Thursday, 12 April 2018

रोजगार लायकी

परवा आयटीआय ला टेक्निशियन मुलं घ्यायला गेलो होतो. पंचवीस कंपन्या हजर होत्या. अन मुलं आली होती दहा. तिथले ऑफिसर सांगत होते, टाटा ग्रुप ला २५० मुलं पाहिजेत, पण मिळत नाही आहेत.

आयआयटी च्या मुलांचं पण लागलीच प्लेसमेंट होत असावं.

म्हणजे थोडक्यात आयटीआय ते आयआयटी चेन मध्ये वांदे झालेत ते डिप्लोमा आणि बीई मुलांचे.

याला काही कारणं आहेत. 

एकतर इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक उदंड झाले आहेत. आणि त्यातून तयार होणाऱ्या लोकांची क्वालिटी संशयतीत आहे. डिप्लोमा मुलं तर अक्षरशः कुठलाही जॉब करायला तयार असतात. काम कुठलंही चांगलं, पण घेतलेल्या शिक्षणाला न्याय देणारं तर असावं. जी कामं आय टी आय टेक्निशियन करू शकतो तीच कामं डिप्लोमा वा ग्रॅज्युएट इंजिनियर ने करण्यात काय मतलब आहे. हेल्परचं काम मागायला येतात हो. वाईट वाटतं. 

त्यात सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस इंडस्ट्री वाल्या मंडळींनी ही मुलं पळवायला चालू केली. कोअर ब्रँच करायची आणि की बोर्ड बडवत बसायचा, याला काय अर्थ आहे. फक्त मॅथ्स शिकल्यामुळे लॉजिक चांगलं या एका क्वालिफिकेशन वर प्रोग्रामर बनत गेले आणि कोअर विसरत गेले. पोरांची भौतिक स्थिती सुधारली पण शैक्षणिक विषमता तयार झाली. 

आम्ही इंडस्ट्रीवाल्यानी सुद्धा यावर तात्पुरते उपाय योजले. जे मिळतात ते घ्या. आणि अजून कमी पगार देऊन घ्या. आणि मग त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी लेव्हलचं काम द्या. 

पोरं पोरी सुद्धा सुखनैव जीवनाला चटावले. त्यांनीही धोंडा पाडून घेतला पायावर. आता तिथे अनिश्चितता तयार झाल्यावर साळसूदपणे म्हणतात "I want to make career in core". 

एकंदरीत एकेकाळी ज्या इंजिनियरिंग साखळी चा बोलबाला होता, त्याचं आज हसं झालंय. त्या चेन मधील डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट ह्या सगळ्यात कमजोर कडी आहेत. आणि या अधोगतीला समाजातील प्रत्येक घटक, अगदी तुम्ही, मी, शिक्षणसम्राट, इंडस्ट्रीवाले, हे सगळे जण कारणीभूत आहेत. 

आपल्याकडे बेरोजगारी या प्रश्नापेक्षा रोजगारासाठी लायक युवक उपलब्ध आहेत का, हा मोठा प्रश्न आहे. 

Friday, 23 March 2018

नितीन कारंजकर

नितीन कारंजकर, बंट्या म्हणायचो आम्ही त्याला. नासिकच्या सीडीओ मेरी शाळेचा माझा क्लासमेट. त्याचं  नाव घेतलं की  त्याचा मला कडक ऑन ड्राइव्ह आठवतो आणि रनिंग बिटवीन विकेट. खो खो मध्ये पण सॉलिड होता तो. रादर कुठल्याही मैदानी खेळात बंट्याची लेव्हल वरची असायची.

गणितात पण किडाच तो. त्याच्या बरोबर अभ्यास करायला मिळावं म्हणून मी शाळेत नेहमीच धडपड करायचो.

एकंदरीत रोल मॉडेल होता तो माझा. हेवाच वाटायचा मला त्याच्या बुद्धिमत्तेचा आणि त्याच्या फिटनेसचा.

दहावीला आमची मैत्री आणिक घट्ट झाली. वि भा देशपांडेंच्या क्लासला एकत्र जायचो. वेळ मिळेल तसा टेबल टेनिस आणि बॅडमिंटन खेळायचो. सीडीओ च्या ग्राउंडवर अभ्यासाबरोबरच बाकीही भरपूर गप्पा व्हायच्या. दहावीला तो वर्गात तिसरा आणि गणितात पहिला आला. गणितात मला बंट्याइतकेच मार्क मिळाले म्हणून काय ग्रेट वाटलं होतं!

