Sunday 30 April 2017

Passion

काही शब्दांचा आपण असा खतरनाक वापर करतो की त्याच्या अर्थाचा पार अनर्थ होऊन जातो. महाराष्ट्राच्या राजकारणात एक शब्द आहे "अस्मिता" किंवा आपल्या फेसबुकवर "भक्त". हे दोन्ही शब्द आजकाल ऐकले की मळमळायला होतं. 

तसा व्यवसाय विश्वात एक शब्द घाऊक भावात वापरला जातो. अन तो म्हणजे पॅशन. "You should have passion". "I am passionate about it" "Being passionate is important quality to be successful". 

पार कॉलेज च्या चिल्यापिल्या पासून ते अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला कुठलाही व्यावसायिक हा शब्द एकदम आरामात वापरून टाकतो. 

तो शब्द इतका स्वस्त नाही आहे. मराठीत गुगल वर त्याला समानार्थी शब्द आहे, आवड. पण मग त्याला इंग्रजीत liking पण म्हणू शकतो. 

पॅशन म्हणजे आवडी बरोबर कल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याची प्रचंड इच्छाशक्ती ठेवणं. किती इच्छा शक्ती? तर ती गोष्ट केल्यावर आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकतं अशी शक्यता दिसत असली तरीही त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं. एखादी संकल्पना डोक्यात आली तर तन, मन वापरून ती प्रत्यक्षात यावी म्हणून धडपड करणं. आणि काही कारणामुळे त्यात अपयश आलंच, तर पुन्हा उठून त्या कल्पनेचे इतस्ततः पसरलेले तुकडे जोडून तिला प्रत्यक्षात आणणं. ह्याला म्हणतात पॅशन. एखाद्या गोष्टीचा आर्थिक परतावा काय असेल याचा विचार न करता ती गोष्ट अत्यंतिंक सेवभावाने करणं म्हणजे पॅशन. 

एका गृहस्थाला आम्ही कॉलेज मध्ये भाषणासाठी निमंत्रित केलं होतं. सगळं ऐकून त्यांनी पटकन हो म्हंटलं. मी म्हणालो "सर, ते मानधनाबद्दल बोलू यात" ते म्हणाले "तुम्हाला काय द्यायचे ते द्या. नाही दिले तरी चालेल. विद्यार्थ्यांशी संवाद साधणं ही माझी पॅशन आहे." सरांचं भाषण तुफान झालं. आम्ही मानधन दिलं. ते तर नंतर दिलं. ते मिळेल की नाही याची शाश्वती नसताना त्यांनी शतप्रतिशत दिलं, ती पॅशन. असाच अनुभव एका लेखिकेकडे मला नुकताच आला. तो योग्य वेळी सांगेल. 

आणि यातील परकोटीचं उदाहरण म्हणजे सैनिक किंवा हिमालयात एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक, अफाट समुद्रात विश्व प्रदक्षिणा करणारे नाविक, तो ऑस्ट्रेलियातला साहसवीर. इथे आपण आर्थिक नुकसान म्हणतोय, तिथे तर जीव जायची शक्यता असते. तरीही लोक ते धाडस करतात. म्हणून त्यांचं पॅशन जास्त उदात्त, उन्नत. 

माझ्यासाठी पॅशन हा शब्द बेशकिमती आहे. त्याला मी अत्यंत जपून वापरतो. त्या शब्दांभोवती एका उत्कट भावनेचं कोंदण ल्यालेलं असतं. ते तुटू नये याची काळजी घ्यायला हवी.

No comments:

Post a Comment