जागतिक पटलावर करोना लस आणि अमेरिकेची निवडणुकीची धामधूम याची घमासान चर्चा चालू असताना अजून एका बातमीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आणि ते म्हणजे जॅक मा हे गेले दोन अडीच महिन्यापासून विजनवासात आहेत. त्यांना कदाचित तुरुंगात टाकलं असेल किंवा त्यांना चायनीज शासनाने आयुष्यातून संपवलं असेल अशा विविध बातम्या सोशल मीडिया च्या पटलावर चर्चिल्या गेल्या. काही दिवसांपूर्वी त्यांचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आणि अनेक गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला. अलीबाबा चा शेअर ८% ने हॉंगकॉंगच्या मार्केट मध्ये वरच्या बाजूला उडी घेतली.
जॅक मा यांची कहाणी एक दंतकथा बनावी इतकी उत्कंठावर्धक आहे. भांडवलशाहीचे माहेरघर असणाऱ्या अमेरिकेत ऍमेझॉन चे जेफ बेझॉ, मायक्रोसॉफ्ट चे बिल गेट्स, ऍपल चे स्टीव्ह जॉब्ज, किंवा ज्यांच्या नावाचा सध्या बोलबाला आहे ते एलोन मस्क यांच्या कहाण्या सांगितल्या जातात पण साम्यवादाची पोलादी पकड असलेल्या चीन मध्ये जॅक मा यांचा उदय आणि नंतरच्या काळात त्यांनी मिळवलेलं स्थान हे विस्मयचकित करणारं आहे यात शंका नाही.
१९६४ साली संगीत शिक्षित दांपत्याच्या पोटी जॅक मा यांचा जन्म झाला. हँगझाऊ या गावात. त्यांचं चायनीज नाव मा युन. या काळात चीनमध्ये इंग्रजी चं वारं गंधाला पण नव्हतं त्या काळात जॅकला इंग्रजी भाषेची आवड कुठून आणि कशी निर्माण झाली हे एक कोडंच आहे. आपलं इंग्रजी सुधारावं या उद्देशानं जॅक लहानपणी दररोज एका हॉटेल च्या बाहेर उभा राहायचा. सौदा सोपा असायचा. तिथं येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना जॅक टूर गाईड म्हणून फिरवायचा आणि त्याबदलात पर्यटकांकडून इंग्रजी शिकायचा. त्यातल्या एका ऑस्ट्रेलियन दाम्पत्त्याने त्याचं जॅक हे नामकरण केलं. शालेय शिक्षण संपल्यावर कोणत्याही प्रतिष्ठित विद्यापीठाने त्यांना प्रवेश नाकारला कारण त्यांचा गणित हा विषय कच्चा होता आणि त्यात ते दोनवेळा अनुत्तीर्ण व्हायचे. शेवटी कसेबसे ३८% मार्क्स गुणांनी पास झाल्यावर जॅकने कमी प्रसिद्ध असणाऱ्या शिक्षकांच्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला. आणि १९८८ मध्ये ते इंग्रजी विषय घेऊन बी ए पस झाले. बी ए इंग्रजी झालेल्या जॅक ला शाळेत इंग्रजीचे शिक्षक म्हणून नोकरी लागली. तो पर्यंत जॅकने असंख्य वेळा अपयशाचा सामना केला. कित्येक इयत्तेत ते अनुत्तीर्ण झाले, अनेक विद्यापीठांनी त्यांना प्रवेश नाकारला आणि असंख्य वेळा नोकरीसाठी मुलाखतीत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्यात अगदी के एफ सी किंवा लोकल पोलीस डिपार्टमेंट चा समावेश होतो. पुढील पंचवीस वर्षाच्या काळात अक्षरश: करोडो लोकांसाठी रोजगार निर्माण केला आणि जगातल्या उत्तमोत्तम विद्यापीठांनी त्यांना डी लिट पदवी प्रदान केली हा त्यांच्याच भूतकाळाबरोबर झालेला काव्यगत न्याय होता.
