भारतातल्या एयरपोर्टचे कामकाज बघता बरेचदा "हे असं का?" हा प्रश्न पडतो. पण शेवटी शासनाची ह्यरारकी असते. नोकरशाही काही नियम बनवते आणि सी आय एस एफ ला ती फॉलो करावी लागते. त्यामुळे शक्यतो मी सी आय एस एफ च्या लोकांना ते निर्बुद्ध नियम पाळण्याबाबत हसत नाही इन फॅक्ट त्यांचं कौतुकच वाटतं. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर डीजी यात्रा हे ऍप शासनाने बनवलं आहे, त्याला रेफरन्स डीजी लॉकर चा घेतला जातो. पण जर काही कारणाने डीजी यात्रा ची सिस्टम बंद असेल आणि तुम्हाला मेन दरवाजातून जायचं असेल तर तुम्हाला डीजी यात्रा द्वारे प्रवेश मिळत नाही. तुम्हाला मोबाईल मधील किंवा प्रिंटेड बोर्डिंग पास आणि प्रिंटेड आय डी दाखवावं लागतं. तुम्ही कितीही हुज्जत घाला, सी आय एस एफ ऐकत नाहीच.
पण या गोष्टी भारतातच होतात असंही नाही. बाकी देशात पण अशा नोकरशाहीच्या गंमती आहेत.
यु एस व्हिसा असेल तर तैवान मध्ये ट्रॅव्हल ऍथोरायझेशन सर्टिफिकेट वर एंट्री मिळते जे ऑनलाईन प्रिंट करता येतं. त्यामध्ये माहिती भरताना आई वडिलांचे पण डिटेल्स द्यावे लागतात. त्या सेक्शन मध्ये पहिले ऑप्शन येतो अलाइव्ह ऑर डिसइज्ड. माझे वडील नाही आहेत त्यामुळे मी डिसइज्ड सिलेक्ट करतो. त्यानंतर त्यांचं नाव लिहावं लागतं, जे ठीक आहे. पण त्यांचा घरचा आणि मोबाईल नंबर पण द्यावाच लागतो. एस्टेरिक मार्क असतो, म्हणजे काहीतरी लिहावंच लागतं. आहे की नाही गंमत.
कालच अजून एक प्रकार कळला. यु एस व्हिसा वर तुम्ही तैवान मध्ये वर्षभरात सहा वेळा एंट्री करू शकता. सहाच का?, दोन किंवा पाच किंवा दहा का नाही, तर काहीच लॉजिक नाही.
चीनचा व्हिसा एक वर्षाचा देतात, पण पहिला व्हिसा हा सिंगल एंट्रीच असतो. अरे बाबांनो, सिंगल एंट्री व्हिसा द्यायचा असेल तर वर्षभराची मुदत कशाला देता. शेंगेन सारखा जितका काळ राहायचं आहे त्या पिरियड चा व्हिसा द्या ना. पण नाही. व्हिसा एक वर्ष, पण सिंगल एंट्री. दुसऱ्यांदा व्हिसा द्यायचा असेल तर डबल किंवा मल्टिपल एंट्री चालू होतो. का, तर कारण माहित नाही.
सगळ्यात हाईट माझी बँकॉक एअरपोर्ट ला झाली होती. माझ्या केबिन बॅगेत एक परफ्युम ची बॉटल होती. पारदर्शक होती. त्यात अगदी तळाला ३० एक एम एल परफ्युम उरला होता. मुंबई एअरपोर्ट वर विचारलं पण नाही. पण बँकॉक एअरपोर्ट वर ताई म्हणाली, ही परफ्युम बॉटल फेकून द्यावी लागेल. मी विचारलं, का? तर तिने नियम दाखवला कि १०० एम एल परफ्युम असलेली बॉटल नेता येणार नाही. मी तळाशी असलेल्या ३० एम एल परफ्युम कडे बोट दाखवत म्हणालो, हे इतकंच उरलं आहे, १०० एम एल पेक्षा खूप कमी आहे. तर तिने बॉटल वर १०० ml लिहिलेलं दाखवलं आणि म्हणाली १०० ml, नॉट अलाऊड. वर परत इंग्रजीचे वांदे. एक दोन वेळा सांगून पाहिलं तेव्हा मी बॉटल वर १०० एम एल लिहिलेली पण खरंतर ३० एम एल असणारी बॉटल तिथेच फेकून दिली.
असो. पण काही ठिकाणी हसू पण येतं, काही ठिकाणी मात्र ते फॉलो करणाऱ्या स्टाफ चं कौतुक पण वाटतं. जे आपल्या पण कंट्रोल मध्ये नाही आणि तो स्टाफ पण काही करू शकत नाही, तिथे आदळआपट करून काही फायदा नसतो, तर निमूटपणे जे नियम आहेत ते पाळण्यात शहाणपण असतं.
No comments:
Post a Comment