Thursday, 30 November 2023

 संजय आणि संदीप एकत्रच इंजिनियरिंग पास आउट झाले. संजय आपला गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील तर संदीपचं घर तालेवार. दोघे जानी मित्र. दोघेही जबरदस्त हुशार. पण स्वभाव पूर्ण वेगळे. संजयची मानसिकता काटकसरी आणि नम्रतेची तर संदीप मोठया गप्पा मारणाऱ्या आणि थोडा आढ्यताखोर. दोघांनाही नोकरी लागली. वेगवेगळ्या कंपनीत. संजय मान खाली घालून इमानेइतबारे जॉब करत राहिला. तर संदीपने पाच  एक वर्षे काम करत व्यवसायात उडी मारली. 

सात वर्षे नोकरी करून संजयने सुद्धा छोटं वर्कशॉप चालू केलं.

संजयची स्टेडी ग्रोथ चालू होती. संदीपचं पण वरवर पाहता दणकेबाज व्यवसाय वाटत होता. संदीप संजयला म्हणायचा सुद्धा "अरे, काय एक दोन रन काढतोस. माझ्यासारखा चौके छक्के मारायला शिक". संजय कसंनुसं फक्त हसायचा. 

संदीपने एकदम फॅन्सी ऑफिस बनवलं आणि मोठी फॅक्टरी टाकली. ऑफिसवर एखाद दोन कोटी रुपये खर्च केले असावे. आलिशान केबिन होती संदीपची. उदघाटन समारंभाला संजय काही बोलला नाही, पण नंतर त्याने एकदा संदीप ला विचारलं "तुला काही सॉलिड ऑर्डर वगैरे मिळाली का, की इतकी मोठी फॅक्टरी आणि फाईव्ह स्टार ऑफिस बनवलं तू?" संदीप त्याला बेदरकार पणे म्हणाला "तुला नाही कळणार हा माईंडसेट. तू आपला दहा बारा हजार स्क्वे फूट मध्ये गोट्या खेळत बस." इतकं बोलून सुद्धा संजय ने मोठ्या मनाने त्याला शुभेच्छा दिल्या. 

दोघे आपापल्या व्यवसायात रमले. 

संजयच्या कानावर संदीप बद्दल काही बाही ऐकायला येऊ लागलं. लोकांचे पैसे बुडवणे, बँकेकडून लोन घेतलं त्याचे हप्ते चुकवणे. एखाद दोन वर्षात संदीपची पार वाताहत झाली. लोकांनी कोर्ट केस केल्या. 

संजय स्वतःहून संदीपला एक दिवशी भेटला. काय झालं ते समजून घेतलं. संजयचा संदीपच्या हुशारी वर विश्वास होता. तो संदीप ला म्हणाला "तुझा खड्डा बुजवण्याइतके माझ्याकडे पैसे नाहीत, पण तुझ्यासाठी मी नवीन बिझिनेस काढतो, तू सांभाळायचा. पैसे कमावून देणेकर्यांचे पैसे चुकवू." आम्ही सगळ्यांनी संजयला खूप धोका पत्करतो म्हणून सांगितलं. पण संजय म्हणाला "दोस्ती आहे, तिला जागावं तर लागणार.". 

व्यवसाय चालू झाला. एकेदिवशी संदीपचे देणेकरी पोलिसांना घेऊन त्याला पकडायला आले. संजय मध्ये उभा राहिला. म्हणाला "एक वर्ष द्या. प्रत्येकाचे पैसे चुकवणार. मी खात्री देतो." संजयचं रेप्युटेशन चांगलं होतंच. देणेकरी परत गेले. 

काल संजयचा मला फोन आला. ज्या सात देणेकर्यांनी संदीप वर पोलीस केस केल्या होत्या, त्यातील शेवटच्या व्हेंडर चे पेमेंट संदीप ने केले. सर्वांनी पोलीस केस मागे घेतल्या. मी अवाक होत, संजयचं अभिनंदन केलं. तर तो म्हणाला "अजून काम संपलं नाही आहे. या वर्षी ज्यांनी केस नाही केल्या पण त्यांचे पैसे देणे आहे, त्यांचे पैसे देणार."