बंट्याचं वाचन अफाट होतं. आम्ही अधाशासारखी पुस्तकं वाचून काढायचो. आयुष्यात मी जर कधी चोरी केली असेल तर ती बंट्याबरोबर लायब्ररीतल्या पुस्तकांची. वाचनाचा झपाटाच तसा  होता. पुस्तकं इमानेइतबारे परत नेवून पण ठेवली. 

दहावीला मी औरंगाबादला गेलो. डिप्लोमा साठी. तो पुण्याला आलं. पॉलिटेक्निक मध्ये त्याचं काय बिनसलं माहित नाही पण एका वर्षात तो नासिकला आला आणि त्याने अकरावीला ऍडमिशन घेतली. बारावीला कचकावून मार्क काढले अन तो सीओईपी ला सिव्हिलला जॉईन झाला. मी सुद्धा पुण्यात भारती विद्यापीठात आलो. आमची मैत्री पुन्हा बहरली. नाशिकहून पुण्यात आलेल्या आमचा एक ग्रुप बनला. नतावाडीला नामदेव शिंपी समाजाचं हॉस्टेल होतं. तिथं राहायचा तो. वेळोवेळी भेटलो, फिरलो, गप्पा मारल्या, टवाळक्या केल्या. 

इंजिनियर झाल्यावर बंट्या नासिकला करिअर घडवायला गेला अन मी पुण्यातच राहिलो.

नंतर काय घडलं ते कळलं नाही पण लौकिकार्थाने आयुष्यात सगळे जसे सेटल होतात तसा बंट्या नाही झाला. का कुणास ठाऊक पण त्याने लग्न केलं नाही. जॉब न करता त्याने कॉन्ट्रॅक्टरशिप चालू केली. धंदा तो करत होता पण ज्याला धंद्याचा मौसम म्हणतात तो त्याने अनुभवला नसावा. थोडा तुटक पण झाला होता तो.

अर्थात आमची मैत्री बरकरार राहिली. म्हणजे नाशिकला मी गेलो अन बंट्याला भेटलो नाही असं क्वचितच व्हायचं. एक तास का होईना, त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिस मध्ये चहा प्यायचो, जिवाभावाच्या गोष्टी करायचो अन मग पुण्याला निघायचो.

आता मात्र मी नासिकला गेलो की बंट्याला नाही भेटणार, म्हणजे भेटू नाही शकणार.

काल, बंट्या उर्फ नितीन कारंजकर गेला. रस्त्यात आडव्या आलेल्या माणसाला वाचवताना तो पडला आणि त्याला हेड इंज्युरी झाली. एका आठवड्याची झुंज संपली. त्याबरोबर एका मित्राला मुकलो. माझा एकेकाळचा आयडॉल अनंतात विलीन झाला.

आय विल मिस यु मित्रा.

आणि खरं सांगू मित्रा, तुला जे आयुष्य लाभलं त्यापेक्षा तुझी पत खूप जास्त होती. तुझं आयुष्य बनवताना त्या विधात्याचं काहीतरी चुकलंच. . . . . . . . . . . . आणि मृत्यू देताना सुद्धा.

ला

Tuesday, 20 March 2018

एक इनोव्हेशन इंडेक्स म्हणून प्रकार असतो. ब्लूमबर्ग नावाची संस्था आहे, ज्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला हा रिपोर्ट सबमिट केला आहे. त्या इंडेक्स मध्ये खालील देशाचा समावेश आहे. आणि तो का, याचं कारण पण दिलं  आहे.


१. साऊथ कोरिया: साऊथ कोरियाच्या पर कॅपिटा उत्पादन क्षमतेसाठी त्यांना पहिला क्रमांक मिळाला आहे.

२. स्वीडन: स्वीडन मध्ये ग्रॅज्युएट होणाऱ्या लोकांची संख्या जगात सर्वाधिक आहे. (पर कॅपिटा)

३. सिंगापुर: त्यांची शिक्षण पद्धती ही  जगात वाखाणली जात आहे.

४. जर्मनी: हाय टेक स्टार्ट अप चं सध्या जर्मनी मध्ये उधाण आलं आहे.

५. स्वित्झर्लंड: मूलभूत संशोधनाच्या जगातल्या सर्वोत्तम प्रयोगशाळा या देशात आहेत.

६. जपान: मिड साईझ कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर इनोव्हेशन, पर्यायाने पेटंट्स मिळवत आहेत.

