Friday 14 June 2024

 पुणे-मुंबई-पुणे करायचो त्या दिवसाची गोष्ट आहे. त्या दिवशी ठाण्यात काम होतं. ते झालं की मी पाच ची कर्जत लोकल पकडायचो आणि कर्जतला सात च्या सुमारास डेक्कन क्वीन यायची, ती पकडायचो. त्या दिवशी ठाण्याला बसलो. दिवसभर काम करून दमल्याने लोकल मध्ये लागलीच झोप आली. जाग आली तेव्हा अंबरनाथ स्टेशनवर गाडी उभी होती आणि खिडकीतून बघतो तर काय डेक्कन क्वीन सुसाट निघाली होती. आमची लोकल काही कारणाने लेट झाली होती आणि तिला सायडिंग ला टाकून डेक्कन ला पुढे काढलं होतं. कर्जत ला नक्कीच डेक्कन चुकणार होती. भूक लागलेला मी डेक्कन च्या बेक बीन्स-टोस्ट आणि कॉफीच्या भरवशावर होतो. नंतर ची सह्याद्री, घरी पोहोचायला अकरा वगैरे माझ्या डोळ्यासमोर आलं आणि माझ्या तोंडून शब्द पडले "आयची कटकट, गयी भैस पानीमे". लोकल मध्ये शेजारी एक म्हातारे गृहस्थ बसले होते. त्यांनी काय झालं म्हणून विचारलं. मी सांगितलं की माझी डेक्कन चुकणार. ते शांत बसले. खिडकीत पाहत होते. दोन मिनिटाने माझ्याकडे बघत म्हणाले "तुला डेक्कन मिळणार. ही लोकल कर्जतला पोहोचेपर्यंत डेक्कन सुटणार नाही." मी मनात म्हणालो "काका येडं बनवतात आपल्याला". शब्द तोंडात नाही आले पण चेहऱ्यावर दिसलं माझ्या. ते पाहून काका माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले "विश्वास ठेव माझ्यावर, मिळणार डेक्कन तुला". मधल्या कुठल्या स्टेशनवर ते उतरून गेले. मी सह्याद्रीने जायचं असं मनाला समजावलं. 


कर्जत स्टेशनवर लोकल पोहोचली तर आश्चर्य, डेक्कन क्वीन तिथं उभी. बरं योगायोग किती? तर इतर वेळेस एक नंबर प्लॅटफॉर्म वर उभी असणारी डेक्कन आज दोन नंबर वर आणि माझी लोकल तीन नंबर ला. म्हणजे दादरा चढायची पण गरज नाही. आणि त्याही पेक्षा कहर म्हणजे पास होल्डरची चेअर कार माझ्या लोकल डब्याच्या बरोबर समोर. मी उतरलो, डेक्कन मध्ये बसलो, मला सीट पण मिळाली आणि बरोबर दोन मिनिटात डेक्कन सुटली.

आज मी सिनसिनाटी वरून सॅनफ्रान्सिस्को ला चाललो होतो. डॅलस ला स्टॉप ओव्हर होता. माझी सिनसिनाटी- डॅलस फ्लाईट एक तास लेट झाली. पुढची फ्लाईट पकडायला मला वेळ फक्त २० मिनिटांचा असणार होता. तिथली क्रू म्हणाली की फ्लाईट चुकणार तुझी. नेमकी ती शेवटची फ्लाईट होती आणि मला ती म्हणाली की दुसऱ्या दिवशी सकाळी सातची फ्लाईट घ्यावी लागेल. राहायची सोय तुमची तुम्हाला करावी लागेल, फार तर डिस्काउंट देऊ हॉटेल रेंट मध्ये. असं काही व्हायची माझी पहिलीच वेळ. त्या क्रू ला म्हणालो "मला पाच मिनिटे दे". मी खुर्चीवर विचार करत बसलो होतो. शेजारी एक सत्तरीचा माणूस बसला होता ज्याने बहुतेक माझं संभाषण ऐकलं होतं. मला म्हणाला "काळजीत दिसतो आहेस". मी त्याला सांगितलं. तो मला म्हणाला "डोन्ट वरी. तुझी पुढची फ्लाईट पण डिले होणार आहे आणि तू रात्रीच सॅन फ्रान्सिस्को ला पोहोचशील. उद्या सकाळची फ्लाईट वगैरे घेण्याच्या भानगडीत पडू नको."

मी त्यांना विचारलं "आर यु शुअर?". ते गृहस्थ म्हणाले "बेशक". मी ऐकलं त्यांचं. आणि मनाचा हिय्या करून बसलो. डॅलस ला पोहोचलो आणि मला मेसेज आला की माझं पुढचं फ्लाईट पाऊण तासाने लेट झालं आहे. 


हे असं आहे. प्रवासात असे आशीर्वाद देणारे देवदूत भेटतात आणि डेस्टिनेशनला व्यवस्थित पोहोचतो.