पूर्ण फिल्मी वाटणाऱ्या स्टोरीचा मी साक्षीदार आहे. संजयला मी त्याच्या धैर्याबद्दल, मित्राला मदत करण्याच्या त्याच्या पॅशन बद्दल मनोमन सॅल्युट केला. शेवटी अख्खं कुटुंब त्याने उध्वस्त होण्यापासून वाचवलं आहे. 

Saturday, 25 November 2023

 डीएसके असं म्हंटलं की पुणेकरांना धसका बसतो. पण मी ज्या डीएसके यांची ओळख करून देणार आहे ते आहेत साताऱ्याचे दीपक सुधाकर कुलकर्णी. सॉफ्ट स्किल ट्रेनर ही पहिली ओळख आणि त्यातून झालेली मैत्री. मला आठवतं आहे, माझ्या कंपनीत ट्रेनिंग साठी आले आणि नंतर थोड्या वेळासाठी मला भेटायला आले आणि गप्पा दोन एक तास रंगल्या. नंतरच्या काळात मैत्री वृद्धिंगत होत गेली. त्यांनी शासकीय तंत्र विद्यालयात नोकरी पण केली. दोन एक वर्षांपूर्वी  निवृत्त झाले. आम्ही काही प्रोजेक्ट एकत्र करावा असाही प्लॅन झालेला. पण काही कारणामुळे तो नाही झाला. 

२०१९ च्या सुमारास सातारा आकाशवाणीवर सॉफ्ट स्किल या विषयाला धरून त्यांनी लिहिलेले काही भाग प्रसारित झाले. डीएसके ते मला  भाग नियमित पाठवत आणि घरून कंपनीत जाताना मी ही ते ऐकत असे. ते ऐकताना कधी हलके हसू यायचं तर कधी अंतर्मुख व्हायचो. त्याच प्रसारित झालेल्या भागांचं डीएसके यांनी नुकतेच पुस्तक प्रकाशित केलं "हटके सोचो". 

जी भाषा आकाशवाणीवर प्रसारणसाठी वापरली त्याच भाषेत पुस्तक लिहिलं गेलं आहे. त्यामुळे ते फार शब्दजंजाळ न होता सोप्या भाषेत उतरलं आहे. पुस्तकाचा खरा वाचकवर्ग हा मराठी तरुण आहे. शेतीचा कौटुंबिक व्यवसाय सोडून मुलं शहरात नोकरीची कास धरायला येतात आणि इथल्या वातावरणाने बुजून जातात. या नवीन वातावरणात जुळवून घेण्यासाठी काय करायला हवं हे डीएसके यांनी सहजपणे सांगितलं आहे. एक गाव...एक गणपती सारखी स्फोटक वाक्य आहेत पण त्याचा फार वाद होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी पुस्तकात पेरली आहेत. सॉफ्ट स्किल्स हा पुस्तकाचा गाभा असला तरी ते नागरिकशास्त्राचं पुस्तक झालं आहे आणि त्याची एकुणात आपल्या सगळ्यांना किती गरज आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. 

"हटके सोचो" या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच श्री अच्युत गोडबोले आणि श्री लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पार पडलं.

पुस्तक सगळ्यांनी वाचावं असंच झालं आहे पण छोट्या गावातून शहरात येऊन करिअर चालू करणाऱ्या युवा वर्गाने आवर्जून वाचावं. ते वाचल्यावर ते लेखकाबद्दल "डीएसके, मनातलं दडपण नाहीसं करणारा माणूस" असं म्हणतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 

काल उल्लेख केलेलं कांचन दीक्षित यांचं "टाईम अँड सेल्फ मॅनेजमेंट" आणि कुलकर्णी यांचं "हटके सोचो" या दोन्ही पुस्तकांचे विषय आवडते. त्या दोन्ही प्रकाशनवेळी लेखक द्वयींनी आणि प्रकाशकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आनंद वाटतो.