तसं त्यांचं आयुष्य सुखासुखी चालू होतं. शरद कुलकर्णी १९८२ चे जेजे चे पदवीधारक. काही वर्षे नोकरी केल्यावर स्वतःचा जाहिरात व्यवसाय. व्यवसाय पण मुंबईत छान स्थिरस्थावर झालेला. कुटुंबात पत्नी अंजली आणि मुलगा शंतनू.
सर्व कुटुंबाला शारीरिक तंदुरुस्तीचा छंद लागतो. मग त्यातून मॅरेथॉन पळणं आलं आणि ते करता करता लागली गिर्यारोहणाची आवड. महाराजांच्या प्रेरणेने चालू झाली सह्याद्रीची शिखरे पादाक्रांत करण्याची मालिका. शरद आणि अंजली दाम्पत्य पन्नाशीच्या आसपास पोहोचतं आणि गिर्यारोहणतील अर्ध्वयू श्री सुरेंद्र शेळके यांच्याशी ओळख होते. ते त्यांच्या आवडीला व्यवसायिक प्रशिक्षणाची जोड देऊन त्यांच्या या छंदाचा आवाका वाढवायला सांगतात.
हे जोडपं पोहोचतं हिमालयातील गिर्यारोहक संस्थेत. तिथं चाळीस च्या वर वय असेल तर प्रवेश नसतो, तर ते शारीरिक तंदुरुस्ती ची चाचणी ची मागणी करतात आणि प्रशिक्षण झाल्यावर प्रमाणपत्र पण नको असं लिहून देतात. अतिशय खडतर प्रशिक्षण ते पूर्ण करतात.
आणि मग केला जातो एक अदिम निर्धार, सात खंडातील सर्वोच्च शिखरांना गवसणी घालण्याचा. रशियातील एलब्रूस, अर्जेंटिना तील अकांकागुआ, अलास्का तील देनाली, आफ्रिकेतील किलीमांजारो, अंटार्क्टिका तील माउंट विंसन, ऑस्ट्रेलिया तील कोसीयुस्को (काही लोक ओशेनीयतील माउंट पिनकक पण घेतात) आणि अर्थात या सगळ्यांचा सरताज आशियातील माउंट एव्हरेस्ट. यापैकी दोन शिखरे आणि त्या बरोबर हिमालयातील इतर काही गिरिशिखरे सर केल्यावर, ठरतं की आता एव्हरेस्ट ला कवेत घ्यायचं, शरद यांचं वय ५७ तर अंजली ५३.
सगळी तयारी होते. एव्हरेस्ट सर करायला दोन एक महिन्याचा कालावधी लागतो. दीड एक महिने तर तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सराव करावा लागतो. आणि मग त्यांचा दिवस ठरतो, एव्हरेस्ट काबीज करण्याचा. अनेक जीवघेण्या, आणि या शब्दश:, वाटा आणि निसर्गाशी दोन हात करत शरद आणि अंजली एव्हरेस्ट च्या शेवटच्या टप्प्यात येतात. २२ मे २०१९, व्हेदर विंडो ची पडताळणी करत आता शेवटचा टप्पा सर करायचा. इतरवेळेस ५ ते ७ दिवस उपलब्ध होणारी व्हेदर विंडो त्यावेळी मात्र उघड होते फक्त दोन दिवसांसाठी. जगभरातील आलेले पाच सहाशे गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्यासाठी एकच झुंबड करतात. शेवटचा टप्पा हा "डेथ झोन" म्हणूनच ओळखला जातो. त्यात अक्षरश: "ट्राफिक जाम" जगातल्या सर्वोच्च जागेवर.
एका ठिकाणी शरद आणि अंजली ची ताटातूट होते. शरद समिट पूर्ण करण्यासाठी पुढे जातात पण अंजलीची त्या ट्राफिक जाम मध्ये दमछाक होते. सर्वोच्च जागेवर जाऊन शरद परतीच्या प्रवासाला निघतात आणि पत्नीची भेट होते. त्यांची अवस्था एव्हाना बिकट झाली असते. एकेक मिनिट या ठिकाणी महत्वाचा असतो. शरद सरांचा शेर्पा म्हणतो की जर आपण आता इथून निघालो नाही तर आपल्या दोघांना पण जीव गमवावा लागेल. हृदयावर दगड ठेवून शरद अंजली मॅम ची साथ सोडण्याचा निर्णय घेतात.
