Tuesday, 24 December 2019

बिल

आज मी पुण्यापासून साधारण ३००-३५०किमी लांब एक गावी कस्टमर कॉल साठी आलो होतो. एक मिटिंग झाल्यानंतर दुसऱ्या मिटिंगच्या आधी लंच करण्यासाठी ब्रेक घेतला. कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट ने मिटिंग मधील एका ज्युनियर ला मला जेवायला बाहेर घेऊन जायला सांगितलं. माझ्या बरोबर आमचाही एक तरुण इंजिनियर होता.

जेवण झालं, बिल आलं. आता तो माझ्याबरोबर आलेला मुलगा इतका तरुण होता की त्याने माझं बिल भरावं हे काही मला पटत नव्हतं, जरी कॉल वर आलेल्या सप्लायरला एक कर्टसी म्हणून लंच ऑफर केलं असलं तरीही. म्हणून मी आग्रह करून बिल भरून टाकलं. त्यात सप्लायर-कस्टमर किंवा मी लांबून आलो आहे म्हणून दिलेली कर्टसी हे काहीही मनात नव्हतं तर केवळ वडीलकीच्या भावनेतून बिल देऊन टाकलं.

हॉटेलच्या बाहेर मी कस्टमरची वाट बघत असताना जे मी पाहिलं त्याने मात्र व्यथित झालो. त्या यंग मुलाने हॉटेल मालकाकडून अजून एक बिल बनवलं, कारण तसंही त्याची कंपनी ते अप्रुव्ह करणार होती.

मध्ये इंडस्ट्री आणि कॉलेज प्रोफेसर्स यांच्यात एक मिटिंग झाली ज्याचा मी भाग होतो. नवीन इंजिनियर्सकडून इंडस्ट्री च्या काय अपेक्षा आहेत यावर बोलायचं होतं. मी तिथे हेच सांगितलं की आम्हाला टेक्निकल नॉलेज थोडं कमी असेल तरी चालेल पण व्हॅल्यू सिस्टम मात्र तगडी पाहिजे. कामाप्रति निष्ठा, प्रामाणिकता, शंभर टक्के जबाबदारी हे गुण ठासून भरले पाहिजेत.

आमच्या कंपनीत असं एकदा घडलं तेव्हा हेच सांगितलं की या इनमिन ५०० रुपयांच्या बिलानी कंपनी गरीब होत नाही हे नक्की पण क्लेम करणारे कधी थोडे पैसे कमावतील पण संपन्न कधीही होऊ शकणार नाही.

संपन्नता ही फक्त आणि फक्त कठोर परिश्रमाने आणि प्रयत्नवादी असणाऱ्या लोकांना वश होते आणि त्यांच्या हातून जे सुटतं ते बाकीच्यांचा हाताला लागतं. 

Sunday, 22 December 2019

भावेश भाटिया

निराशेच्या गर्तेत अडकलं असताना एखादया व्यक्तीला आपण ऐकतो आणि ते मळभ असं दूर होतं, तसंच काहीसं झालं, श्री भावेश भाटिया यांना ऐकल्यावर.

मेणबत्ती सारखा तसा स्वस्त आयटम. त्यात ते करतात कैक कोटींचा टर्नओव्हर. जगातल्या ६७ देशात त्यांचं प्रॉडक्ट निर्यात होतं. हजारो व्यक्तींना सोबत घेऊन जाणारी सन राईज कँडल ची वाटचाल प्रेरणादायी आहे. त्यांच्या कंपनीत शंभर पेक्षा जास्त लोक काम करतात.

कंपनी सारखी कंपनी. मग त्यात विशेष असं काय? तर यातला आश्चर्यकारक भाग हा आहे की श्री भावेश भाटिया हे पूर्णपणे अंध आहेत. आणि वर उल्लेख केलेल्या शंभर पैकी ऐंशी लोक पण अंध आहेत.

कथा फारच उद्बोधक आहे त्यांची. हातगाडीवर त्यांनी मेणबत्ती विकायचा बिझिनेस चालू केला आणि गेल्या अडीच दशकाच्या वाटचालीत त्यांनी तो वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.

आणि भावेशजींचं आयुष्य म्हणजे सुरस आणि चमत्कारिक घटनांनी भरलेलं आहे. टुरिस्ट म्हणून महाबळेश्वर ला आलेल्या गडगंज श्रीमंत असणाऱ्या निताजींशी त्यांचं झालेलं लग्न, अंधत्व आलेलं असताना नागपूर नेपाळ नागपूर असा सायकलवर केलेला प्रवास, खेळण्याची आवड जी आजारपणामुळे सुटली होती ती परत पंचविशीत जोपासली आणि गेल्या दोन दशकात गोळाफेक या क्रीडाप्रकारात पॅरा ऑलिम्पिक मध्ये तब्बल ११७ पदकं, देशभरातल्या आठ विद्यापीठाकडून डी लिट ही पदवी, आणि तीन वेळा राष्ट्रपती पुरस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तुमच्या पर्यंत पोहोचवण्याची विलक्षण वक्तृत्व कला. स्वरचित अशा असंख्य शेरोशायरीतून त्यांनी जो प्रवास उलगडला त्याने हॉल मधील १५० जण अचंबित झालो.

भावेशजींच्या झळाळत्या कारकिर्दीला अजून चार चांद लागू देत आणि त्यांनी जे अंध लोकांना काम देऊन मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचं महत्वाचं काम चालू केलं आहे त्यात त्यांना यश मिळू दे याच मनःपूर्वक शुभेच्छा