काही लोकांच्या शब्दकोशात "नाही" हा शब्दच नसतो. त्यांच्यासमोर आव्हान उभं करायचं, मग त्यासाठी नियतीची मदत घ्या की मानवनिर्मित असू द्या, त्याच्याशी दोन हात करायला माणूस सदैव तत्पर. अहमदनगरचे उद्योजक श्री सुनील कानवडे हे याच प्रकारात मोडणारे.
बँक ऑफ बडोदा मध्ये सुनील चे वडील कर्मचारी आणि त्यांची पत्नी गृहिणी, अशा मध्यमवर्गीय कुटुंबात सुनीलचा जन्म झाला. दहावी पर्यंतचे शिक्षण त्याचं अहमदनगर ला झालं. आणि त्यानंतर १९८३ साली तो शासकीय तंत्रनिकेतन औरंगाबाद येथे यांत्रिकी पदविका पूर्ण करण्यासाठी रुजू झाला. याच कॉलेज मध्ये मीही त्याचा सहाध्यायी होतो. पहिल्या वर्षापासूनच सुनीलने अभ्यासात सुनीलने आपली छाप पाडली. अर्थात तो अभ्यासही तुफान करायचा. १९८६ ला जेव्हा आम्ही पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला तेव्हा शेवटच्या वर्षी सुनील आमच्या वर्गात पहिला आला. का कुणास ठाऊक पण आम्हा औरंगाबादच्या मुलांना पश्चिम महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक मधील मुलांपेक्षा त्या काळात गुण कमी पडायचे. त्यामुळे प्रथम क्रमांक येऊनही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात त्या काळात सुनीलला प्रवेश नाही मिळाला. आणि नुकत्याच चालू झालेल्या खाजगी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची सुनीलची इच्छा नव्हती. त्यामुळे सुनीलने सरळ बजाज ऑटो मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला. १९८३ च्या सुमारास चालू झालेल्या बजाज ऑटो औरंगाबाद मध्ये अभियंत्याची गरज होती आणि आमच्या औरंगाबादच्या कॉलेज ची मोठी बॅच तिथे ट्रेनी इंजिनियर म्हणून काम करू लागली.
सुनीलच्या अंगभूत हुशारीला आता मेहनतीची जोड मिळाली आणि अगदी थोड्या काळात तो बजाज ऑटो मध्ये एक हुशार आणि डायनॅमिक मेंटेनन्स इंजिनियर म्हणून ओळखला जाऊ लागला. डिप्लोमा नंतर त्याला इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला नव्हता हे सुनीलच्या मनात ठसठसत होतं. प्रचंड शारीरिक श्रम करणाऱ्या सुनीलने अजून कमर कसली आणि मग केवळ तीन वर्षात म्हणजे १९८९ साली त्याने एएमआयई ची अवघड परीक्षा उत्तीर्ण केली. कदाचित त्याच सुमारास त्याच्या मनात आपला उद्योग असावा असे विचार फेर घालू लागले होते. उद्योजक बनायचं असेल तर कॉमर्स चं ज्ञान हवं म्हणून मग एएमआयई बरोबर तो बीकॉम च्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. बजाज ऑटो मध्ये सुनीलचा पोर्टफोलिओ हा मेन्टनन्स चा होता. मग त्यात अजून प्राविण्य मिळावं म्हणून म्हणून मग १९९२ साली त्याने मेंटेनन्स ची अभियांत्रिकी पदविका मिळवली. आणि १९९४ साली त्याने आपल्या शैक्षणिक पदव्या मध्ये एक मानाचा तुरा रोवला. त्यावर्षी त्याने डिझाईन हा अवघड विषय घेऊन एम टेक पूर्ण केलं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं करत असताना त्याची बजाज ऑटो मधील कारकीर्द ही पूर्ण भरात होती. तिथे काम करताना त्याचं शिक्षण कधी आड येत नव्हतं. परीक्षा सोडल्या तर सुनील ने सुट्ट्या कधी घेतल्या नाहीत.
बजाज ऑटो मध्ये काम करत असतानाच सुनील मधील उद्योजक हा सतत डोकं बाहेर काढत होता. १९९६ साली सुनील ने नोकरीचा राजीनामा दिला आणि श्रीराम उद्योगाची स्थापना केली. दहा वर्षे त्याने मेंटेनन्स डिपार्टमेंट मध्ये जीवतोड मेहनत केली होती अन त्याचाच धागा पकडून सुनील मशीन शिफ्टिंग च्या व्यवसायाने आपल्या उद्योगविश्वाची मुहूर्तमेढ रोवली. हे काम तसं अवघड. वेगवेगळे रिसोर्सेस लागतात. शिवाय प्रचंड मेहनत. पण सुनील ने या क्षेत्रात एक विश्वासार्ह कंपनी म्हणून नाव कमावलं. पुढे हेच काम करताना त्याची एक्सईड बॅटरी त ओळख झाली आणि त्यांचे "लेड" मटेरियल मधून पार्टस बनवण्याची संधी सुनीलला मिळाली.