इंग्रजी शिक्षकांची नोकरी करण्याबरोबर ते मँडरिन भाषेचं इंग्रजी भाषांतर करू लागले. आणि त्याचा साईड व्यवसाय चालू केला. १९९५ साली याच व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांना अमेरिकेला जायची संधी मिळाली आणि तिथं त्यांना इंटरनेट या त्याकाळी नवीनच प्रचलित झालेल्या माहितीच्या महासागराची ओळख झाली. तरुण जॅक ला लक्षात आलं की चीन मध्ये इंटरनेट चा गंध पण नाही आहे. आणि हा सगळा प्रकार चीनमध्ये रुजवायचा या कल्पनेनं जॅक च्या मनात ठिणगी पेटवली. पुढं या ठिणगीचं रूपांतर दिव्यात आणि मग मशालीत झालं हे सर्वज्ञात आहे. कदाचित एक लक्षात येईल की चीनमध्ये इंटरनेट चा उदय भारताच्या मानाने जरा उशीराच झाला. पण पुढे चीन ने केलेली प्रगती ही आश्चर्यचकित करणारी आहे.
नव्वदीत जे उद्योगक्षेत्रात कार्यरत होते त्यांना येलो पेजेस हा प्रकार आठवत असेल. टाटा येलो पेजेस तसं अगदी जिल्ह्यावार त्या काळात वेगवेगळ्या कंपन्यांचे येलो पेजेस हे त्या काळात प्रचलित होते, त्याच धर्तीवर जॅक मा यांनी चायना येलो पेजेस नावाचा व्यवसाय चालू केला आणि त्यात ते सपशेल अपयशी ठरले. अर्थात हे सगळं करत असताना इंटरनेट नावाचं भूत त्यांच्या डोक्यातून काही जात नव्हतं. त्या काळात या सद्गृहस्थाने त्याच्या गावी हॅन्गझाऊ या गावात मोजक्या व्यावसायिकांना वेबसाईटचं महत्व पटवून दिलं. ते स्वतः या व्यवसायांची माहिती गोळा करायचे आणि इंग्रजीत भाषांतर करून त्यांच्या अमेरिकेतील मित्रांना पाठवायचे. तिथून मग त्या व्यवसायांची वेबसाईट बनवून ते त्या व्यावसायिकांना दाखवायचे. जॅक यांचा या कल्पनेवर इतका दृढ विश्वास होता की हा अत्यंत नवखा प्रकार त्यांनी स्वतःच्या सेल्स स्किल वर त्या गावात विकला आणि स्वतःचं एक छोटं व्यवसायाचं बीज रोवलं.
हे सगळं करत असताना १९९९ साल उजाडलं आणि गणित, संगणक प्रणालीचे बेसिक ज्ञान नसणाऱ्या जॅक मा यांनी आपल्या सतरा मित्रांना त्यांच्या उद्योगाच्या कल्पनेत उडी मारायला प्रवृत्त केलं आणि त्याच साली मग अलीबाबा या अजूबा व्यवसायाचा उदय झाला. जॅकच्या छोट्या घरात या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. जॅक स्वतः या कल्पनेबद्दल इतके दृढ होते की पुढे अलीबाबा चा गौरवशाली इतिहास लिहिता यावा म्हणून त्यांनी या प्रसंगाचे फोटो त्याच वेळी काढून ठेवले. त्यांचा आत्मविश्वास इतका पराकोटीचा होता की काही महिन्यात एका चायनीज पत्रकाराने त्यांचा व्यवसाय कव्हर केला तेव्हा त्यांनी पत्रकाराला सांगितलं की अलीबाबा ही चीनमध्येच नाही तर जगात प्रथम क्रमांकाची कंपनी बनेल. पुढील अनेक वर्षात त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं, जगभरात प्रसिद्ध असलेल्या अलीबाबा आणि चाळीस चोर या अरेबिक कहाणीतील अलीबाबाला जसा गुहेतील खजिना मिळतो त्याच प्रमाणे माहितीच्या खजिन्यावर एक महाकाय व्यवसाय उभ्या करणाऱ्या जॅक मा यांचं वेगळेपण अलीबाबा या नावापासून दिसून येतं.
