Wednesday, 4 January 2023

माझं मन.

आता तसाही शेवट जवळ आलाच आहे. सगळ्या प्रकरणावर एकदाचा पडदा पडणार असं दिसतं आहे. तेव्हा मित्रा, मला जे सांगायचं आहे ते मी स्पष्टपणे सांगून टाकतोच. आणि हे जे मी सांगणार आहे ते पूर्णपणे सजगतेने सांगणार आहे, ज्याबद्दल माझ्या मनात किंचितही संदेह नाही. 

मी सर्वार्थाने परिपूर्ण असं आयुष्य जगलो आहे. इथवर पोहोचण्यासाठी प्रसंगानुरूप अनेक काटेरी मार्गांचा उपयोग केला. आणि त्यापेक्षाही महत्वाचा मुद्दा सांगतो, तो म्हणजे जे मी वागलो ते माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून, जे मला पटतं, तसाच वागलो.

पश्चातापाचे क्षण मी पण भोगले. फारसे नाही आणि ज्याचा आवर्जून उल्लेख करावा असे तर फारच  कमी.  त्या प्रसंगी मला कृतिशील राहणं हे अतीव गरजेचं होतं. सुटका नव्हतीच. मी त्यावर विचारपूर्वक निर्णय घेतले. काळजीपूर्वक एकेक गुंता सोडवत गेलो. त्या उपरही सांगतो, हे सगळं करताना मी फक्त माझ्या मनाचं ऐकलं. 

हो, काही प्रसंग आलेही आयुष्यात, आणि मला माहिती आहे की ते तुझ्याही लक्षात असतील. माझ्या क्षमतेपेक्षा मी मोठी उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याचे फटके ही बसले. पण त्याच्या परिणामांना मी सामोरे गेलो आणि काहींना काळाच्या ओघात मी विस्मृतीत ढकललं. पडलो, धडलो पण पुन्हा उभा राहिलो अन नव्याने घडलो. हे सगळं करताना कौल घेतला तो माझ्याच मनाचा. 

मी जगण्यावर असोशीने प्रेम केलं. कधी हसलो तर कधी रडलो. कधी पराभूताची मानसिकता अनुभवली. कोषात गेलो. पण आता जेव्हा अश्रूच गोठले आहेत तेव्हा तो भूतकाळ मला मोठा विस्मयकारी वाटतो आहे. मला त्यावेळेस घेतलेल्या निर्णयाचा गम अजिबात वाटत नाही आहे. कारण मी केलेल्या कृतीची दिशा माझ्याच मनाने तर दाखवली होती. 

शेवटी मनुष्ययोनीत जन्माला आलोच आहे तर त्यातून काहीतरी भरीव निष्पन्न घडायला नको का? जर भरभरून जगलोच नाही तर अस्तित्वहीन असण्याचा काय उपयोग? लाचारीतून जन्माला आलेल्या शब्दांचा मला सहारा नकोच आहे. सत्य आणि सत्यच बोलण्याचं धैर्य माझ्यात हवं. आणि मला माहिती आहे, याचा मला प्रचंड त्रास झाला आहे, होणार आहे. पण शेवटी माझं मन मला जे सांगतं आहे तेच ऐकायला हवं.  

माझं मन.....त्याचंच बोट धरून तर मी अनेक आव्हानांना सामोरे गेलो आहे. 

फ्रॅंक सिनात्रा च्या माय वे या गाण्याचा गद्य भावानुवाद 



No comments:

Post a Comment