Friday, 22 March 2024

साथी हाथ बढाना!

साधारण १८०० च्या सुमारास जगातले सगळे मोठी शहरं ही रस्त्यावर पडलेल्या घोड्याच्या लीदीमुळे गुदमरत होती. कारण असं होतं की या शहरांच्या दैनंदिन जीवनातील लोक आणि वस्तूंचं दळणवळण हे हजारो घोड्यांवर अवलंबून होतं. सन १९०० मध्ये एकट्या लंडन मध्ये ११००० टांगे या कारणांसाठी काम करत होते. याशिवाय अनेक घोडागाड्या होत्या जिथे एका गाडीला खेचायला १२ घोडे लागायचे. असं मिळून लंडन शहरात दार दिवशी ५०००० घोडे काम करायचे. लंडन त्या काळातील जगातील सगळ्यात मोठं शहर होतं, जिथली जीव वस्ती साधारण पन्नास लाखाच्या घरात होती. आणि त्या सगळ्या शहराची जीवनरेषा जशी आज ट्यूब आहे तशी त्या काळात घोड्यांच्या मदतीने ओढली जाणाऱ्या अनेक दुचाकी वा चारचाकी ठेले होते. 

या घोड्यांच्या प्रचंड संख्येने अनेक प्रश्न उभे राहिले होते. त्यातील एक मोठा प्रश्न होता, घोड्यांनी रस्त्यावर टाकलेली लीद. सरासरीने एक घोडा दार दिवशी ६ ते १४ किलो विष्ठा रस्त्यावर टाकायचा, यावरून तुम्हाला प्रश्नाची व्याप्ती कळेल. आणि मग रस्त्यावर पडलेल्या या विष्ठेमुळे अनेक माशा व इतर कीटक लंडनच्या रस्त्यावर इतस्ततः पसरलेले असायचे ज्यामुळे टायफॉईड आणि इतर आजार पसरायचे. 

त्यात अजून प्रत्येक घोडा दिवसाला २ लिटर मूत्रविसर्जन रस्त्यावर करायचा आणि भरीसभर म्हणून या काम करणाऱ्या घोड्यांचं आयुष्य फक्त ३ वर्षे होतं. मृत घोडे रस्त्यावरून काढणे हे एक मोठं काम असायचं. बरं त्या बॉडीज ची विल्हेवाट लावणं सोपं व्हावं म्हणून बऱ्याचदा त्यांचे रस्त्यावरच तुकडे केले जायचे. 

एकंदरीत लंडनचे रस्ते त्याकाळात हे लोकांसाठी विषाचं आगर झालं होतं. 

बरं हा फक्त इंग्लंडचाच प्रॉब्लेम होता असं नाही तर न्यूयॉर्क मध्ये त्याच काळात साधारण लाखभर घोडे होते आणि ते साधारण दिवसाला पंधरा एक लाख विष्ठा विसर्जित करायचे. 

या प्रश्नाने लक्ष तेव्हा वेधून घेतलं जेव्हा १८९४ मध्ये एका ब्रिटिश वर्तमानपत्राने हेडलाईन दिली की "आजपासून ५० वर्षात लंडनमधील सारे रस्ते घोड्याच्या विष्ठेखाली ९ फूट गाडले गेले असतील."

"१८९४ मधील घोड्याच्या लिदीमुळे तयार झालेला भीषण प्रश्न" असं त्याचं वर्णन केलं गेलं. 

या भयानक परिस्थितीवर १८९८ साली न्यूयॉर्क मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय शहर नियोजनाच्या बैठकीत मोठी चर्चा घडली. पण या विचित्र प्रश्नावर उत्तर काही सापडलं नाही. इन फॅक्ट कुणी उघडपणे बोललं नाही, पण नुकताच उदयाला आलेल्या शहरी नागरसंस्कृतीचा ऱ्हास होईल अशी चर्चा दबक्या स्वरात चालू झाली. 