अनेक यशस्वी उद्योगांची सुरुवात ही अंतःप्रेरणेतून झालेली आहे हे एव्हाना सर्वज्ञात आहे. मग ते अमेझॉन असो वा फेसबुक, मायक्रोसॉफ्ट असो वा इ बे, या लोकांकडे अंकाच्या कसरती करणारे बिझिनेस प्लॅन नव्हते तर स्वतःच्या कल्पनेवर दृढ विश्वास होता. अलीबाबा सुद्धा त्याला काही अपवाद नाही. फक्त या विश्वासाच्या जोरावर जॅक मा यांनी गोल्डमन सॅश कडून ५० लाख अमेरिकन डॉलरची तर जपानच्या सॉफ्ट बँक कडून २ कोटी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक मिळवली आणि मग कल्पक व्यवस्थापनेच्या जोरावर एका अद्भुत कंपनीचा जगड्व्याळ असा विस्तार केला. जॅक मा किंवा तत्कालीन साऱ्या उद्योजकांची कहाणी ऐकल्यावर एक गोष्ट पक्की होते की व्यावसायिक शहाणपण हे अनुभवातून येतं पण त्यासाठी सतत पाठपुरावा आणि नाविन्याची आस हा स्वभावाचा स्थायीभाव असायला हवा.
याच अंगभूत गुणांच्या जोरावर बी टू बी बिझिनेस मॉडेल असणाऱ्या अलीबाबा शिवाय बी टू सी असा इ कॉमर्स प्लॅटफॉर्म ताओबाओ या कंपनीच्या रूपात जॅक मा यांनी चीन मध्ये रुजवला. चायनीज समाजाची आणि शासकीय परिस्थितीची जाण असणाऱ्या जॅक यांचा झंझावात इतका जोरात होता की त्यांच्या पेक्षा कित्येक पट ताकदवर असणाऱ्या इ बे ला चीन मधून आपला गाशा गुंडाळावा लागला. लागोलाग जॅक यांनी अली पे नावाने इ पेमेंट कंपनी चालू केली.
२०१४ साली अलीबाबा ने इतिहास घडवला. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज न भूतो न भविष्यती असा २५०० कोटी अमेरिकन डॉलर्स चा आयपीओ काढला आणि गुंतवणूकदारांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. ६८डॉलर प्रति शेअर असा त्याला भाव आला आणि जॅक मा जगातल्या पहिल्या वीस श्रीमंत व्यक्तीच्या पंगतीत गेले. (२०१९ साली सौदी अरामको या कंपनीने २९४० कोटी अमेरिकन डॉलर्सचा आयपीओ काढून जगातला सर्वात श्रीमंत आयपीओ चं बिरुद मिरवलं )
अलीबाबा आज जगातील अग्रगण्य कंपनीपैकी एक गणली जाते. चीन मध्ये इंटरनेट, इ कॉमर्स, इ पेमेंट या सर्व संज्ञेचे शिल्पकार जॅक मा आहेत यात शंका नाही. स्वतःला १००% मेड इन चायना म्हणवणाऱ्या तसेच अनेक समाजोपयोगी योजना जॅक मा राबवतात. अत्यंत संवेदनशील मन असलेले जॅक आता स्वतःचा वेळ शिक्षण आणि हेल्दकेअर यासाठी व्यतीत करण्याचा मानस ठेवून आहेत. जगभरातील युवकांचे ते रोल मॉडेल आहेत.
असं सगळं असलं तरीही चायनीज शासनाच्या मनात त्यांच्याबद्दल नाराजी आहे. पण हे तेथील साम्यवादी परंपरेला धरून आहे. जॅक मा यांनी कायमच भांडवलशाहीचा पुरस्कार केला आहे. चीन ची नेत्रदीपक प्रगती सुद्धा भांडवलशाही ला अनुसरून झाली आहे. पण तेथील साम्यवादाची पोलादी पकड ही इतर कुठल्याही इझम ला डोकं वर काढू देत नाही. त्याविरुद्ध जर कुणी आवाज उठवला अन तो कितीही सौम्य असला तरी तो चिरडला जातो हा चीनचा काळा इतिहास आहे. २४ ऑक्टोबर २०२० रोजी जॅक मा यांनी हलका आवाज उठवला, चीनच्या बँकिंग पद्धतीविषयी. ते फक्त म्हणाले की "चीनमधील बँक हे जुन्याकाळातील सावकारी सारखं काम करतात. काहीतरी तारण ठेवल्याशिवाय कर्ज देत नाही. ही पद्धत बदलायला हवी. त्यांच्या या पद्धतीमुळे अनेक कल्पक प्रोजेक्ट उद्योजक प्रत्यक्षात उतरवू शकत नाहीत."
