सोशल मीडिया म्हणजे माझ्यापुरतं फेसबुक, लिंक्ड इन, व्हाट्स अप इतक्या पुरतं मर्यादित आहे. या संदर्भांत
मला साधारण तीन प्रकारच्या प्रतिक्रिया येतात.
"राजेश काय चोवीस तास फेसबुकवर पडीक असतो" ही बहुतेकदा माझे नातेवाईक आणि काही प्रत्यक्षातल्या मित्रांची प्रतिक्रिया असते. यात वास्तविकतेपेक्षा हेटाई जास्त असते.
"तुम्ही जे काही लिहिता ते आम्हाला आवडतं." हे फेसबुकवरील मित्र मैत्रिणी आणि लिंक्ड इन चे कनेक्शन व्यक्त होतात. यातही काही जेन्यूईन असतात तर काहींना नाईलाज असतो.
"इतका वेळ कसा काय मिळतो तुला/तुम्हाला?" ही एक बऱ्याच जणांनी विचारलेला प्रश्न. यातही काहींना कुतूहल असतं, काहींना अविश्वास असतो. परवा श्रीपाद घोडके कडे मला तरुणांनी मला हा प्रश्न विचारला.
सोशल मीडिया मॅनेज कसा करतो, यावर लिहा असं काही जणांनी सांगितलं, त्यावर लिहितो. व्हाट्स अप आणि लिंक्ड इन मॅनेज करायला फार अवघड नाही.
व्हाट्स अप वर सहसा चॅटिंग करत नाही. बोलायला अगदीच जमत नसेल तर करतो, ते ही अगदी मोजकं. चॅटिंगचा थ्रेड लांबू लागला की फोन करतो.
वाढदिवस, श्रद्धांजली, सणावाराच्या शुभेच्छा, जयंती, पुण्यतिथी यावर स्वतःहून कुठल्याही ग्रुप वर कधीही लिहीत नाही. पर्सनल मेसेजद्वारे भावना पोहचवतो.
कितीही भारी मेसेज असेल तरीही फॉरवर्ड करत नाही. अगदीच वाटलं तर ओरिजिनल सोर्स वर जातो आणि तिथली लिंक शेअर करतो.
व्यावसायिक असे नऊ ग्रुप आहेत (३ क्रिसलीस, ३ आय एम टी एम ए, १ असोसिएशन, १ ट्रस्टी, १ कंपनी), पर्सनल ६ ग्रुप आहेत. त्यातले तीन फॅमिली चे आहेत ज्याची जास्तीत जास्त मेम्बर संख्या ८ आहे. दोघांचे नंबर वेगळे आहेत. सर्व ग्रुप वर राजकीय, धार्मिक, जातीय धुळवड खेळायला सक्त मनाई आहे. कुठं झालीच तर माझ्या शब्दात सुनावतो आणि ते जर बंद झालं तरच ग्रुपवर थांबतो. नाहीतर ग्रुप सोडतो.
रिझल्ट: सकाळी मोबाईलवर दोन्ही नंबर मिळून साधारणपणे फक्त दहा ते बारा मेसेज असतात.
लिंक्ड इन:
लिंक्ड इन चा वापर फेसबुकपेक्षा रिलेटिव्हली कमी. ते ऑफिसमध्ये बघायची लिबर्टी घेतो. कारण ते बहुधा व्यावसायिक कारणासाठी निगडित असतं. तिथे तसाही फारसा टाईमपास होत नाही.
आता राहता राहिलं फेसबुक:
फेसबुकवर फक्त दोनच ऍक्टिव्हिटी इमानेइतबारे करतो. एक वॉल वर लिहिणे. अगदीच संयुक्तिक कॉमेंट असतील तर त्यांना उत्तर देणे.
फेसबुकच्या दिवसभरातील माझ्या दोन वेळा फिक्स आहेत. एक घरून कंपनीत येईपर्यंत आणि दुसरी कंपनीतून निघाल्यावर घर येईपर्यंत. साधारण दीड पावणेदोन तास. याशिवाय घरातील ऍडिशनल अर्धा ते पाऊण तास. कंपनीतील सव्वानऊ ते संध्याकाळी साडेसहा पर्यंत फेसबुक वापरत नाही. सुट्टीच्या दिवशी घरी फेसबुक जास्त वापरलं जातं. बाकी प्रवासात असेल तर बेधुंद फेसबुक वापरतो. एअरपोर्ट, कार किंवा ट्रेन मध्ये असेल तर कधी पुस्तक तर कधी फेसबुक.
फेसबुकवर सुद्धा कुठल्याही राजकीय, धार्मिक आणि जातीय धुळवडीत सहभाग नसतो. कुठल्याही ट्रेंड मध्ये सहसा सहभागी नसतो. फेसबुकवर कुणी काय लिहावं, कुठले फोटो लावावे, कोण शहाणपणा करतो, मूर्खपणें वागतं याकडे सपशेल दुर्लक्ष करतो. (दोन-तीन पोस्ट पूर्वी लिहिल्या होत्या, त्यानंतर कानाला खडा).
माझा सोशल मीडिया वापरायचा अजेंडा फिक्स आहे. मी टाईमपास साठी येत नाही. समाज प्रबोधन, दुसर्यांना इन्स्पिरेशन वगैरे तर फार लांबच्या गोष्टी आहेत. तो अजेंडा काय आहे, त्याचा वापर काय आणि कसा करायचा याबाबत माझे आराखडे फिक्स आहेत. माझ्या वेळेची किंमत काय आहे मला चांगलं माहित आहे. त्यामुळे इथं जो वेळ व्यतीत करतो, तो फुकट नाही आहे. सध्या इतकंच सांगतो.