Friday, 13 March 2026

 काही वर्षांपूर्वी मी एक व्हिडीओ बघितला होता. ख्रिश्चन लग्नामध्ये मुलीचे वडील, फादर समोर मुलगा-मुलगी एकमेकांना स्वीकारण्याआधी,  एक छोटं भाषण देतात. मला त्या वडिलांची कमाल वाटली. कारण त्या भाषणात विनोद होता, भावना होत्या, अभिमान होता, प्रेम होतं. आणि हे सगळं म्हणताना वडील एकदम कुल होते. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून मला ते ब्रिट वाटले. त्यांचं भाषण मराठीत लिहिण्याचा मोह आवरत नाही आहे. 

वडील म्हणतात 

"फिलिप, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. सगळ्या चांगल्या गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने चालू होतात तशी ही पण चालू होते."

"काही वर्षांपूर्वी एक माणूस असतो जो चांगला बाप ही असतो आणि एव्हाना तुला हे कळलंच असेल की तो बाप म्हणजे मीच आहे. तर त्याला एक मस्त मुलगा असतो आणि कुटुंब एकंदरीत आनंदात असतं. एकेदिवशी मला कळतं की माझी बायको पुन्हा एकदा प्रेग्नन्ट झाली आहे आणि लवकरच एक बाळ आमच्या घरात येणार आहे. मग मी देवाकडे प्रार्थना केली. त्याला म्हणालो "देवा, खरंतर सगळं तुझ्यामुळे घडतं. पण येणारं बाळ जर मुलगी असेल तर माझ्यावर कृपा होईल." देवाने माझी प्रार्थना ऐकली. त्या छोट्या परीला मीच माझ्या कुशीत घेतल्यावर मला अपार आनंद झाला."

"मी त्या एंजल कडे बघत अजून एक प्रार्थना केली की "देवा, तिला तिच्या आईसारखं बनव" देवाने माझी ती ही प्रार्थना ऐकली. माझी मुलगी तिच्या आईप्रमाणे अतिशय लाघवी, प्रेमळ, सर्वांची काळजी घेणारी अशी मोठी होत होती. पण मग माझ्या लक्षात आलं की या मायलेकी माझ्याकडे लक्षच देत नव्हतं. मग मी देवाकडे प्रार्थना केली की "देवा, तिच्यात माझा थोडा तरी अंश उतरू दे." आणि गंमत म्हणजे देवाने माझी ती पण प्रार्थना ऐकली. तुला सांगतो ती ट्रक पण चालवते आणि ट्रॅक्टर सुद्धा. ती गवताचा भारा उचलून ट्रॉली मध्ये सहजपणे लोड करते आणि मनात आलं तर तंबाखू पण चघळू शकते. तुला लक्षात येत आहे की कुठला झंझावात तू गळयात अडकवून घेतो आहेस ते." 

"हे सगळं होत असताना तिचं एक स्वतःचं भावनाशील व्यक्तिमत्व घडत होतं, तिची भवतालाबद्दल मतं तयार होत होती, आणि तिची बुद्धी विकसित होत होती. मग देवाकडे पुन्हा प्रार्थना केली "आता पुरे. तू खूप तिच्यावर उपकार केले आहेस. आता अजून एक प्रार्थना. तिला तुझ्यासारखं बनव." आणि काय सांगू तुला,  त्याने ते ही ऐकलं. त्याने तिला लोकांची सेवा करण्यासाठी प्रवृत्त केलं. ती रुग्णांची सेवा करणारी परिचारिका बनली. ती हे काम अत्यंत प्रेमाने करते. तिने अनेकांना आपल्या सेवाभावी वृत्तीने यमाच्या दारातून अक्षरश: खेचून परत आणलं आहे. आणि अनेकांनी तिचा हात आपल्या हातात धरून शांतपणे या पृथ्वीवरून एक्झिट पण घेतली आहे. तिने या कामात स्वतःला झोकून दिलं आहे. ते करण्यासाठी तिने अनेक दिव्य कामं केली आहेत. त्यासाठी जगभर फिरली आहे, डोंगर चढून गेली आहे, रौद्र स्वरूप असलेल्या नदीच्या पात्रात छोट्या बोटीने तिने प्रवास केला आहे आणि युद्धभूमीवर आजूबाजूने बुलेट्स जात असताना जमिनीवर झोपून आपलं रुग्णसेवेचं कर्तव्य बजावलं आहे. तिच्या या वागण्यातून जगात अजून एक सुप्रीम शक्ती आहे याची जाणीव होते."

"हे सगळं छान असलं तरी काहीतरी मिसिंग आहे असं मला वाटत आहे. मी देवाकडे पुन्हा, आणि कदाचित शेवटची प्रार्थना केली "माझ्या मुलीवर सुखाचा वर्षाव कर" मग तू तिच्या आयुष्यात आलास. तुला भेटल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसतो. त्याबद्दल मी विधात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आज मी माझ्या जवळ असणारी सगळ्यात मौल्यवान गोष्ट तुझ्या हातात सोपवत आहे. पण ते करण्याआधी मला तुला सांगायचं आहे की विधाता आणि मी, आम्ही दोघांनी ती आजच्या दिवसासाठी अशी सुंदर बनावी म्हणून अथक प्रयत्न केले आहेत."

"फिलिप, आज माझ्या कन्येचा हात तुझ्या हातात सोपवताना, तुझी हरकत नसेल तर एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे.  मी आणि विधाता असे दोघेही तिच्या पाठीशी आहोत.  तेव्हा तिच्याशी अजिबात पंगा घेऊ नकोस."