नियमाच्या चौकटीत राहून काम करण्याचा आपल्याला इतका का तिटकारा आहे हे मला न उलगडलेलं कोडं आहे. अनेक साध्या गोष्टी आहेत जिथं नियम न पाळण्यात आपल्याला फार हुशारी वाटते.
उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर सोसायटी मध्ये कुणाकडे पाहुणे आले तर त्यांची कार सोसायटी च्या बाहेर पार्क करायची, हा नियम. सोसायटी चा मेंबर विनाकारण वॉचमन शी हुज्जत घालत असतो की "मी सांगतोय ना, सोड गाडी." अरे, बाबा नियम केला आहे ना सोसायटीने. मग ऐक ना.
सिंहगड रोडला पु ल देशपांडे गार्डनच्या अलीकडे टेकडी रस्त्याने गाडी उतरतात आणि बिनदिक्कत पणे रॉन्ग साईडने दत्तवाडीच्या चौकात येतात. परवा हाईट झाली. माझ्या ड्रायव्हर ने पिवळा लाईट असताना गाडी चौकात घातली आणि रॉन्ग साईड ने आलेल्या दोन स्कुटर मुळे त्याला रस्त्यात थांबावं लागलं. त्या स्कुटर पुढे गेल्यावर आमच्या गाडीसाठी रस्ता क्लिअर झाला पण तो पर्यंत आमचा सिग्नल लाल झाला होता. चौकात मधेच होतो म्हणून माझ्या ड्रायव्हरने गाडी पुढे घेतली. तर पूर्णपणे रॉन्ग साईडने आलेल्या एका कार ने आमच्या समोर ती उभी केली आणि खुणा करून सांगितलं की तुझा लाल सिग्नल आहे हे कळत नाही का? आता बोला.
अनेक ठिकाणी मी बघितलं आहे की सेल्स डिपार्टमेंट ला नियम घालून दिले असतात की टूर वर असताना जो खर्च होईल त्याची बिलं घ्यायची आणि ती अकौंट्स डिपार्टमेंट ला सबमिट करायची. इतका साधा नियम आहे. पण तो सुद्धा सेल्स च्या पोरांना पाळता येत नाही. बिलं न देण्याची काहीही कारणं सांगतात. परत बदलत्या टेक्नॉलॉजी प्रमाणे ते मेंटेन करणं इतकं सोपं असतं, पण नियम तोडून काहीतरी वाद घालायची खुमखुमी असते.
कुठलीही आस्थापना मग ती हौसिंग सोसायटी असो, काम करण्याची जागा असो, प्रवासाचे साधन मग त्यात रस्ता, रेल्वे, विमानप्रवास आला याचं चलन हे तेव्हाच यशस्वी होतं जेव्हा आपण नियम आणि शिस्त पाळतो. ती तिथली कार्यसंस्कृती बनते. आणि एकदा आपली कृती संस्कृती बनली की सामाजिक प्रगती हे बाय प्रॉडक्ट बनतं.
आपण सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की नियम तोडणारे लोक नेहमी मायनॉरिटी मध्ये असतात. तर नियमाप्रमाणे वागणारे लोक मेजॉरिटी मध्ये. त्यांच्या चांगुलपणामुळे तुमचं चुकीचं वागणं हे खपून जातं, ते सर्फेस आउट होत नाही. "कायदे मे रहो, फायदे मे रहो" हा एक सोपा मूलमंत्र आहे. कायदे, नियम हे आपल्यावर निर्बंध आणण्यासाठी केलेले नसतात तर एका शासनमान्य चौकटीत आपणा सर्वाना मुक्तपणे जगता यावं यासाठी बनवले असतात हे ध्यानात ठेवलं तर आपलं जगणं तर सुसह्य होतंच पण आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आपल्या वागण्यामुळे आनंद मिळतो.
No comments:
Post a Comment