७. फिनलँड: या देशाच्या सरकारने ज्ञानाधिष्ठित उपक्रमांची विधेयकं पास केली आहेत.

८. डेन्मार्क: रिनेव्हेबल एनर्जी (सोलार, विंड, टायडल एनर्जी वगैरे) या क्षेत्रात जगातील सर्वोत्तम टेक्नॉलॉजी डेन्मार्क कडे उपलब्ध आहे.

९. फ्रान्स: या देशाच्या सरकारने डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी इनोव्हेशनला मदत करण्यासाठी १३ बिलियन डॉलर्स चा इन्व्हेस्टमेंट फंड उभा केला आहे.

१०. इझ्राएल: मूलभूत संशोधनासाठी (आर अँड डी) जगात सगळ्यात जास्त गुंतवणूक या देशाने केली आहे.


या लिस्ट मध्ये येण्यासाठी तुमच्या देशात काय पाऊलं उचलली जात आहेत?

विकसित देश  या गोष्टींमुळे बनतो राजा!

Monday, 12 February 2018

स्वगत

मला तुझ्यातला सर्वोत्तम तू पाहायचा आहे.

जेव्हा विधाता माझ्या अपेक्षेपेक्षा माझ्यावर जास्त वर्षाव करतो तेव्हा आत्मसंवाद काहीतरी वेगळं सांगत असतो.

जेव्हा आपल्या मनासारखं घडत नसतं, खूप प्रयत्नांती अपयश दिसतं, तेव्हा एकाग्रतेने काम करत गाडी रुळावर येण्याची वाट पाहण्याशिवाय आपल्यासाठी काय उरतं?

आत्मवंचना तर हे सांगत असते की "अरे आज इतकं आनंदी का वाटतंय? काही चुकलं का आयुष्यात?"

कधी कधी असं वाटतं की आयुष्याची गती इतकी हळू का आणि मग मन घुटमळत राहतं आपण घेतलेल्या योग्य आणि अयोग्य निर्णयाभोवती, आणि वास्तव आ वासून उभं राहतं.

स्वप्नवत बदल आपल्याला खुणावत राहतात पण आपण भौतिक सुखासीनतेची आस धरतो.

दोन पावलं पुढे तर एक मागे. तेच प्रयत्न. अविरत. येणाऱ्या वादळाला तोंड देण्यासाठी. 

भविष्यात खुश राहण्यासाठी वर्तमानाची सत्य परिस्थिती हाताळताना भूतकाळातील अनुभवाचा आसरा घेतो. 

मेंदू आणि मन यातील बरोबर कोण हे ठरवताना बऱ्याचदा मानसिक स्वातंत्र्याचा त्याग करावा लागतो. 

एखाद्या गोष्टीवर झोकून दिलं की भव्य दिव्य होण्याची शक्यता निर्माण होते. 

तू जो आहेस तसाच रहा, विटेवर वीट चढवत जा. अक्षरश: 

- स्वगत




Wednesday, 31 January 2018

जगवते ती लेक

मधुरा आणि टीम ने सादर केलेल्या अभिवाचनाचा गाभा होता लग्न प्रसंग आणि त्यातली मुख्य पात्रं होती मुलगी आणि मुलीचा बाप. गंमत म्हणजे सादर करणाऱ्या आमच्यापैकी कुणालाही मुलगी नाही.

मुलीबद्दलची भावना व्यक्त करणाऱ्या कविता आम्हाला पाहिजे होत्या. नक्कीच असतील, पण आम्हाला सापडल्या नाही. मग मी माझा मित्र अतुल वाघ याला गाठलं आणि त्याला गळ घातली की एखादी कविता लिहिली असशील तर दे. त्याने एक नाही तर एकाहून एक सरस अशा तीन कविता दिल्या. त्यातली  खाली दिलेली कविता मला खूप आवडली. हितेश आणि मीराताईंनी पण एकदम झकास सादर केली. तुम्हालाही आवडेल



झाले भावविश्व संपन्न
हा जन्म स्तोत्र मानून
त्या नात्याची साधक
जगवते ती लेक

चंद्रकलेचे भाग्य
सूर्योदयाची साक्ष
हे दिव्यत्व वैश्विक
जगवते ती लेक

दाटला तो नभ
घोटले ते प्रेम
इरादा तो नेक
जगवते ती लेक

पाहिले ते स्वप्न
हासले ते क्षण
गुंफिला श्वास प्रत्येक
जगवते ती लेक

आठवांचा मोहोळ
भावनांचा कल्लोळ
बुद्धीची द्योतक
जगवते ती लेक

Thursday, 21 December 2017

उपद्व्याप

ते मुखपृष्ठ प्रकाशकांनी मंजूर केलं आणि मी आधाशासरखं ते फेसबुकवर शेअर करून टाकलं. (ते ठीक आहे, पण पुस्तक लिहून झालंय  का, की फक्त कव्हरच बनवलं आहे).

