Thursday, 29 July 2021
जेफ
Saturday, 3 July 2021
"पैसा"
एका प्रोग्रॅमच्या तयारीसाठी "पैसा" या विषयावर मला विचार करायला सांगितलं.
खरंच, पैसा म्हणजे एक आयटम आहे. भले भले त्याच्या चुंगळ मध्ये येऊन फसतात. कुणाच्या नादी लागल्यावर कसं आपलं आयुष्य आपण पणाला लावतो. पैशाचा पण असाच नादखुळा असतो. त्या नादामुळे कितीदाही ठासली गेली तरी कळत नाही. बरं, तिथं लागलीच दुखत पण नाही. दुखलेलं दिसत पण नाही. बऱ्याच काळाने कळतं की आपला कार्यक्रम झाला आहे.
पूर्वी मला अशा लोकांचा राग यायचा. आजही असंख्य लोक या व्यसनापायी देशोधडीला लागलेली मी पाहतो. कधी कधी ते व्यसन कुणाचं सुटल्यासारखं वाटतं, पण दिखाऊपणाचा मुखवटा गळल्यावर मनाचा जेव्हा तळ दिसतो, तेव्हा पैशाच्या मोहाचा अमीबा तिथं वळवळताना दिसतो. आता मला त्यांचा राग येत नाही, कीव वाटते, दया येते. अनुभवातून शहाणपण घेण्याची अक्कल आपण ठेवत नाही आणि ग्रीड नावाच्या कीड ला घट्ट कवटाळून बसतो. पुन्हा पुन्हा त्या पैसा नामक मोहाच्या भोवऱ्यात गरागरा फिरत राहतो. आणि ही वावटळ साधीसुधी नसते. तुमच्या बरोबर अनेक लोकांचं आयुष्य बरबाद करते.
त्यापेक्षा चोर उचक्के परवडतात. मला काही लोक माहित आहेत. खुलेआम भ्रष्टाचाराचं समर्थन करतात आणि अमाप पैसे खातात आणि उडवतात. कुणी त्यांचं झाट वाकडं करू शकत नाहीत. पण तोंडात हरिनाम आणि प्रत्यक्षात मात्र शेण खायचं, लफडं या मंडळींचं होतं.
याउलट, काही लोकांना मात्र पैशाला किती आणि कुठवर महत्व द्यायचं याचं चांगलं शहाणपण असतं. लौकिक जगात भले त्यांना येडे समजत असतील, पण असल मध्ये पैसा त्यांच्या घरी पाणी भरत असतो. ते पैशाच्या तालावर नाचत नाहीत. पैशाचा विनियोग कसा करायचा याची कला त्यांनी आत्मसात केली असते. पैसा त्यांच्याकडे आकर्षित होईल इतके हे लोक काळाच्या ओघात स्मार्ट बनत जातात. या लोकांना त्यांच्या खिशात किंवा बँकेत किती पैसे आहेत याची पडलेली नसते. ते जर कामात असतील आणि पैसा दारावर टकटक करत असेल, तर ते पैशाला बाहेर उभा रहा म्हणून सांगतात. त्यांचं काम ही इतकं उदात्त असतं की पैसा सुद्धा त्यांनी दार उघडेपर्यंत वाट पाहत थांबतो.
What is enough money या प्रश्नाचं उत्तर सापडणं गरजेचं आहे. काहींना हे उत्तर लवकर सापडतं, काहींना उशीरा. पण जेव्हा सापडतं, तो क्षण राजहंस होण्याचा असतो. काही दुर्दैवी बदकांना मात्र मरेपर्यंत याचं उत्तर सापडत नाही. काही लोकांना कागदाच्या तुकड्यावरील गव्हर्नर च्या सहीचं महत्व माहिती असतं, तर काहींची नजर ही फक्त १००, २००, ५००, २००० हा आकड्याभोवती फिरत राहते, मग भले तो कागदाचा तुकडा कितीही चुरगळलेला असू द्या.
आपल्याकडे दोन पर्याय आहेत.
सुखासीनतेवर भक्ती करत, स्वार्थ हा जगण्याचा सिद्धांत मानत पैशाच्या मागे पळायचं की एक चांगला उद्देश ठेवून आपलं अस्तित्व हे जगण्यालायक बनवत इतकं सशक्त व्हायचं की पैसा तुमच्या मागे पळत आला पाहिजे.
(जो प्रोग्रॅम डिझाईन होतो आहे तो १४-२० वयोगटासाठी आहे, पण त्यांच्यासमोर ही भाषा बोलू शकणार नाही म्ह्णून इथे लिहून टाकलं)