प्रत्येक व्यावसायिकाला मग तो उद्योजक असो वा नोकरदार, बर्न आउट होणे या भावनेचा शिकार कधी ना कधी तरी व्हावे लागते. बर्न आउट ला मराठीत प्रतिशब्द नाही आहे म्हणून आपण हाच शब्द वापरू यात. नाही म्हणायला "निरिच्छ" हा शब्द त्याच्या जवळ पोहोचतो पण तरीही प्रतिशब्द म्हणता येत नाही.
ही बर्न आउट भावना नैराश्याच्या जवळपास पोहोचणारी असते. त्यामुळे त्यावर वेळीच काम करणं गरजेचं असतं. अन्यथा कोणताही निर्णय घेताना किंवा कृती करताना "याची काय गरज आहे?" असा प्रश्न विचारत आपण चालढकल करतो आणि हे व्यवसायासाठी मारक ठरू शकतं. त्या निरिच्छतेचा आवाका कितीही मोठा असू शकतो, अगदी सकाळी ऑफिसला जाताना मनावर दगड ठेवून जाणे, हे देखील त्यात अंतर्भूत असू शकतं.
बर्न आउट या भावनेवर विजय मिळवायचा असेल तर अनेक उपाय आहेत. पण त्यावरील मूलभूत अशा तीन गोष्टीवर काम केलं तर व्यवसायाच्या कुठल्याही पातळीवर काम करताना बर्न आउट हा भावना कमी स्पर्श करण्याची शक्यता असते. आणि ती शक्यताच असते, खात्री नाही.
पहिली गोष्ट म्हणजे आपल्या अस्तित्वाचा मूळ उद्देश शोधणे. थोडं अवघड आहे पण अशक्य नाही. तो एकदा शोधला की तुमच्या लक्षात येईल की मूळ उद्देश सध्या करताना त्यावर पैसे किंवा नफा किंवा कुठलीही ऐषोआरामाची चटक लावणारी गोष्ट याचा प्रभाव नसतो. त्यामुळे एकदा हे लक्षात आलं की आपण काम हे कुठलीही मूर्त गोष्ट मिळवण्यासाठी नव्हे तर अमूर्त असं समाधान या साठी करतो आहे, बर्न आउट या भावनेपासून आपण कोसो दूर जातो. इथे आर्थिक उद्देश आणि मूळ उद्देश यातील फरक समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याची गल्लत होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
दुसरी महत्वाची गोष्ट जी वर उल्लेखलेल्या मूळ उद्देशाशी संबंधित आहे आणि ती म्हणजे मूळ उद्देशाला केंद्रभागी ठेवून आपल्या व्यावसायिक नीतिमूल्यांची आखणी करायची करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. अगदी खरं सांगायचं म्हणजे त्याचे एक आखीव रेखीव फॉरमॅट आहे. दुर्दैवाने तो कुठल्याही विद्यापीठात शिकवला जात नाही. त्यासाठी आपल्याला एक व्यावसायिक मेंटॉर ची तर गरज असतेच पण त्यांनी जे सांगितलं त्याला आपल्या स्वतःच्या कल्पनाशक्तीची जोड देऊन व्यवसायाची श्वेतपत्रिका तयार करावी लागते. त्यामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये एक सॉलिड टीम तयार करणे ही पहिली गरज आहे. ही करताना बऱ्याचदा उद्योजकाने आपले विकनेस ओळखून, त्यामध्ये स्ट्रेंथ बाळगणारे टीम मेंबर आणणे, इतकंच नव्हे तर एका कक्षेनंतर आपल्या स्ट्रेंथ सुद्धा डेलिगेट करण्याची तयारी हवी. हे एकदा झालं की उद्योजक स्वतः अनलर्निंग आणि रीलर्निंग च्या प्रोसेस मधून जातो आणि बर्न आउट भावना त्याच्या जवळपास पण पोहोचत नाही. व्यवसायाशी संदर्भात असणाऱ्या सर्व गोष्टींसाठी मी आणि मीच जबाबदार आहे या भावनेपासून मुक्ती घ्यायला हवी. आणि काही अगदी क्षुल्लक गोष्टीपासून आपलं लक्ष काढून जे व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवं. हे एकदा केलं की उद्योजकच नव्हे तर पूर्ण आस्थापन हे आर्थिक नव्हे तर मूळ उद्देशाला जागत व्यवसाय करतं. आर्थिक कामगिरी हा आपल्या कृतिशीलतेचा बाय प्रॉडक्ट बनण्याची शक्यता आहे.
इथं एक मेख आहे. हे वर जे लिहिलं आहे ते वाचताना फार छान वाटतं पण विश्वास ठेवा, उद्योजकाला व्यवसायापासून अलिप्त ठेवून वर उल्लेखलेलं प्रत्यक्षात आणणं हे फार अवघड आहे. जगातला प्रत्येक मेंटॉर, मग तो सायमन सिनेक असू द्या की जिम कॉलिन्स किंवा अगदी आपल्या भारतातील प्रत्येक जण याचं महत्व विशद करतो तरी अनेक व्यावसायिक हे करू शकत नाहीत मग त्यामध्ये कदाचित असुरक्षितेतची भावना असेल किंवा वृद्धिधिष्ठित मानसिकता नसेल. ते मग टर्नओव्हर किंवा नफा यांच्यामागे धावत राहतात आणि काही कारणाने ते साध्य झाले नाही तर बर्न आउट भावनेचा शिकार होतात. एकदा तुम्ही अल्पकालीन फायद्यावर लक्ष केंद्रित केलं आणि दीर्घकालीन योजनेकडे दुर्लक्ष केलं की निरिच्छता येण्याची शक्यता आहे.
तिसरा मुद्दा हा व्यवसायाशी नव्हे तर वैयक्तिक उद्योजकांशी संबंधित आहे आणि तो म्हणजे व्यायामाच्या मदतीने स्वतःला आरोग्यदायी आणि तंदुरुस्त ठेवणे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भावभावना या आपल्या शरीरात तयार होणारे केमिकल नियंत्रित करतात. बर्न आउट कुठल्या केमिकल मुळे प्रभावित होते हे मला माहिती नाही पण व्यायामामुळे रिलीज होणारे एंडोर्फिन्स मात्र तुम्हाला आनंदी ठेवू शकते, हे मी खात्रीने सांगू शकतो. एव्हाना मला हे कळून चुकलं आहे व्यायामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहता. शारीरिक तंदुरुस्ती हा तर साईड इफेक्ट आहे.
कुणी असं म्हणू शकतं की बर्न आउट (निरिच्छता) ही काही मेडिकल डिसऑर्डर नाही आहे. पण मग अहंकार तरी कुठे मेडिकल डिसऑर्डर आहे.? पण ज्या पद्धतीने अहंकार हा अवगुण व्यावसायिक अपयश देतो त्याच पद्धतीने बर्न आउट ही भावना व्यवसायाच्या कमी वृद्धी कडे नेऊ शकतो. त्यावर वेळीच काम करून नियंत्रण आणणे यात व्यावसायिक शहाणपण आहे.