परवा आमच्या कंपनीतल्या एका मुलीच्या लग्नाची पोस्ट टाकली तर त्यावर माझा मित्र सदानंद बेंद्रे याने माझी सहकाऱ्यांबरोबर असणारी भावनिक गुंतवणूक यावर लिहायला सांगितलं. म्हणून ही पोस्ट.
अगदी खरं सांगायचं तर इतर गुण अवगुणाप्रमाणे कंपनीतल्या सहकार्यांबरोबर ची नाती आणि भावनिक गुंतवणूक ही पण वयोमानाबरोबर इव्हॉल्व्ह होत गेली आहे. जेव्हा कंपनी लहान होती, तेव्हा नैसर्गिक होतं की त्याला मी कुटुंब समजायचो. त्यामुळे माझे सहकारी हे फॅमिली मेंबर प्रमाणे असायचे. त्यांचे प्रश्न हे माझे प्रश्न व्हायचे. त्यांनी ते जर मला सांगितले नाही तरी मला त्यांचा राग यायचा. त्यांना मी मग आउट ऑफ वे जाऊन मदत पण करायचो. पण त्याचा परिणाम असा झाला की मी त्यांच्या बाबतीत भयंकर पझेसिव्ह व्हायला लागलो. त्यांनी कंपनी वगैरे सोडली की खूप डिस्टर्ब व्हायचो. थोडक्यात मी त्यांना जी मदत करायचो आणि त्यांना कौटुंबिक रिलेशन मध्ये बांधायचो, या बदल्यात त्यांच्या कडून मी काही अपेक्षा ठेवायचो. आणि त्या पूर्ण नाही झाल्या की मला स्वतःला भयंकर मानसिक त्रास व्हायचा अन त्यातून मी कधी आक्रस्ताळेपणा पण करायचो. कदाचित माझ्या वागण्यातून हे प्रतिध्वनीत पण होत असेल की मी हे सगळं तुमच्यासाठी करतो आहे.
जसजसे या मानवी नात्यांचे भरेबुरे अनुभव यायला लागले तसा मी पण कंपनीचा कर्ता म्हणून इव्हॉल्व्ह होत गेलो. त्यातून मला जबरदस्त शिकवण मिळाली आणि मी काही धडे घेतले. एकतर न मागता मदत देणं बंद केलं. आणि मुख्य म्हणजे ज्या मदतीतून माझ्या मनात अहंभाव तयार होईल अशी मदत करणं बंद केलं. हे जरी करत गेलो तरीही माझ्या सहकार्याबद्दल असणारं माझं कर्तेपण हे अबाधित राहिलं. फक्त त्यातून येणाऱ्या पझेसिव्ह फिलिंगला तिलांजली दिली. मी सेटको परिवाराचा प्रमुख आहे आणि माझ्या लोकांची काळजी घेणे हे माझं आद्य कर्तव्य आहे ही भावना मनात प्रबळ होत गेली. याची सगळ्यात जबरदस्त अनुभूती लागोपाठच्या दोन घटनांमधून झाली.
पहिली घटना म्हणजे ७ जुलै २०१९ रोजी झालेला तो भीषण अपघात अन त्यात गमावलेले माझे चार सहकारी. ज्या घटनांमुळे तुझ्या स्वभावात आमूलाग्र बदल झाला अशा तीन घटना सांग असं मला कुणी विचारलं तर या अपघाताचा मी उल्लेख करेल. त्या आघातातून सावरताना माझ्या क्रायसिस मॅनेजमेंट ची कसोटी लागली.
आणि दुसरी कसोटी करोना काळात झाली. मला सांगायला आनंद होतो आणि थोडा अभिमान पण वाटतो की त्या काळात आलेल्या अनेक संकटांना सामोरे जाताना माझे लोक आणि ते संकट यांच्या मध्ये खंबीर पणे उभा राहिलो. पण हे सगळं करताना मी लोकांसाठी नव्हे तर माझ्या आनंदासाठी मी करतोय हे मनावर सातत्याने बिंबवित राहिलो.
या सगळ्या प्रोसेस मध्ये हे झालं की माझ्या मनात माझ्या सहकार्याबद्दल प्रेम तर पूर्वीसारखंच आहे पण त्यात एक मलाच हवीहवीशी वाटणारी निरपेक्षता आली. आजही पालकत्वाची भूमिका तशीच आहे पण त्यातून येणाऱ्या मालकी हक्क भावनेला मी हद्दपार करू शकलो.
या सगळ्याचा फायदा असा झाला की माझ्या मनात एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर या नात्याबाबतीत खूप स्थितप्रज्ञता आली. ज्यांच्या बरोबर माझे सिद्धांत सिंक झाले आहेत त्यांना मी काही गोष्टी अधिकारवाणीने सांगतो पण त्याउपरही कुणाला माझं म्हणणं पटलं नाही तर त्यांच्या विचारांचा आदर करण्याची मानसिकता मी बाळगून आहे.
तर असं आहे. थोडं कॉम्प्लेक्स वाटेल कुणाला. पण माझ्या मनात माझ्या सहकार्यांबद्दल प्रचंड प्रेम आहे. त्याबदल्यात येणारा विमोह मात्र मी त्यागला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मानसिक स्टेटस मी खूप एन्जॉय करतो आहे.
No comments:
Post a Comment