Thursday, 5 July 2018

बेरोजगारी




फ्रेश इंजिनियरच्या बेरोजगारीबद्दल मागे एकदा लिहिलं होतं. त्या संदर्भात अजून काही.

इंजिनियर्सचा तुफान सप्लाय हा नियंत्रणात आला नाही तर ती एक सामाजिक समस्या होणार आहे, किंबहुना झाली आहे. पालक आपल्या मुलासाठी कष्टाने मिळवलेले पैसे खर्च करतात आणि त्याला इंजिनियर बनवतात. त्यांना वाटतं की इंजिनियर साठी ढीगभर जॉब पडले आहेत. बरं या पालकांना आपण हेही सांगू शकत नाही की तुमच्या मुलाला वा मुलीला फर्स्ट क्लास वा डिस्टींक्शन मिळालं म्हणजे फक्त मार्क आले आहेत. आदरवाईज त्यांना इंजिनियरिंग चं अगदी बेसिक नॉलेज पण नाही आहे. या इंजिनियरिंग नावाच्या मृगजळामागे धावू नका हे माझं पालकांना आणि त्यांच्या मुलांना कळकळीचं आवाहन आहे.

अमेरिकेत वार्षिक लाख इंजिनियर्स बाहेर पडतात आणि त्यांच्या इकॉनॉमी ची साईझ आहे १५ ट्रिलियन डॉलर्स. भारताची इकॉनॉमी आहे ट्रिलियन डॉलर्स, आणि तिथे बनतात १५ लाख इंजिनियर्स.


पूर्वी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला घाऊक भावात इंजिनियर्स लागायचे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या कोअर ब्रँच च्या मुलामुलींना इथे जॉब मिळायचे. गेल्या काही वर्षात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र हे ज्या वेगाने वाढलं त्याच्या कैक पटीने इंजिनियर्स मुलं मुली भारतात तयार झाले. 

आणि मग आय टी सेक्टर ने भरमसाठ मुलं मुली घ्यायला सुरुवात केली. ज्या वेगाने त्यांनी इंजिनियर्स घेतली त्याने एके काळी तुटवडा तयार झाला होता. पण अलीकडच्या काही काळात हा वेग मंदावला. आणि जसं हे क्षेत्र विकसित होत गेलं, आय टी क्षेत्रात त्या स्ट्रीमची गरज भासू लागली. एके काळी मिळेल त्या ब्रॅन्चचे इंजिनियर्स नोकरीला ठेवणाऱ्या आय टी कंपन्या आता सिलेक्टिव्ह बनल्या. 

भारतात रोजगार उत्पन्न करणाऱ्या बहुतांश क्षेत्रात इंजिनियर्सची गरज नाही. पर्यटन क्षेत्र, फायनान्स, व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल्स आणि शेती या क्षेत्रात इंजिनियर्स लागत नाही. 

जीडीपीच्या ६०% उत्पादन देणाऱ्या क्षेत्रात इंजिनियर्स लागत नाहीत तरीही आज बऱ्याच युवक युवतींना इंजिनियर व्हायचं आहे. हे भविष्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. 

मागणी कमी आणि सप्लाय जास्त. बरं जो माल बाहेर पडतोय त्याची क्वालिटी चांगली नाही. टॉपची शंभर दीडशे कॉलेजेस सोडली तर बाकी आनंद आहे. आपण कशासाठी इंजिनियर होत आहे त्याचा या पोरापोरींना पत्ता नाही. 

माझ्या तरुण मित्र मैत्रिणींनो आणि त्याच्या पालकांनो, इंजिनियरिंग पदवी ही स्वस्त नाही आहे. तिथले मार्क्स जरी आजकाल स्वस्त झाले असले तरी दहा बारा लाखाचा चुराडा करून ते मिळतात. आणि जेव्हा गरीब पालक हे पैसे खर्च करतात तेव्हा त्यांनी पोटाला चिमटा काढला असतो हे ध्यानात असू द्या. त्यांच्या या कष्टाच्या कमाईला जेव्हा पाय फुटतात त्याला न्याय मिळणार का, यावर सखोल अभ्यास करून निर्णय घ्या. 

एक समाज म्हणून  आपण जर सरधोपटपणे हा मार्ग निवडत असू तर वर्षाला हा देश पैशाचा अपव्यय तर करत आहेच, वर एक ताकदीचं मनुष्यबळ निष्क्रिय करत चाललो आहोत. 

(हे लिहिताना श्री सुनील जेजीत यांच्या  इंग्रजी लेखाची मदत घेतली आहे)