विनायक पाचलग च्या थिंक बँक वर घेतलेल्या माझ्या मुलाखतीचं कवित्व तसं संपलं होतं. कौतुक पण झालं, मुलाखतीवर यु ट्यूब वर काही विरोधी प्रतिक्रिया पण आल्या "म्हणजे हा काय बडबड करतोय. स्वतः लोकांना किती पगार देतो" वगैरे वगैरे.
मुलाखत एअर झाल्यावर दहा एक दिवसांनी मला एक फोन आला, माझ्या एका जुन्या मित्राचा. अनेक वर्षात त्याचा अन माझा काही संवाद पण नाही आहे. भेटणं तर दूर पण फोन कॉल पण नाही. त्याचा फोन आला आणि त्याची सुरुवातच
"काय अर्धवट ज्ञान घेऊन मुलाखत देणारे तथाकथित विचारवंत" अशी झाली. मी गांगरलोच एकदम. त्यानंतर तो जे काही बोलत होता, त्याची मला काही टोटल लागत नव्हती. सुरुवातीला राग आला, पण नंतर त्याच्या बोलण्याची गंमत वाटायला लागली. कारण मी जरी फार काही कर्तृत्ववान वगैरे नसलो तरी माझ्या या मित्राने आयुष्यात भरीव केल्याचं आठवत नाही. किंबहुना कामाच्या तराजूत माझं वजन किलोभर भरत असेल तर मित्राचं छटाक पण होणार नाही. तरीही मला फटकवायचा त्याचा कॉन्फिडन्स वाखाणण्याजोगा होता.
माझा एक तर स्वभाव असा आहे की मला एखाद्या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तरीही समोरचा दुप्पट आत्मविश्वासाने जर सांगत असेल "अरे तुला माहिती नाही, मध्य प्रदेश ची राजधानी लखनौ आहे, भोपाळ नाही" तर मी "असेल बुवा" असं म्हणून मूग गिळून गप्प बसतो. त्या फोन मध्येही मी गप्प बसलो.
ही अजून एक सोशल मीडियाची देन आहे. दुसर्याने काही मत व्यक्त केलं असेल अन त्याला विरोध करायचा असेल तर विरोधी मत व्यक्त करायचं नाही तर "व्यासंग वाढवा", "गेट वेल सून", "कडक गांजा कुठं मिळतो" किंवा माझा मित्र म्हणाला तसा "अर्धवट माहिती घेऊन काहीही बरळू नका" अशी काही दुसऱ्याची खिल्ली उडवणारी दीड शहाणपणाची वाक्यं फेकायची. विरोध व्यक्त करण्याचा आपण वापरतो त्यापेक्षा चांगली पद्धत असते हे लोकांच्या गावीही नसतं.
असो. माझे बिझिनेस कोच म्हणतात तसं "there is a way of living life.....And there is always better way of living life." विरोध करताना पण हे ध्यानी ठेवावं असं मला वाटतं. अर्थात नेहमीप्रमाणे..... आग्रह नाहीच.
(पोस्ट लिहिण्यासाठी दोन कारणं झालीत. एका संयमित अकौंट वर व्यासंग वाढवा...बरळू नका अशी एका फेक अकौंट ने दिलेली कॉमेंट पाहिली आणि योगायोगाने पोस्ट त्या गावाहून लिहितो आहे जिथून माझ्या मित्राचा फोन आला होता. जमलं तर त्याला भेटून आज संध्याकाळी कोकम सरबत पिताना त्याच्याशी चर्चा करावी म्हणतोय)
No comments:
Post a Comment