२२ मे २०१९ मध्ये या विचित्र परिस्थितीमुळे ११ गिर्यारोहकांचा मृत्यू होतो. त्यात एक नाव असतं...... अंजली शरद कुलकर्णी.
शरद परत आल्यावर डिप्रेशनचे शिकार होतात. त्या घटनेचा असा परिणाम होणं हे साहजिक होतं. पाच-सहा महिने जातात. आणि एके दिवशी शरद ही नैराश्याची झूल फेकून देतात आणि बेफाम होऊन पर्वतावर धावायला लागतात, अगदी शुद्ध हरपेपर्यंत. जेव्हा त्यांचे सर्व सेन्सेस जागेवर आले असतात, तेव्हा त्यांच्या मनावर आलेलं निराशेचं मळभ हे दूर झालेलं असतं. आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्यूचं दुःख विसरण्यासाठी ते परत पर्वतराजीला साद देतात. सिंहगड वर रात्री नऊ ला निघून सकाळी सहा वाजेपर्यंत वर खाली करणे, चढावर पंचवीस किलोचं वजन घेऊन कमरेला टायर बांधून स्वतःच्या शरीराला तयार करतात आणि पुढील तीन वर्षात देनाली, माउंट विन्सन, कोसीयूस्को आणि एलब्रुस ही चार खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करतात. आणि एकुलत्या एक मुलाला, शंतनूला, सांगतात की मला तुझ्या आईला श्रद्धांजली व्हायची आहे, ती पण पुन्हा एकदा एव्हरेस्ट वर जाऊन.
२०२३ मध्ये पुन्हा एकदा मोहीम आखली जाते. ६१ वर्षाचे शरद कुलकर्णी जगभरातील तीस आणि चाळीस वर्षीय गिर्यारोहकांबरोबर पुन्हा एकदा एव्हरेस्ट वर चढाई करू लागतात. अनेक चमत्कारिक घटनांची मालिका घडते. एका ठिकाणी त्यांचा फॉल पण होतो. सेफ्टी इक्विपमेंट म्हणून असलेला दोरखंड जेव्हा त्यांचा फॉल थांबवतो तेव्हा उजवीकडे त्यांचाच एक ऑस्ट्रेलियन गिर्यारोहक मित्र तिथे चिरनिद्रा घेत असतो. अशा अनेक "अगेन्स्ट ऑल ऑड्स" परिस्थितीला तोंड देत, शरद २२ मे २०२३ रोजी, ज्या जागेवर अंजलीची साथ त्यांनी साथ सोडलेली असते, तिथेच तिचा फोटो ठेवून तिला श्रद्धांजली वाहतात आणि त्याच दिवशी पहिल्या मोहिमेत त्यांच्याकडून राहिलेलं अजून एक काम पूर्ण करतात...... ते जगातल्या सर्वोच्च ठिकाणी तिरंगा फडकवतात.
अशी ही दुर्दम्य इच्छाशक्तीची चित्तरकथा ऐकताना काल आम्ही दीड एकशे दिग्मूढ झालो होतो. शरद बोलत होते तेव्हा हॉल मध्ये टाचणी पडेल इतकी शांतता होती आणि एक तासांनी जेव्हा शरद थांबले तेव्हा घशात कढ थांबवलेल्या अवस्थेतील दीडशे लोकांच्या टाळ्या मात्र थांबत नव्हत्या.
कुठलाही अभिनिवेश न ठेवता जगातील सातही खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या ६१ वर्षाच्या तरुणाने आपली कहाणी सांगितली तेव्हा मी तर थिजून गेलो होतो.
शरद सर, तुमच्या जिद्दीला सलाम आणि भविष्यातील सर्व मोहिमांसाठी हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment