डीएसके असं म्हंटलं की पुणेकरांना धसका बसतो. पण मी ज्या डीएसके यांची ओळख करून देणार आहे ते आहेत साताऱ्याचे दीपक सुधाकर कुलकर्णी. सॉफ्ट स्किल ट्रेनर ही पहिली ओळख आणि त्यातून झालेली मैत्री. मला आठवतं आहे, माझ्या कंपनीत ट्रेनिंग साठी आले आणि नंतर थोड्या वेळासाठी मला भेटायला आले आणि गप्पा दोन एक तास रंगल्या. नंतरच्या काळात मैत्री वृद्धिंगत होत गेली. त्यांनी शासकीय तंत्र विद्यालयात नोकरी पण केली. दोन एक वर्षांपूर्वी निवृत्त झाले. आम्ही काही प्रोजेक्ट एकत्र करावा असाही प्लॅन झालेला. पण काही कारणामुळे तो नाही झाला.
२०१९ च्या सुमारास सातारा आकाशवाणीवर सॉफ्ट स्किल या विषयाला धरून त्यांनी लिहिलेले काही भाग प्रसारित झाले. डीएसके ते मला भाग नियमित पाठवत आणि घरून कंपनीत जाताना मी ही ते ऐकत असे. ते ऐकताना कधी हलके हसू यायचं तर कधी अंतर्मुख व्हायचो. त्याच प्रसारित झालेल्या भागांचं डीएसके यांनी नुकतेच पुस्तक प्रकाशित केलं "हटके सोचो".
जी भाषा आकाशवाणीवर प्रसारणसाठी वापरली त्याच भाषेत पुस्तक लिहिलं गेलं आहे. त्यामुळे ते फार शब्दजंजाळ न होता सोप्या भाषेत उतरलं आहे. पुस्तकाचा खरा वाचकवर्ग हा मराठी तरुण आहे. शेतीचा कौटुंबिक व्यवसाय सोडून मुलं शहरात नोकरीची कास धरायला येतात आणि इथल्या वातावरणाने बुजून जातात. या नवीन वातावरणात जुळवून घेण्यासाठी काय करायला हवं हे डीएसके यांनी सहजपणे सांगितलं आहे. एक गाव...एक गणपती सारखी स्फोटक वाक्य आहेत पण त्याचा फार वाद होणार नाही अशा पद्धतीने त्यांनी पुस्तकात पेरली आहेत. सॉफ्ट स्किल्स हा पुस्तकाचा गाभा असला तरी ते नागरिकशास्त्राचं पुस्तक झालं आहे आणि त्याची एकुणात आपल्या सगळ्यांना किती गरज आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही.
"हटके सोचो" या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच श्री अच्युत गोडबोले आणि श्री लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पार पडलं.
पुस्तक सगळ्यांनी वाचावं असंच झालं आहे पण छोट्या गावातून शहरात येऊन करिअर चालू करणाऱ्या युवा वर्गाने आवर्जून वाचावं. ते वाचल्यावर ते लेखकाबद्दल "डीएसके, मनातलं दडपण नाहीसं करणारा माणूस" असं म्हणतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
काल उल्लेख केलेलं कांचन दीक्षित यांचं "टाईम अँड सेल्फ मॅनेजमेंट" आणि कुलकर्णी यांचं "हटके सोचो" या दोन्ही पुस्तकांचे विषय आवडते. त्या दोन्ही प्रकाशनवेळी लेखक द्वयींनी आणि प्रकाशकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आनंद वाटतो.
No comments:
Post a Comment