तर शेवटी हे पुस्तक तयार झालंय. पोस्टवरच्या कॉमेंट्समधून काही मित्र पुस्तक काढ म्हणून सुचवायचे. मला स्वतःला ते काही झेपायचं नाही. कारण पुस्तक लिहायचं म्हणजे एक कमिटमेंट लागते. ती देता येईल की  नाही याबद्दल मी साशंक होतो. टायटनचे एमडी भास्कर भट आणि मायक्रोसॉफ्ट इंडिया चे पहिले एमडी रवी वेंकटेशन यांच्यावर लेख लिहिल्यावर मीरा सिरसमकर यांनी फोन करून सांगितलं की या लिहिण्यात पुस्तक बनण्याची ताकद आहे. त्यावेळेस पहिल्यांदा मला असं वाटलं की हा पण उद्योग आपण करावा. ही तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. मनात आलं आणि नेहमीप्रमाणे मी विसरून गेलो. २०१६ संपताना मात्र दोघांचा अगदी कळकळीचा फोन आला. एक, सदानंद बेंद्रे आणि दुसरे अण्णा वैराळकर. दोघांनी सांगितलं की हे तू जे लिहितो आहेस ते संग्रही ठेवण्यासारखं आहे. पुस्तक नाहीतर पुस्तिका काढ. अण्णांजवळ मी माझ्याच लिहिण्याच्या साहित्यिक मूल्यांविषयी साशंकता व्यक्त केली. ते म्हणाले "तुला काही मापदंड प्रस्थापित करायचा आहे का? जे लिहिलं आहेस ते छाप. बाकी लोकांवरती सोड"

याच सुमारास मंगेश आणि सानिका वाडेकर, जे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत, मला येऊन भेटले. सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मी ब्लॉगचे लेख आणि बाकी अनुभव लिहीत हे पुस्तक पूर्ण केलं. थोडक्यात पुस्तकाचा ६०% कन्टेन्ट तुम्ही कधीतरी वाचला आहे. फक्त त्यात सुसुत्रता नव्हती. आता एका फ्लो मध्ये ते मी लिहून काढलंय. सानिका वाडेकर यांचाही हा पहिलाच प्रयत्न पूर्ण पुस्तक बनवण्याचा. त्यांचे मिस्टर मंगेश वाडेकर हे या व्यवसायात बरेच वर्षांपासून आहेत. त्यांनी सानिका वाडेकर यांना हे पुस्तक त्यांच्या मनाप्रमाणे काढायला पूर्ण मुभा दिली असावी.

ऋणनिर्देश करायचाच म्हंटलं तर मी सगळ्यात पहिले माझ्या बिझिनेसचं नाव घेईल. सेटको स्पिंडल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (जुनं नाव: अल्ट्रा प्रिसिजन स्पिंडल्स प्रायव्हेट लिमिटेड). या बिझिनेसच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रत्येकाने मला काहीतरी शिकवलं आहे. मग ते कंपनीमध्ये काम करणारे माझे सहकारी असो, ग्राहक असो वा सप्लायर. मी व्यावसायिक नसलो असतो तर कदाचित हे पुस्तक लिहिलं नसतं.

आणि दुसरं नाव घेईल, ते तंत्रज्ञानाचं. ते नसलं असतं तर हा ब्लॉग नसता, फेसबुक नसतं आणि मग तिथे भेटलेले मित्र नसते, त्यांचे मेसेजेस नसते. आणि आता हे पुस्तक झाल्यावर सुद्धा फेसबुकमुळे संपर्कात आलेल्या मित्र मैत्रिणींनी मदत केली. पाहिलं प्रूफ रिडींग मीरा सिरसमकर यांनी केलं, जयंत विद्वंस याने ते पूर्ण वाचून काही सूचना केल्या, अमेरिकेतून शिल्पा केळकर ने खूप महत्वाची सूचना केली जिने पुस्तकाला चार चांद लागले, दत्ता जोशींनी पण अशीच एक अत्यंत महत्वाची चूक दाखवून दिली जी मी यथाबुद्धी दुरुस्त केली. पुस्तकाची प्रस्तावना देखील फेसबुकमधून संपर्कात आलेल्या एका इंडस्ट्रीच्या दिग्गजाला लिहायची विनंती केली आहे. ती येईलच. सानिका आणि मंगेश वाडेकर हे सुद्धा मला इथेच भेटले.

