप्रती लोक वचनबद्ध असतील असे लोक.
लघु उद्योजकांनी एक गोष्ट आता लक्षात घ्यायला हवी या प्रश्नामागे मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. गेल्या दोन अडीच दशकात झालेला अनेक वेगळ्या क्षेत्रातील उद्योगांचा उदय, त्यांना जे मनुष्यबळ पाहिजे होतं त्यांची विविध अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थामार्फत झालेला पुरवठा, त्यातून तयार झालेलं अर्थकारण, त्या अर्थकारणातून उभ्या राहिलेल्या तथाकथित शिक्षणसम्राट आणि शिक्षणमहर्षीं लोकांच्या शैक्षणिक संस्था, तिथं मिळणारं अत्यंत तकलादू शिक्षण अशी एक विचित्र साखळी तयार झाली आहे. त्याबरोबर प्रश्न उभा झाला आहे तो वर उल्लेख केलेल्या गुणांचा, निष्ठा आणि वचनबद्धता, पूर्णतः अभाव. इंटरनेट च्या माध्यमातून या तरुणाईचं लक्ष ज्या स्वयंविकासाकडे असायला हवं त्यालाच हरताळ फासला जातोय. खर्च वाढण्याचे नवनवीन मार्ग तयार होत आहेत, त्यातून पिअर प्रेशर तयार होत आहे. या सगळ्या घडामोडीतून तयार काय झालं तर मागणीपेक्षा पुरवठा जास्त झालेले, शैक्षणिक आघाडीवर अत्यंत कमकुवत आणि मूळ सिद्धांताच्या कसोटीवर न उतरणारे रोजगारक्षम नसणाऱ्या युवकांची फौज उत्पादनक्षेत्रात धडकू लागली. आणि आपण लघु उत्पादक एका विचित्र कात्रीत अडकलो की माणसाच्या सागरात मात्र आपल्या योग्य माणसे मिळत नाहीत.
आता हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तर एक मोठं सामाजिक स्थित्यंतर घडायला हवं आणि त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छशक्ती हवी. हे तर आपल्या हातात नाही. मग आजच्या घडीला आपल्या हातात उरतं, ते म्हणजे आपण या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काय करू शकतो. खाली काही मुद्दे देतो, त्यावर आपण काम करायला हवं असं माझं मत आहे.
१. सगळ्यात पहिले म्हणजे काही शैक्षणिक संस्थांसोबत आपण सहयोग तत्व अंगीकारायला हवं. म्हणजे आपल्याला आयटीआय, तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी या शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर एकत्रित काम करायला हवं. तिथल्या मुलामुलींना इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट्स आपण द्यायला हवेत. ज्यायोगे तुमच्या व्यवसायाचं, मग भले तो छोटा असेना, होतकरू तरुणाई मध्ये ब्रॅण्डिंग होईल. आणि हे गरजेचं आहे.
२. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रशिक्षण. आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने जी कौशल्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये असावीत असं वाटतं त्यासाठी आपली प्रशिक्षण योजना असावी. आपल्याला तयार माणसे मिळतील अशी परिस्थिती नाही हे वास्तव स्वीकारायला हवं. आपण लघुउद्योजक या महत्वाच्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करतो असा माझा अनुभव आहे.
३. पगारापलीकडे जाऊन आपण आपल्या एम्प्लॉईज साठी काय करतो हे ही आजची तरुणाई बघते. जिथे आपण काम करतो तिथलं वातावरण कसं आहे, स्वच्छता आणि टापटीप आहे का, बाकी कुठल्या सुविधा दिल्या जातात याकडे सुद्धा लघु उद्योजकांनी लक्ष द्यायला हवे. पी एफ, लिव्ह मॅनेजमेन्ट, लिव्ह एनकॅशमेंट, ग्रॅच्युइटी या सारख्या सुविधा द्याव्यात. त्यासाठी २० लोकांच्या हेडकाऊन्ट होण्याची वाट पाहू नये. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी फार खर्च येत नाही.
४. कार्य संस्कृती (वर्क कल्चर) विकसित करायला हवं. कंपनीमध्ये सौहार्दाचे वातावरण असावं. ते तयार करण्यासाठी मूल्याधिष्ठित कार्य संस्कृती रुजवायला हवी. व्यवसायाची भविष्यातील वृद्धी कशी आणि कुठल्या पद्धतीने होणार याबद्दल खुली चर्चा होणे अपेक्षित आहे. कर्मचारी व्यवसायाशी प्रतिबद्ध असण्यासाठी ही कार्य संस्कृती खूप महत्वाचं काम करते.
५. सगळ्यात मुख्य म्हणजे ह्युमन ऍसेट या विभागाला व्यवसायाच्या इतर प्राथमिक विभागाप्रमाणे महत्व द्यायला हवं. बऱ्याचदा उद्योजक ह्युमन असत विभागाला सर्वात कमी महत्व देतो, खरंतर काही जण अजिबात महत्वच देत नाही. खरंतर जितकी काळजी आपण एखादी मशीन विकत घेताना तितकीच, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त काळजी आपण माणसं कंपनीत घेताना घ्यायला हवी.
शैक्षणिक संस्था, समाज आणि आपण लघु उद्योजक हे तीन कोन आहेत, रोजगारक्षम युवक/युवती तयार करण्याच्या त्रिकोणाचे. ऍकेडेमिक आणि समाज त्यांची जबाबदारी कसे पार पाडतील हा त्यांचा प्रश्न आहे. पण आपण या समस्येला कशा पद्धतीने हाताळू शकतो याचे काही मुद्दे वर मांडले आहेत. यापेक्षा अजून काही मुद्दे असतील तर त्यावर काही चर्चा नक्कीच घडू शकते. फक्त त्यावेळेस मानसिकता ही प्रश्नाभोवती फेर धरायची नको तर त्यावर सोल्युशन काय आहे आणि त्यावर काय वेगवेगळे उपाय योजता येतील यावर आपलं लक्ष केंद्रित करायला हवं. कारण इंग्रजी म्हणीप्रमाणे "God help those, who help themselves"