खरंतर या विषयावर लिहिणार नव्हतो. पण राहवलं नाही, लिहून टाकतो.
एका एकवीस वर्षाच्या तरुणाला भेटलो आणि जर त्याला मी तरुणाईचा प्रतिनिधी मानलं तर या सोशल मीडियाच्या ओव्हरडोस पायी अनेकांचं वारू भरकटलं आहे की काय अशी शंका मनाला चाटून गेली. दोन प्रॉब्लेम वाटले. एकतर हे ऑनलाईन जोश टॉक्स वगैरेचं प्रमाण जास्त झालं की काय असं वाटून गेलं. टेड टॉक, जोश, स्वयंम वगैरे गोष्टी ऐकायला छान आहेत, पण सर्वच यशस्वी माणसं आयुष्यात काहीतरी अतरंगी निर्णय घेऊनच वर आली आहेत असा एक बेकार गैरसमज तरुणांमध्ये पसरला आहे का, हे तपासायला हवं. आयुष्य खरंतर सोपं आहे. अगदी दोन अधिक दोन चार इतकं. पण काही जण दो और दो पाच करण्याच्या भानगडीत पडतात आणि काही जण तर जिथं बेरीज करायला हवी तिथं आकडे तेच घेऊन गुणाकार करायला जातात आणि फसतात. इन्कम मल्टिप्लाय करायला पाहिजे किंवा एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स हवेत वगैरे गोष्टी बोलायला सोप्या आहेत. पण प्रत्यक्षात आणणं अवघड. आणि मुख्य म्हणजे या गोष्टी तुम्ही विशीत काय बोलताय? या मार्केट मध्ये उभं राहण्यासाठी नॉलेज बेस तर बनवा. हा नॉलेज बेस तुम्ही यु ट्यूब अन फेसबुकवरून जर बनवत असाल तर बेसिक मध्ये घोळ झाला आहे.
एक निर्वाणीची गोष्ट सांगतो, बॉस.
ते भले "You should work smart and not hard" वगैरे टाळ्याखाऊ वाक्य म्हणून ठीक आहे. पण इथं घासावी लागते. ओल्ड स्कुल ऑफ थॉट वाटेल, पण कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे ब्रीदवाक्य कपाळी कोरून ठेवा. कितीही टेक्नॉलॉजी येऊ द्या, पण ती जर परिश्रमाला पर्याय म्हणून तुम्ही वापरात असाल तर एक मोठा खड्डा खणत आहात हे ध्यानात असू द्या. स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करावी लागते. व्यवसाय असो की नोकरी, त्याचे बारकावे काय आहेत हे जाणून घ्यावं लागतात. आज जर तुम्ही कालच्यापेक्षा गुणवत्तेमध्ये सुधारला नसाल तर तुमचा उद्याचा काळ धोक्यात आहे हे सांगायला कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही.
"Find out the job that you love and you dont have to work for a day in your life" या सारखं भंपक वाक्य नाही दुसरं. ते थ्री इडियट मध्ये पहायला आणि ऐकायला बरं आहे. पण वास्तव असं नसतं. तुम्हाला असं मिळालं तर स्वतःला लकी समजा. पण याउलट जे काम मिळालं त्यावर प्रेम करत आयुष्य बनवलं तर स्वतःची पाठ थोपटून घ्या.
अजून एक च्युत्या वाक्य सांगतो. "Why to work for others when you can work for your own". व्यावसायिक बना हो, पण ते होण्यामागे जर हे वाक्य तुमची प्रेरणा असेल तर गंडला आहात तुम्ही. व्यवसायामध्ये अनेक आघाड्या सांभाळाव्या लागतात. कस्टमर, सप्लायर, लोक, बँकर, इन्व्हेस्टर. ही सगळी लोक आपल्याला लागत असतात. आणि जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा हे सर्व पाठीशी उभे राहण्यासाठी खूप पुण्याई कमवावी लागते. जेव्हा सगळं तुमच्या फेवर मध्ये असतं तेव्हा एथिक्स चा एपिटोम गाठावा लागतो. तो जर नसेल आणि तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम तयार झाले तर हिवाळ्यात छत्री ऑफर करणारे लोक धो धो पाऊस असताना सुद्धा छत्री हिसकावून गायब होतात.
तेव्हा भावड्यानो, सोशल मीडिया काही चांगलं चुंगलं वाचण्यासाठी, ऐकण्यासाठी नक्कीच आहे. पण उगाच तिथल्या कहाण्या ऐकून स्वतःचं करिअर प्लॅन करू नका. त्याची सत्यासत्यता पडताळून घ्या. जरी आम्ही पन्नाशीतले लोक येडे वाटलो तरी त्यांच्यातल्या चार लोकांशी बोला. ते सांगतात त्यावर स्वतःचं डोकं वापरा. नांगरे पाटील सर, तांदळे सर, कथळे मॅडम यांच्या स्टोरीज भारी आहेत पण त्याच्या मागे काही खंबीर थॉट प्रोसेस असते. कुणी गावभर हिप्पी सारखं उंडारतं म्हणून तुम्ही पण बोंबलत फिरू नका. त्यांच्या आजच्या स्टेटसला भुलू नका तर त्या प्रोसेस वर काम करा रे बाबांनो.
पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.