Friday, 28 October 2022

डॉ शंतनू अभ्यंकर

डॉ शंतनू अभ्यंकर आणि माझी तशी जुजबी ओळख. म्हणजे मी त्याला ओळखतो पण तो मला ओळखत नसावा. किंवा ओळखत असला तरी वैभवीचा नवरा म्हणून. मला मात्र या ना त्या कारणाने शंतनू बद्दल माहिती आहे. त्याचा मोठा भाऊ शशांक माझ्या चांगला ओळखीचा. रादर माझं पहिलं व्हिजिटिंग कार्ड शशांकने छापलं आहे १९९४ साली. शंतनू चे सासरे बजाज औरंगाबाद चे उच्चपदस्थ. त्यांच्याही घरी माझं जाणं झालेलं. त्याने होमिओपॅथी करून मग बीजेला ऍडमिशन घेतली ते ही लक्षात आहे. असो, मी शंतनूला ओळखतो हे सांगण्यासाठी ही पोस्ट नाही आहे. तर पोस्ट आहे त्याच्या लेखाबद्दल. 

शंतनूला नुकताच भेटलो होतो डॉ कल्पना सांगळेच्या पुस्तक प्रकाशनाला. आपल्या खुसखुशीत शब्दात त्याने त्या दिवशी भाषण पण केलं. आणि त्यानंतर दीड दोन महिन्यात त्याच्या आजाराचं निदान झालं. लंग्ज कँसर. मी आणि वैभवी पण ऐकून अवाक झालो. काल त्याचा त्या संदर्भांतील लेख वाचला.

ज्यांना कुणाला कँसरबद्दल, किंबहुना कुठल्याही आजाराबद्दल भीती असेल त्याने हा लेख वाचावा. लोक अध्यात्मिक, तात्विक बऱ्याच गोष्टीवर बोलतात. मला वाटतं शंतनू ते जगतोय. ते तो जगतोय हे सांगण्यासाठी त्याला शब्दजंजाळ भाषा वापरावी लागत नाही. त्याने स्वतःचे अनुभव, त्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि एकुणात आयुष्याकडे किती निरपेक्ष भावनेनें बघायला हवं हे त्या लेखातून प्रत्येक वाक्यातून उद्धृत केलं आहे. त्यात फार अलंकारिक भाषा नाही आहे, काहीही अनाकलनीय नाही आहे. इन फॅक्ट एखादा मित्र आपल्या खांदयावर हात ठेवून स्वतःच्याच आजाराबद्दल आपलंच सांत्वन करतोय, त्यातले बारकावे आपल्याला समजावून सांगतोय आणि एकुणात ते सगळं करताना जगण्याकडे किती तटस्थ भूमिकेने बघायला हवं आहे हे सांगतोय. बरं  हे सगळं करताना कुठलाही अभिनिवेश नाही आहे, कुठलीही निराशा नाही आहे. विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांवर कायम विरोधात आहे असा एक समज आपल्याकडे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत शंतनू जे आयुष्य जगतो आहे ते अध्यात्मापेक्षा कमी नाही असं मला वाटतं. तो लेख वाचताना शंतनू बद्दल कणव निर्माण होत नाही, त्याच्याबद्दल रागही येत नाही तर आपण स्तिमित होत तो लेख वाचत संपवतो. 

योगी लोक काय सांगतील ते तुमच्या माझ्या आजूबाजूला वावरणाऱ्या, कुठलाही फॅन्सी ड्रेस न घालणाऱ्या, हातात कमंडलू वगैरे न घेता या संवेदनशील डॉक्टर ने अगदी सहजगत्या सांगितलं आहे. बोरकरांनी म्हंटल्याप्रमाणे "जीवन यांना कळले हो" ही कविता शंतनूला परफेक्ट लागू होते. 

एक किस्सा ऐकला होता. मंदाताई आमटेंनी, विश्वास मंडलिकांना विचारलं होतं म्हणे की "आमचे हे योग वगैरे काही करत नाही, तर तुम्ही समजावून सांगा त्यांना." तेव्हा मंडलिक मंदा ताईंना म्हणाले की "हा माणूसच योग जगतोय, त्यांना वेगळ्या योगाभ्यासाची गरज नाही आहे." शंतनूला ही तुलना कदाचित आवडणार नाही, पण त्याने ज्या पद्धतीने लिहिलं आहे त्यावरून लक्षात येतं की त्याने आपली जीवनप्रणालीच योगशी जुळणारी ठेवली आहे.

हे मी का लिहितोय? शंतनूच्या लेखाची समीक्षा म्हणून, तर नाही. मी मलाच समजावून सांगतोय. माझ्या आणि माझ्या जवळच्यांच्या आजाराच्या बाबतीत मी एक नंबरचा भित्रा. माझे सारेच जण जणू काही अमरत्वाचा पट्टा घेऊन आले आहेत अशा समजुतीत मी असायचो. वयोपरत्वे ती भावना हळूहळू कमी होत चालली आहे. शंतनूच्या लेखाने ती भावना अगदी नाहीशी नाही पण तिचा परिणाम स्वतःवर कमी होण्याची शक्यता तयार झाली आहे.

एकदा मी कार मधून येताना किशोरी ताईचं "आज सजन संग मिलन बनिलवा" ही बंदिश ऐकत होतो. ती पूर्ण झाल्यावर मी आपसूक दीर्घ श्वास घेत नमस्कार केला. माझ्या ड्रायव्हर ने विचारलं "काय हे भजन होतं का?" मी काहीच बोललो नाही. तसाच शांत बसून राहिलो. कारण मला ती बंदिश काय आहे हे आजही माहित नाही, पण जे ऐकलं ते कमाल होतं. शंतनूचा लेख वाचल्यावर मी असाच नतमस्तक झालो. तो लेख मेडिकल जर्नल चा लेख आहे, स्वानुभव आहे, तात्विक आहे किंवा अजून काय आहे ते माहित नाही पण जे आहे ते मेस्मराइज करणारं आहे हे नक्की. 

डॉ शंतनू, तुला हार्दिक शुभेच्छा. बी व्हिक्टोरियस.

राजेश मंडलिक

No comments:

Post a Comment