पुस्तकाचं मुखपृष्ठ हे सचिन दायमे यांच्या स्केलक्राफ्ट कंपनीतील कोमल केदार या मुलीने बनवलं आहे.

पुस्तक लवकर झालं ही असतं, पण बिझिनेस सांभाळताना फक्त रविवारी वेळ मिळाला आणि काही दिवशी संध्याकाळी  ७ ते ९, ते ही पुण्यात असेल तेव्हा. त्यामुळे ते रखडलं जरा, पण झालं शेवटी.

ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात ते पब्लिश होईल. प्रकाशनाची जागा, वेळ यथावकाश  येईलच.

पुस्तकाची किंमत आणि इतर कमर्शियल गोष्टी प्रकाशक सांगतीलच. (मी पुस्तक लिहून काढलं आहे, बाकी तुम्ही बघा बुवा.)

हे सगळं होऊन, प्रकाशन होईपर्यंत हे आता कवित्व चालू राहील. झेला थोडे दिवस.

बाकी तुम्ही मित्रत्वाच्या नात्याने चार गोष्टी ऐकून घेतल्या. हा उपद्व्याप पण सहन करा.

"पार्कातल्या कविता"

कालची संध्याकाळ अद्भुत गेली. स्वरूपा आणि नंदूचा "पार्कातल्या कविता" हा कार्यक्रम पु ल देशपांडे गार्डन मध्ये होता. कार्यक्रम विंदांना समर्पित होता. मला निमंत्रण होतं. विंदांच्या कविता मला आवडतात अन हे स्वरूपा ला माहीत आहे.

आठ  ताकदीचे कवी/कवियत्री होते. अन सगळ्यांनी नितांत सुंदर कविता पेश केल्या. काही गझल, मुक्तछंद, गेय कविता हे कवितेचे वेगवेगळे फॉर्म सादर झाले. सुप्रिया जाधव, निर्मिती, वैभव देशमुख यांना आधी ऐकलं होतं. बाकीच्यांना पहिल्यांदाच ऐकलं.

आणि मग नंदूने माझ्या नावाचा पुकारा केला. विंदांच्या कविता सादर करण्यासाठी. स्वरूपा ने निमंत्रण देताना थोडी कल्पना दिली होती. पण इतक्या तालेवार कवी/कववीयत्रीच्या मांदियाळीत मी खरं तर दबकलोच होतो. समोर म भा चव्हाण बसले होते, दत्तप्रसाद रानडे होते आणि त्यांचे वडीलही होते. बरं मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वाला माणूस. फार तर उद्योजकतेवर बोलणारा. कविता म्हणाल तर एक हौस म्हणून वाचतो. लोकांच्यासमोर म्हणाल तर खर्डेघाशीच्या एका कार्यक्रमात म्हंटलेल्या. पण ते आपले सगळे मित्रच.

इकडेतिकडे विखुरलेलं अवसान गोळा करत तीन कविता सादर केल्या. "माझ्या मना बन दगड", "असा मी कसा मी" आणि "तेच ते तेच ते". सुदैवाने तिन्ही कविता मला पाठ आहेत. लोकांना आवडल्या. अन मलाही आवडल्या.

नंतरचे पंचेचाळीस मिनिटं मात्र चांदण्यांची बरसात होत गेली. पहिले म भा चव्हाण सरांनी एकच पण वडिलांवर अफलातून कविता सादर केली.

आणि मग दादा रानडे, जे वयाने सत्तरीच्या घरात असतील,  यांनी पुढील अर्ध्या तासात कवितेच्या हर एक फॉर्मचा एकेक दागिना पेश केला, त्याने सारेच मुग्ध झालो. जागा सोडून त्यांचे कधी त्यांचे पाय धरले हे कळलंच नाही.

समारोप उत्तेकर यांनी तन्वीर सिद्दिकी च्या अत्यंत समर्पक कवितेने केला.

नंदूने कार्यक्रमाचा फ्लो मस्त मेंटेन केला.

तरंगत घरी आलो.

रात्री झोपल्यावर बरेच वर्षांनी कंपनी, बिझिनेस याव्यतिरिक्त वेगळीच स्वप्नं पडली.

अशी स्वप्नं अधूनमधून पदरात पाडून घ्यावी.

छान वाटतं.