आज जवळपास अडीच दशकांच्या अथक मेहनतीतून, आपल्या हुशारीच्या जोरावर श्रीराम उद्योगाचं रोपट्याने चांगलंच मूळ धरलं आहे. पुढे सुनीलने सिद्धी स्टॅम्पिंग, अस्पायर मोल्डिंग, सिद्धी इंडस्ट्रीज अशा उद्योगांची स्थापना केली आणि आज हे सर्व उद्योग यशस्वी रित्या घोडदौड करत आहेत. सिद्धी स्टॅम्पिंग मध्ये लार्सन अँड टुब्रो या प्रसिद्ध कंपनीच्या एका स्टार्टर चं कॉन्ट्रॅक्ट उत्पादन होतं. म्हणजे या कंपनीतच लार्सन अँड टुब्रो चा शिक्का बसून पॅकिंग होतं आणि ग्राहकाला सप्लाय केलं जातं. अस्पायर मध्ये स्पेशल टुलिंगची निर्मिती केली जाते. नुकताच सुनील ने प्रेशर कुकर बनवण्याचा एक प्रोजेक्ट जन्माला घातला आहे आणि ते प्रॉडक्ट लवकरच बाहेर पडेल.
अशा धडपड्या सुनीलच्या उद्योजकतेचा कळसाध्याय मात्र या करोना काळात गाठला गेला. करोनाची साथ सुरु झाली आणि मार्च च्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधानांनी आवाहन केलं की मास्क जरूर वापरा आणि काही कारणाने तो उपलब्ध नसेल तर कमीत कमी "गमचा" (मोठा रुमाल) तरी वापरा. या आवाहनामागे असलेली कळकळ आणि संधी सुनील ने ताडली आणि त्याने मास्क बनवण्याची मशिनरी बसवून मास्क चं उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. काम जोखमीचं होतं कारण करोना मुळे जगभर व्यवहार ठप्प होते आणि मशीन तर आयात करायची होती. आर्थिक गुंतवणूक होती. पण सुनील आपली सारी व्यावसायिक कौशल्ये वापरून त्या अवघड काळात वेगाने पहिली पूर्ण स्वयंचलित मास्क बनवण्याची लाईन विक्रमी वेळात टाकली आणि उच्च गुणवत्तेच्या मास्कची निर्मिती अहमदनगर मध्ये चालू झाली. इतकी वर्षे व्यवसायात असल्यामुळे सुनीलचे जगभरात ग्राहक आणि सप्लायर्स आहेत. त्याच नेटवर्किंग मधून त्याला मास्क निर्यात करण्याच्या ऑर्डर्स मिळाल्या. आणि जेव्हा हे मास्क देशात आणि परदेशात अत्यंत वाजवी दरात पुरवू शकतो हे लक्षात आल्यावर सुनीलने लगेच उत्पादन वाढवण्याचा धाडसी निर्णय घेतला. एका स्वयंचलित उत्पादन लाईनच्या पहिल्यांदा पाच आणि त्या पुढच्या दोन महिन्यात अजून पाच अशा एकूण अकरा मास्क उत्पादनाच्या स्वयंचलित लाईन्स चालू केल्या. आज अहमदनगर मध्ये सुनील कानवडे यांच्या फॅक्टरीत दिवसाला दहा लाख मास्क बनतात आणि त्या देशातल्या जनतेला करोनापासून दूर राहण्यासाठी मदत करतात. हे करत असतानाच निर्यातीमुळे परकीय चलन हे देशात येतं.
आज सुनील कानवडे सारखे उद्योजक हे देशाच्या उत्पादन क्षेत्राचा महत्वाचा कणा आहे. सगळ्यात जास्त प्रगतीशील आणि रोजगार निर्माण तयार करणाऱ्या एसएमई क्षेत्राचा सुनील प्रतिनिधी आहे. अत्यंत कमी वेळात, ज्या प्रॉडक्ट बद्दल आधी काहीही माहिती नाही, त्याच्या उपयुक्ततेचा अभ्यास करून, मार्केट शोधून त्याच्या उत्पदनाचं तांत्रिकी ज्ञान मिळवून लोकोपयोगी असं मास्क सारखं प्रॉडक्ट बनवण्याच्या सुनील कानवडे च्या कल्पक उद्योजकतेला सलाम.
No comments:
Post a Comment