Friday, 3 May 2024

पार्टनरशीप

गौरीने पार्टनरशीप बद्दल प्रश्न विचारला. इतर अनेक मुद्द्याप्रमाणे इथेही मी माझे अनुभव लिहिणार आहे. माझी भागीदारी ही १९९३ ला चालू झाली आहे, म्हणजे तब्बल ३१ वर्षे मी आणि माझा पार्टनर एकत्र काम करतोय. आता माझे वय ५६ वर्षे आहे आणि पार्टनर चे ६८ वर्षे. म्हणजे दोघेही आता आमच्या व्यावसायिक करिअर च्या पर्यायाने  पार्टनरशिप च्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. म्हणजे त्याला यशस्वी पार्टनरशिप म्हणता येईल. 

सगळ्यात आधी मी एक सांगू इच्छितो की आम्ही दोघेही अगदी विरुद्ध स्वभावाचे होतो. मी ग्रोथ बाबत प्रचंड आग्रही तर तो अगदीच चांगल्या अर्थाने निवांत, मी खूप चिडका तर तो अगदी शांत, मी भिडस्त तर तो स्पष्टवक्ता किंवा अगदी खडूस सुद्धा म्हणता येईल असा, मी वेळ पाळण्याबाबत अत्यंत अजागळ तर तो अगदी वक्तशीर, मी अनेक बाबतीत खूप फ्लेक्सिबल तर तो रिजिड, मी टेक्नॉलॉजी ला जवळ करणारा तर त्याचा रिलेटिव्हली कमी विश्वास, त्याला टेक्निकल स्किल्स वर जास्त विश्वास तर मला बिझिनेस मॅनेजमेंट वर.  असे अनेक गुण अवगुण. 

मग सारख्या क्वालिटीज काय होत्या दोघात? पहिली गोष्ट म्हणजे दोघांनी एकमेकांना जसे आहोत तसे स्वीकारले. एकमेकांना बदलायचा फारसा प्रयत्न केला नाही. गेल्या तीन दशकात दोघेही बदललो आहोत पण ते आम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा. वर उल्लेखलेल्या अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत, दोघांच्याही. या गोष्टीचा दोघांनाही मानसिक त्रास झाला. पण एकमेकांना सहन करण्याचं शहाणपण जागतं ठेवलं. 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवर विश्वास. कमालीचा विश्वास. पैशांचे सगळे व्यवहार मी बघायचो. पण अक्षरशः एकदाही, आय मिन इट, एका पैशाचा सुद्धा अविश्वास माझ्यावर दाखवला नाही. 

तिसरी गोष्ट म्हणजे आमचे अनेक निर्णयाबाबत मतभेद झाले पण एकदा निर्णय झाल्यावर मात्र मनात काहीही किंतु न ठेवता त्याला सपोर्ट केला. आमची भांडणं पण बेकार झालीत. त्यात चूक कुणाचीही असो, आवाज माझाच चढलेला असायचा. पण इतकं होऊनही रात गयी, बात गयी या न्यायाने ते विसरून पुन्हा एकत्र जोमाने काम करण्याचा मोठेपणा दोघांनी दाखवला. 

चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांनीही कंपनीबद्दल असलेल्या एकमेकांच्या एकनिष्ठतेबद्दल कधीही शंका घेतली नाही. व्यवसायापुढे स्वतःच्या भावना ज्या पार्टनरशीप साठी मारक असतात, उदा: इगो, लोभ, हव्यास त्यांना कामाच्या जागेत थारा दिला नाही. 

अर्थात ही पार्टनरशीप शेवटापर्यंत टिकून राहण्यास अजून काही मित्र तसेच गेल्या बारा वर्षांची सेटको बरोबरची साथ ही पण पूरक ठरली हे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते. 



No comments:

Post a Comment