दिवस १:
सुरेखा नर्सच्या इंटरव्ह्यू साठी आली. कामात परफेक्ट वाटत होती. इंटरव्ह्यू मध्ये तिने सांगितलं की तिचा घटस्फोट झाला आहे. दोन लहान मुली आणि ती असे सगळे सुरेखाच्या आईवडिलांकडे राहतात.
दिवस २:
संगीता हॉस्पिटल मध्ये मावशीचं काम मागायला आली होती. लग्न झालं होतं. पण नवरा दुसऱ्या कुणा बाईचा हात पकडून चार वर्षांपूर्वी पळून गेला होता अन गेल्या चार वर्षात त्याने ने बायकोचं तोंड पाहिलं अन दोन लहान पोरीचं. अशिक्षित असल्यामुळे घटस्फोट वगैरे माहितीच नाही. आणि ही सगळी माहिती अगदी स्थितप्रज्ञपणे. कुठं आक्रस्ताळेपणा नाही, चिडचिड नाही.
आम्ही संगीताला विचारलं की पुण्यात राहते कुठे, तर ती म्हणाली सुरेखा कडे. आम्ही विचारलं, मग इथं आली कशी? तर म्हणे काका घेऊन आले, म्हणजे सुरेखाचे वडील.
दिवस २, पुढचा सीन.
तांबे साहेब, सुरेखाचे वडील केबिन मध्ये आले. वय ६०-६२ च्या आसपास. एका पायाला पोलिओ.
सुरेखा आणि तिच्या दोन मुली तर सांभाळतात कारण सुरेखा तर त्यांची सख्खी मुलगी.
संगीता त्यांच्या दुकानात कधी काळी हेल्पर म्हणून कामाला होती. अनेक वर्षे काम केलं. लग्न करून नवऱ्याबरोबर गेली, पण नवऱ्याने टाकली म्हणून मग तांबे साहेबानी तिला घरीच आसरा दिला.
आम्ही विचारलं "सुरेखा, तिच्या दोन मुली. संगीता अन तिच्या दोन मुली. आणि तुम्ही श्री व सौ तांबे. आठ जण घरात. खर्च कसा भागवता?"
तर स्टोरी अशी की, श्री व सौ तांबेंचा दिवस पहाटे साडेतीन ला सुरु होतो. दररोजचं शंभर लिटर दूध विकतात. साडेसहा-सात पर्यंत काम संपतं. आणि मग नऊ वाजता दुकान. ते रात्री आठ वाजेपर्यंत. दररोज १७-१८ तास काम, साठीतले नवरा बायको करतात.
हे सगळं सांगताना कुठला अभिनिवेश नाही, नशिबाला दूषणं नाही, विधात्याबद्दल तक्रार नाही.
माझ्यासारखे लोक काही भौतिकते मध्ये आनंद शोधतात आणि देवाला धन्यवाद देतात. तांबे काका सारखे लोक हे मुळात जीवनाप्रति कृतज्ञ असतात आणि अभौतिक आनंदाचे निधान असतात.
फाळणीकरांनी सुरेखा ला नर्स चं आणि संगीताला मावशीचं काम हॉस्पिटल मध्ये काम दिलं. आणि त्यांच्या चारही मुलींना आपलं घर मध्ये सामावून घेतलं.
फाळणीकरांनी हा निर्णय मला सांगितला तो एक शुभंकर क्षण होता.