खरंतर या विषयावर मी आधी लिहिलं होतं, पण पब्लिक मेमरी शॉर्ट असते आणि त्यातही फेसबुकवर लिहिलेलं कुणी सिरियसली घेत नाही. त्यामुळे मध्ये एका पोस्टवर जेव्हा मी भारत आर्थिक बाबींवर सुस्थितीत आहे असं लिहिलं होतं तेव्हा कुणाला तो विनोद वाटला होता किंवा काहींचा त्यावर विश्वास बसला नव्हता.
जे काही मी लिहिणार आहे ते स्टॅटेस्टिक्स हे वेगवेगळ्या कॉन्फरन्स मधून मांडलं गेलेलं आहे. व्यवसायाच्या निमित्ताने मला तिथे हजर राहायला मिळतं आणि तिथून हा डेटा मिळतो. त्याची सत्यासत्यता प्रूव्ह करण्याची जबाबदारी मी टाळणार नाही, पण मी काही बिझिनेस ऍनालिस्ट वगैरे नाही आहे. जे काही मोठी लोक सांगतात ते टिपून ठेवतो.
- भारतासारखे विकसनशील देश हे जागतिक इकॉनॉमी च्या तुलनेत चांगला परफॉर्मन्स देत आहेत. यात भारतासकट साऊथ ईस्ट एशियातील काही देशांचा समावेश होतो.
- भारताचा इन्फ्लेशन रेट हा प्री कोविड वर्षात ३.५% ते ५% दरम्यान होता. पोस्ट कोविड काळात तो ७% पर्यंत पोहोचला आहे. पुढच्या वर्षी तो परत प्रि कोविड लेव्हल ला येण्याची शक्यता आहे म्हणजे ४% च्या आसपास. प्रगत देशांचा इन्फ्लेशन रेट हा प्रि कोविड काळात साधारण पणे १.५% ते २% या दरम्यान होता. पोस्ट कोविड आणि त्यात परत रशिया युक्रेन युद्धामुळे तो १०% पर्यंत पोहोचला आहे. तो सध्या ८.५% ते ९% दरम्यान स्थिरावला आहे. पण तो परत मूळ पदावर येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे असे तज्ञ लोक सांगतात.
- रशिया बरोबरचे राजनैतिक संबंध हा भारताच्या बाबतीत एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. भारत आणि रशिया यांच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अनेक वेळा झाले आहे. त्यात लष्करी सामुग्री शिवाय क्रायोजेनिक इंजिन सारख्या हाय एन्ड टेक्नॉलॉजी चा समावेश होतो. या मैत्रीपूर्ण संबंधामुळे रशिया युक्रेन युद्धात आपण रशियाला विरोध केला नाही आणि त्यामुळे भारताला फ्युएल प्राईस इन्फ्लेशन वर बाकी जगाच्या मानाने चांगलं यश मिळालं. भारतातही इंधनाचे दर वाढले पण रेट ऑफ चेंज हा अनेक प्रगत देशापेक्षा कमी होता.
- भारताचा जीडीपी ग्रोथ रेट हा येणाऱ्या काही वर्षात ७% च्या वर असणार आहे हे माझं नाही तर अनेक फायनान्शियल संस्थांचा कयास आहे. जगात इतका ग्रोथ रेट हा फार कमी देशांचा असणार आहे.
- भारताने आपली बँकिंग प्रणाली ही फार सेफ बनवली आहे. आणि हे आज नव्हे तर अगदी २००३ पासून. आणि त्यामुळेच दोन मोठे धक्के जागतिक अर्थव्यवस्थेला बसले पण भारतीय आर्थिक स्थिती डळमळीत झाली नाही. पहिला धक्का लेहमन ब्रदर्स चा २००९ साली आणि नंतर २०२० चा कोविड. त्या दोन्हीला भारतीय अर्थव्यवस्थेने समर्थ पणे तोंड दिलं आहे.
- आजच्या घडीला कॅपिटल गुड मार्केट साईझ (म्हणजे यात ऑटोमोबाईल, हेवी मशिनरी वगैरे सारखे प्रोजेक्ट येतात) हे साधारण पाने $ ४३.२ बिलियन चं आहे ते २०२६ साली $ १०० बिलियन पर्यन्त जाण्याचं प्रोजेक्शन आहे. मेक इन इंडिया या ड्राइव्ह चा सगळ्यात जास्त फायदा या सेक्टर ला होताना दिसतोय. रेल्वे, डिफेन्स, एरोस्पेस या क्षेत्रात प्रचंड काम भारतीय कंपन्यांना मिळालं आहे. पी एल आय, गतिशक्ती या योजनेमुळे याला सकारत्मक इंधन मिळालं आहे.
- सगळ्यात मुख्य म्हणजे जागतिक मार्केट मध्ये चीन ने आपली विश्वासार्हता गमावली आहे. यात कोविड एक भाग झाला. याव्यतिरिक्त गेल्या दोन एक वर्षातील घडामोडी पाहिल्या तर चीन-तैवान संबंध, सेमी कंडक्टर सप्लाय मध्ये आलेलं अभूतपूर्व शॉर्टेज, श्रीलंका इश्यू, भारताशी घेतलेला राजनैतिक पंगा, त्यांच्या पोलादी पडद्याआड घडणाऱ्या अनेक घटना यामुळे त्यांनी आपली इमेज खराब करून टाकली आहे. याचा अर्थ असा नाही की चीन फार प्रॉब्लेम मध्ये वगैरे आहे कारण त्यांचं अंतर्गत कंझम्पशन खूप जास्त आहे. त्यामुळे "चीन साठी चीन, आणि बाकी जगासाठी भारत" अशी एक प्रतिमा उत्पादन क्षेत्रात तयार झाली आहे. भारताबरोबरच व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया या दक्षिण पूर्व देशांना फायदा होणार आहे.
संधी दाराशी आली आहे. तिचं सोनं करण्यासाठी "उत्पादकता" हा कळीचा मुद्दा आहे. आजच्या घडीला भारताची उत्पादकता ही जगात खूप कमी आहे. यावर जास्त बोलत नाही कारण गाडी मग वेगळ्याच ट्रॅक वर जाईल. फक्त एक माझं मत सांगतो. या संधीचा फायदा उठवण्यासाठी प्रचंड सामाजिक स्थित्यंतर तर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. तसं जर झालं र पुढील ७-८ वर्षे प्रचंड घडामोडीची असणार आहेत.
आंतरराष्ट्रीय जिओ पॉलिटिकल सिस्टम घडामोडी मध्ये आपली पावले बरोबर पडली तर भविष्यात येणाऱ्या अनेक दीपावली समृद्धी घेऊन येणार आहेत, असा अनेकांचा अंदाज आहे. मीही त्याबद्दल आशावादी आहे
No comments:
Post a Comment