मागच्या नोव्हेंबर पासून पोटात दुखत होतं. बरेच उपाय झाले, चांगले डॉक्टर पण झाले. काही दिवस बरं वाटायचं आणि नंतर परत दुखायचं. शेवटी काल एन्डोस्कोपी केली आणि कारण कळलं. थोडं इन्फेक्शन आहे. पण सगळं कंट्रोल मध्ये आहे.
काल काहीतरी निदान झाल्यामुळे आणि त्यावर ठोस उपाय कळल्यामुळे आज सकाळी जरा खुशीतच रेसकोर्सला चालायला गेलो. नेहमीपेक्षा वेग जरा जास्तच होता. पोटात अजूनही दुखत असल्यामुळे जॉगिंग न करता वेगात चालायचं हेच ठरवलं होतं. रेसकोर्सचा राउंड पूर्ण झाल्यावर घरी परत येत असताना एक स्त्री माझ्या मागून जॉग करत आली.
वयाने माझ्यापेक्षा जरा जास्तच असावी. चेहरा घामाने निथळत होता. माझ्याकडे हसत म्हणाली "गुड मॉर्निंग जंटलमन". मी चपापलो. एखाद्या स्त्रीने असं डायरेक्ट ग्रीट केलेलं मला फारसं आठवत नाही. मी पण गुड मॉर्निंग म्हणत त्यांना ग्रीट केलं. अस्खलित इंग्रजीत मला म्हणाल्या "तुझ्यामुळे मी आज इतकं जॉगिंग केलं" माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहत म्हणाल्या "I was trying to beat you entire round of racecourse. Finally, I could beat you now". दोन्ही थम्स अप मी त्यांना काँग्रॅच्युलेशन्स म्हणालो.
"Have a great day ahead" म्हणत त्या त्यांच्या घराकडे वळल्या. मी यु टू म्हणत पुढे निघालो खरा, आणि वळून त्यांना म्हणालो "wish me luck for rest of the year" आता त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. ते बघत मी त्यांना म्हणालो "It was terrible 18 months. Counting every wish to come out of it." आता थम्स अप द्यायची वेळ त्यांची होती. बेस्ट लक माय फ्रेंड म्हणत त्या गेल्या.
जिम ब्रोझ, माझा अमेरिकन मित्र ३१ जानेवारी २०२० ला भारतात होता. तो म्हणाला पण होता त्यावेळी. "करोना बद्दल तुझं काय मत आहे". मी म्हणालो "आमच्या इथं अगोदरच इतके डेडली व्हायरस आहेत, हा करोना आमचं काही करू शकत नाही". पुढच्या अठरा महिन्यात माझ्या त्या स्टेटमेंटच्या धज्जीया उडाल्या. आणि न भूतो न भविष्यती असा उत्मात या चायनीज व्हायरस ने केला. (परवा झूम कॉल मध्ये जिमने माझ्या डायलॉग ची आठवण करून दिली. मी त्याला २४ फेब्रुवारीला ट्रम्प भारतात बागडायला आले होते, त्याची आठवण करून दिली.)
सुदैवी आहोत की आपण जिवंत आहोत. अनेकांनी त्याला तोंड देताना सॉलिड फायटिंग स्पिरिट दाखवलं आहे. आणि नेव्हर गिव्ह अप अटीट्युड सुद्धा. अनेकांनी या काळात आपल्याला व्यवसायाला नुसता जगवलं नाहीतर रॉक सॉलिड पद्धतीने तोलून धरलं. यातून तरलो आहोच तर आता कुठल्याही प्रश्नाला सामोरे जाण्याची ताकद या अठरा महिन्यांनी दिली. कोणतंही सजग मानव्य या काळात अधिक जबाबदार झालं आहे. अवलोकन केलं तर त्याच्या विजिगिषु वृत्तीची जाणीव त्याला सतत होणार आहे.
तुम्हाला ही दिवाळी आणि येणारे वर्ष हे सुखाचे, निरामय आरोग्याचे जावो हीच प्रार्थना