मानवी संस्कृतीच्या इतिहासात जेव्हा कधी अशी परिस्थिती आली तेव्हा गरज ही शोधाची जननी आहे ही उक्ती धावून आली आणि विचित्र परिस्थितीला उत्तर मिळालं आहे, याला इतिहास साक्ष आहे. या परिस्थितीला उत्तर आलं ते वाहन उद्योगाकडून. हेन्री फोर्ड नावाच्या ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या अर्ध्वयु ने चारचाकी वाहनांची मास प्रॉडक्शन सिस्टम आणली आणि पुढील एका दशकात "घोड्यांची रस्त्यावर विसर्जित झालेली विष्ठा" हा प्रश्न जगासाठी इतिहासजमा झाला. रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी घोडे खेचत असणाऱ्या सर्व दळणवळण साधनांना रिप्लेस केलं. 

इथं एक मेख आहे. मानवजातीला नेहमीच असं वाटत आलं आहे की आपल्याला प्रश्नाचं उत्तर सापडलं आहे. पण ही खऱ्या अर्थाने शाश्वत उत्तरं नाही आहेत तर एक तडजोड आहे. एका शतकामध्ये ऑटोमोबाईल उद्योग नवीन प्रश्नाचा संच घेऊन आपल्यासमोर आ वासून उभा आहे. पण तो या लेखाचा विषय नाही. 

तर लिहीत होतो, की आजही लोकांना कुठल्या प्रश्नाचं उत्तर दृष्टीक्षेपात दिसलं नाही तर "the great horse manure crisis situation" हा वाक्प्रचार वापरला जातो. ते लोकांना हेच सांगण्यासाठी की निराश होऊ नका, काहीतरी सोल्युशन  निघेलच. 

यातला एक दुसरा इन्फरन्स असा आहे की भवतालात काय चुकीचं चाललं आहे हे सांगणारे अनेक रिसोर्सेस आहेत आणि ते दिवसरात्र आपल्या कानावर ती माहिती आदळवत असतात. दुर्दैव हे आहे की, बहुसंख्य लोक वाट बघत असतात की कुणीतरी देवदूत येईल आणि परिस्थिती बदलेल. जास्तीत जास्त आपण काय करतो तर एकतर तक्रारीचा सूर लावलेला असतो, नाहीतर निषेध व्यक्त करतो किंवा कुठल्यातरी माध्यमातून कन्सर्न व्यक्त करत असतो. पण त्यातून बदल घडत नाहीत. बदल आणण्यासाठी कृतीशीलता महत्वाची असते. 

अर्थात आशावाद जिवंत आहेच. समाजात एक असा प्रवर्ग आहेच जो रात्रंदिवस कष्ट करतो, समाजात उभे राहणाऱ्या अनेक प्रश्नांना उघडपणे आव्हान देतो, चिखलात अडकलेल्या चाकांना बाहेर काढण्यासाठी आपला खांदा हेन्री फोर्ड सारखे लोक बिनदिक्कत देतात आणि प्रश्नांची उकल करतात. ही लोक बदल घडण्याची वाट बघत नाहीत तर तो आणायचे ते कारण असतात. 

इथं प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. आपण फक्त बोलभांडगिरी करणारे बोलके पोपट राहणार आहोत की जो बदल मला हवा आहे तो करणारे कृतिशील नायक होणार आहोत? अजून एक चॉईस आहे. काही कारणाने आपल्या क्षमतेचा वापर करण्यात काही अडचण येत असेल तर जे प्रत्यक्ष काम करणारे हात आहेत त्यांच्या हातात हात मिळवत त्यांना बळ देण्याचं काम तर आपण नक्कीच करू शकतो. 

साथी हाथ बढाना!


- मूळ इंग्रजी लेख श्री गुरविंदरसिंग यांचा आहे. 

No comments:

Post a Comment