Wednesday, 31 January 2018

जगवते ती लेक

मधुरा आणि टीम ने सादर केलेल्या अभिवाचनाचा गाभा होता लग्न प्रसंग आणि त्यातली मुख्य पात्रं होती मुलगी आणि मुलीचा बाप. गंमत म्हणजे सादर करणाऱ्या आमच्यापैकी कुणालाही मुलगी नाही.

मुलीबद्दलची भावना व्यक्त करणाऱ्या कविता आम्हाला पाहिजे होत्या. नक्कीच असतील, पण आम्हाला सापडल्या नाही. मग मी माझा मित्र अतुल वाघ याला गाठलं आणि त्याला गळ घातली की एखादी कविता लिहिली असशील तर दे. त्याने एक नाही तर एकाहून एक सरस अशा तीन कविता दिल्या. त्यातली  खाली दिलेली कविता मला खूप आवडली. हितेश आणि मीराताईंनी पण एकदम झकास सादर केली. तुम्हालाही आवडेल



झाले भावविश्व संपन्न
हा जन्म स्तोत्र मानून
त्या नात्याची साधक
जगवते ती लेक

चंद्रकलेचे भाग्य
सूर्योदयाची साक्ष
हे दिव्यत्व वैश्विक
जगवते ती लेक

दाटला तो नभ
घोटले ते प्रेम
इरादा तो नेक
जगवते ती लेक

पाहिले ते स्वप्न
हासले ते क्षण
गुंफिला श्वास प्रत्येक
जगवते ती लेक

आठवांचा मोहोळ
भावनांचा कल्लोळ
बुद्धीची द्योतक
जगवते ती लेक