Wednesday, 23 September 2020

भांडवल आणि नफ्याची सायकल

 या सर्व काळात एक मुद्दा फार चवीने चर्चिला जातो आणि तो म्हणजे इतके दिवस नफा कमावला तर आता कामगारांची काळजी घ्यायला काय प्रॉब्लेम आहे?

इथे तुम्हाला मी भांडवल आणि नफ्याची सायकल सांगतो. 

व्यवसाय करत असताना नफा साधारण एका टक्केवारीत होतो. हा नफा म्हणजे सगळे खर्च झाल्यानंतर उरलेले पैसे. यात बिझिनेस ओनरचा पगार पण आला. हो, व्यवसायात असताना सुद्धा बिझिनेस ओनरने पगार घेणंच अपेक्षित असतं. 

आता हा जो नफा उरतो तो गुणोत्तर प्रमाणात खूप जास्त असेल तर बिझिनेस ओनर नफ्यातील काही भाग  डिव्हीडंड म्हणून पगाराव्यतिरिक्त घेऊ शकतो. उरलेला भाग हा बिझिनेस मध्येच रोल केला जातो, जो शक्यतो व्यवसाय वृद्धीसाठी वापरला जातो. 

आता छोटे व्यावसायिक जे आहेत त्यांना हा डिव्हीडंड प्रकार व्यवसाय चालू केल्यावर अनेक वर्षे घेता येत नाही. कारण व्यवसाय वृद्धीसाठी त्यांना पैसे व्यवसायातच ठेवावे लागतात. त्यामुळे व्यावसायिकांकडे आडमाप एक्सेस पैसे असतात ही अंधश्रद्धा आहे. 

दुसरा महत्वाचा कळीचा मुद्दा इथे येतो आणि तो म्हणजे कॅश ची उपलब्धता. छोटे व्यावसायिक हे मोठ्या उद्योगांना माल सप्लाय करत असतात. त्याचे पैसे वेळेत देणे म्हणजे पाप आहे असा एक समज आपल्या व्यवसाय जगतात आहे. त्यामुळे व्यवसाय नफा जरी दाखवत असतील, की जो नोशनल असतो, त्यांच्याकडे कॅश ची वानवा असते. 

या सगळ्या वरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की धंदा पूर्ण बंद असताना एखाद दोन महिन्यापलीकडे व्यावसायिक फिक्स्ड एक्स्पेन्सेस सहन करू शकत नाही. 

मी स्वतःवरून दोन गोष्टी सांगतो. 

मी गेले अठरा वर्षे व्यवसायात आहे, पण एकही वर्ष डिव्हीडंड घेतला नाही आहे. आणि दुसरं म्हणजे, जर आमच्या भारतभरातील ग्राहकांनी आमची सर्व देणी परत दिली तर शून्य बिझिनेस झाला तरी मी सर्व लोकांना किमान एक वर्ष पगार देऊ शकतो. 

टीप: 

१. मी हे जे लिहिलं आहे ते ग्रोथ माइंडसेट ठेवणाऱ्या आणि लेजिटिमेट पद्धतीने बिझिनेस करणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय मनात ठेवून लिहिलं आहे. उत्पादन क्षेत्रातील छोटे व्यावसायिक जे गडगंज दिसतात ते एकतर सॉलिड प्रॉफिट मेकिंग असतात किंवा त्यांच्याकडे पैसे कमावण्याचे दुसरे मार्ग असतात. 

२. आता आलेली परिस्थिती भविष्यात आली तर तिला तोंड देण्यासाठी, सोसायटीला जसा सिंकिंग फंड असतो तसा फंड कंपन्यांनी तयार करणं गरजेचं आहे. 

३. असंच असेल तर मग नोकरी करणं काय वाईट आहे असं वाटू शकतं. पण आहे हे असं आहे. एथिकल आणि लेजिटिमेट पद्धतीने व्यवसाय करणे हे एक तप आहे. पैसेच कमवायचे असतील तर नोकरी करण्यासारखा चांगला मार्ग नाही. व्यवसाय करायचा असेल तर पैसे कमावण्यापलीकडे जाऊन खूप विचार करावा लागतो. 

No comments:

Post a Comment