गिव्ह अप करणे आणि लेट गो करणे याचा मराठी अनुवाद एकच होतो "सोडून देणे". पण इंग्रजीचा शब्दाचा भावानुवाद केला तर अर्थ वेगळा आहे. गिव्ह अप करणे म्हणजे "हार मानून सोडून देणे" आणि लेट गो करणे म्हणजे "जे झालं ते झालं, पण मी दुसरा कुठला तरी मार्ग शोधेल, पण ज्याचा ध्यास आहे तो पूर्ण करेल" याची ग्वाही स्वतःला देणे. लेट गो करणे ही खरंतर तसं बघायला गेलं तर मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी फार महत्वाचा गुण आहे. गिव्ह अप करणं कदाचित प्रोफेशनल ग्रोथ साठी चांगलं नाही आहे.
लेट गो न करणे म्हणजे दोन गोष्टींवर आपण अडून राहतो. एकतर आपल्याला व्यक्तीवर अडकून बसतो किंवा आपल्याला वेळेचं प्रेशर असतं.
लेट गो न करणे हा माझा स्वतःचा अवगुण होता. आता बऱ्यापैकी त्यावर कंट्रोल आणला आहे. एखादी गोष्ट माझ्या मनाप्रमाणे नाही झाली, वर सांगितल्याप्रमाणे, किंवा एखाद्या व्यक्तीकडून, की प्रचंड अस्वस्थ व्हायचो. अजूनही थोडा होतो. पण वयोमानानुसार किंवा अनुभव घेऊन आता थोडी अस्वस्थता कमी झाली आहे. माझी मिसेस, वैभवी ही लेट गो करण्याच्या गुणाचा एपिटोम आहे. माझी जिथे लेट गो करण्याची क्षमता संपते तिथे तिची चालू होते. मुख्य म्हणजे एखादी व्यक्तीने आपल्याबरोबर न राहण्याचा निर्णय घेतला की काय घडलं याचा विचार करून डोकं कुरतडलं जायचं. किंवा एखादी गोष्ट एका ठराविक वेळेत नाही झाली की मला खूप त्रास व्हायचा. अगदी नुकताच असा त्रास एक प्लॉट विकण्याच्या प्रोसेस मध्ये झाला. पण शेवटी लेट गो केलं, गिव्ह अप नाही, आणि विचार केला की जेव्हा होईल तेव्हा होईल. मग माझी तडफड कमी झाली. पण त्याआधी खूप मानसिक डॅमेज झालं होतं. "कुछ तो मजबूरिया होगी, कोई यूँ ही बेवफा नहीं होता" हे कुणा व्यक्तीबद्दलच नव्हे तर नियतीला उद्देशून पण म्हणू शकतो. आणि या मजबूरिया आपल्याला माहितीच पाहिजे हा अट्टाहास ठेवायला नको याची जाणीव झाली.
या लेट गो प्रोसेस मध्ये "सोड ना यार, जे झालं ते झालं. काही तरी वेगळं आणि भारी होण्यासाठी हे घडत असेल" अशी भावना मनात येणं आणि मनाला रिलॅक्स करणं याची तुलना मी फक्त एका तळ्यात होती गाण्यामधल्या राजहंस आहे हे कळण्याच्या अवस्थेशी करू शकतो. "चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनों " या गाण्यात साहिर म्हणूनच गेला आहे
"तारुफ रोग बन जाये तो उसको भूलना बेहतर, ताल्लुक बोझ बन जाये तो उसको तोडना अच्छा,
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोड़ना अच्छा"
खूप फटके खाऊन शिकलो की परिस्थितीला निरोप देण्यात सुद्धा एक शान असावी. भविष्यात कधी भेटण्याची वेळ आली तेव्हा कालपटाचा धागा तुटत पुन्हा एकदा कॉफी मग एकत्र किंवा बियरचा ग्लास टिंग करत चियर्स म्हणण्याची मानसिकता हवी . कधी परिस्थिती रिजेक्ट करते, कधी एखादी माशूका अलविदा म्हणते तर कधी एखादा मित्र नाकारतो, ते ग्रेसफुली स्वीकारायला शिकायला हवं.
दुष्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे
अगर कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो
आता कुणालाही बांधून ठेवावंसं वाटत नाही. परिस्थितीला नाही, व्यक्तीला नाही, मित्रत्वाला नाही आणि दुश्मनीला तर नाहीच नाही. तसं केलं तर ते असुरक्षिततेच्या भावनेतून झालं की काय अशी स्वतः बद्दल शंका वाटते. आणि कुणाला "तू नही तो तो और सही, और नहीं तर और कही" असं म्हणत लेट गो केलं तर ९९% वेळा दोन्ही पार्टीचं भलंच होतं हे एव्हाना अनुभवातून शिकलो आहे. ठीकठाक व्यक्तिमत्व, नॉलेज मिळवण्याची भूक, त्याचं स्किल्स मध्ये बदलण्याचा ऍटिट्यूड, आणि त्याला मूलभूत सिद्धांताची जोड असेल तर ही दुनिया कुणासाठी बेरहम राहत नाही. आणि माझं स्वतःचं म्हणाल तर भरपूर इनिंग खेळून झाल्या आहेत, उन्हाळे पावसाळे पाहिलेत.
हम भी दर्या है, हमे अपना हुनर मालूम है
जिस तरफ भी चल पडेंगे रास्ता बन जायेगा
इंडस्ट्री मधे जवळपास ३५ वर्षे झालीत. परवा च एकाने प्रश्न विचारला की "लोकांनी तुमचं ऐकावं यासाठी तुम्ही वेगळं काय करता?" मी म्हणालो "काहीच करत नाही. फक्त फॉर्मल/इन्फॉर्मल संवादामध्ये आणि कृतीमध्ये समानशीलता पाळतो." त्यातून आयुष्य कधी यश देतं तर कधी अपयश देतं. अपयश आली तरी जेता मीच असतो कारण मला तिथे अनुभव मिळालेला असतो. जावेद अख्तर लिहून गेलेच आहेत
क्यो डरे जिंदगी में क्या होगा
कुछ ना होगा तो तजुर्बा होगा
असो. काही महिन्यापूर्वी डॉ विकास दिव्यकीर्ती यांचं भाषण ऐकलं होतं. तेव्हा काही नोट्स काढल्या होत्या. त्याचा विस्तार झाला तो असा.