नवीन वर्षाची सुरुवात मिश्र पद्धतीने झाली. काही चांगल्या गोष्टी झाल्या तर काही आव्हानं उभी राहिली. आव्हानामुळे तयार झालेल्या परिस्थितीला कसं तोंड दिलं ते स्थिरस्थावर झाल्यावर लिहीनच. आजची पोस्ट नवीन डेव्हलपमेंट बद्दल. थोडं तांत्रिक भाषा वापरून लिहिणार आहे. सांभाळून घ्या.
आमच्या फिल्ड मध्ये मेट्रोलॉजी साठी आणि उत्पादनासाठी काही उच्च दर्जाचे इक्विपमेंट लागतात, पर्यायाने ती प्रचंड किमती पण असतात. अतिशय बेसिक लेव्हल ची मेट्रोलॉजी इक्विपमेंट आणि मशिन्स च्या मदतीने आम्ही व्यवसाय चालू तर केला, पण आता वेळ अशी आली की आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे उत्पादन करायचे असेल तर त्याच तोडीचे दोन्ही इक्विपमेंट घेणं हे गरजेचं झालं होतं. त्याच विचारधारेतून आम्ही मागच्या वर्षी पुण्यातील ऍक्युरेट कंपनीचं सी एम एम (को ओर्डीनेट मेझरमेन्ट मशीन) विकत घेतलं. त्यालाच पूरक असं राउंडनेस टेस्टर विकत घेणं ही आमच्या कामाची गरज होती. टेलर हॉब्सन नावाची एक जगप्रसिद्ध ब्रिटिश कंपनी हे मशीन बनवते. पण त्याची नवीन मशीन ची किंमत ही आम्हाला परवडणारी नव्हती. पण मशीन तर घ्यायचीच होती.
मी यूज्ड मशीन च्या मार्केटचा धांडोळा घेतला. ऑगस्ट २०२३ पासून शोध घ्यायला चालू केलं. आणि शोधता शोधता एक मशीन स्वित्झर्लंड मध्ये एक वर्षाने ऑगस्ट २०२४ मध्ये सापडलं. इ मेल च्या माध्यमातून खूप चर्चा झाली. सेकन्ड हॅन्ड मशीन म्हणजे त्याच्या वर्किंग बद्दल साशंकता. शेवटी ऑर्डर द्यायच्या आधी एकतर स्वित्झर्लंड ला जाऊन किंवा ऑनलाईन डेमो द्यायचं ठरलं. म्युलर मशिन्स नावाच्या सेलर ने पण ते स्वीकारलं. यशस्वी ऑनलाईन डेमो नंतर आम्ही ते ऑर्डर केलं आणि डिसेंबर २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात कंपनीत आलं. आणि नवीन वर्षाची सुरुवात करताना ते चालू पण झालं.
आमच्या स्पिंडल क्षेत्रात पार्टस उत्पादनात ग्राइंडिंग प्रोसेस, ही शेवटची. ती अतिशय महत्वाची. कारण स्पिंडल चे प्रिसिजन हे त्यावर अवलंबून. या भागात सुद्धा आमच्याकडच्या सर्व मशिन्स एकतर मॅन्युअल किंवा फार तर सेमी ऑटोमॅटिक. दोन्ही प्रकारच्या मशिन्स मध्ये गुणवत्तेसाठी आम्ही झगडतो आणि उत्पादकतेबद्दल सुद्धा. याला पर्याय म्हणून काही युरोपच्या अतिशय उच्च दर्जाची गुणवत्ता असणाऱ्या मशिन्स उपलब्ध आहेत पण परत रडगाणं तेच. किंमत. त्या मशिन्स घेणं शक्यच नव्हतं.
इथे मग आम्ही तैवान उत्पादित मशीन घेण्याचं ठरवलं. इ टेक नावाच्या नवीन मशीन वर शिक्कामोर्तब केलं. ती मशीन सुद्धा डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात आली. आणि नवीन वर्षात तिचेही कमिशनिंग पूर्ण होईल.
या दोन्ही मशिन्समुळे आमची उत्पादन आणि गुणवत्ता क्षमता मध्ये कमालीची सुधारणा होणार आहे. स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रात अग्रेसर आहोतच, पण उत्पादनक्षेत्रात सुद्धा ती पोझिशन साध्य करण्याचा मनसुबा आहे. या आणि येणाऱ्या मशिन्स च्या मदतीने ते साध्य करू याचा विश्वास वाटतो.
अजून एका चांगल्या उपक्रमाबद्दल पुढच्या पोस्टमध्ये. धन्यवाद.
No comments:
Post a Comment