इतर कुठल्याही देशात हे वाक्य ऐकून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया आल्या असत्या आणि प्रकरण थांबलं असतं. पण आडमुठ्या चीन शासनाला नाकापेक्षा मोती जड अशी जॅक मा वाटले आणि आर्थिक शिस्तीच्या नावाखाली जॅक मा यांना त्रास द्यायला सुरुवात झाली. अली पे या कंपनीची घोडदौड ही विस्मयकारी आहे. तब्बल शंभर कोटीपेक्षा लोक अली पे ऍप वापरतात आणि त्यापैकी जवळपास ७३ कोटी ग्राहक त्याचा सातत्याने वापर करत असतात. इतका मोठा ग्राहकांचा विश्वास संपादल्यावर जॅक मा यांनी याच क्षेत्रात पुढचं पाऊल टाकण्यासाठी अँट ग्रुप नावाने कंपनी बनवली आणि ती मायक्रो फायनान्स, इन्शुरन्स, वेल्थ मॅनेजमेंट या क्षेत्रात उडी मारेल असे ठरवले. आणि तब्बल ३७०० कोटी अमेरिकन डॉलर्स चा आयपीओ घोषित केला. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तो लिस्ट होणार त्याच्या दोन आठवडे आधी जॅक मा ते शासनाच्या दृष्टीने कुप्रसिद्ध वाक्य म्हणाले आणि फिनान्शियल रेग्युलेटरी बॉडी ने त्यांना समन्स धाडलं. आणि त्या चर्चेनंतर या आय पी ओ वर रोख आणला गेला. त्या दरवाजाआड काय बोलणी झाली हे बाहेरच्या जगाला कळणं केवळ दुरापास्त आहे. त्याबरोबर अलिबाबाची शेअर किंमत उतरंडीला लागली आणि दोन महिन्यात जॅक मा यांची संपत्ती ३०० कोटी अमेरिकन डॉलरने खालावली. त्यानंतर जॅक मा हे पूर्णपणे अज्ञातवासात गेले. त्यांचा विजनवास हा इतका कडक होता की आफ्रिकन बिझिनेस टॅलेंट शो मध्ये जज म्हणून फायनल ला जॅक दिसलेच नाही तर त्यांनी पुरस्कृत केलेल्या या शोच्या जाहिरातीतून त्यांचं नाव वगळण्यात आलं. अलीबाबा ची ती उतरंड थांबली गेल्या आठवड्यात जेव्हा जॅक मा हे एका व्हिडिओ द्वारे अवतीर्ण झाले. असं असलं तरीही त्यांच्या अस्तित्वाच्या शक्याशक्यतेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहेच. २०१९ साली कुणी तरी भविष्य केलं होतं की एक तर जॅक मा यांना या पृथ्वीवरून नाहीसे केलं जाईल किंवा ते तुरुंगात तरी असतील. दुर्दैवाने हे भविष्य काही अंशी खरं ठरलंय.
एक सजग वैश्विक नागरिक म्हणून आपण फक्त जॅक मा यांच्या सुरक्षिततेबद्दल आपल्या हातात फक्त प्रार्थना करू शकतो. पोलादी पकड असलेल्या निष्ठुर चीन शासनाच्या कानावर बाकी कुठलाही आवाज पोहोचणं हे निव्वळ अशक्य आहे. चीनच्या डोळे दिपवणाऱ्या परिस्थिती ला असणारी ही काळी किनार दिवसेंदिवस ठळक होत चालली आहे हे निःसंशय.
(लेख हा इंटरनेट वरील विविध साईटद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर लिहिला आहे)