Friday, 31 January 2025

it's okay

मी काही इंग्लिश गाण्याचा भोक्ता वगैरे नाही आहे. म्हणजे कधी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. अगदीच काही जुनी गाणी लक्षात येतात कारण त्याचं इंग्रजी कळतं. पण तरीही कधी ब्रिटन किंवा अमेरिकन गॉट टॅलेंट बघतो. त्यातील काही समजतं तर काही प्रेझेंटेशन मधील भावना पोहोचते. 

असंच एक गाणं मी अमेरिकन गॉट टॅलेंट मध्ये बघतो. किमान शंभर वेळा तरी मी ते पाहिलं असेल. आणि दर वेळेला ते गाणं ऐकताना, बघताना माझा घसा दुखतो. 

गाणं म्हणणारी एक तिशीतली युवती आहे, जेन तिचं नाव. गाणं म्हणताना ती नाईटबर्ड नाव वापरते. स्टेज वर ती बोलायला चालू करते आणि पाश्चात्य पद्धतीप्रमाणे आपलं दुःख लागलीच सांगत नाही. बहुतेकदा या कार्यक्रमात आपापल्या नातेवाईकांबरोबर किंवा मित्रमंडळी बरोबर येतात. पण इथे ही जेन एकटीच आली आहे. ती ज्या पद्धतीने म्हणते की I am here by myself तेव्हा आपल्या हृदयात पण तुटतं.  बोलण्याच्या फ्लो मध्ये अगदी सहजतेने सांगून जाते की तिला कँसर आहे आणि आता सुद्धा तिच्या फुफ्फुस, मणका आणि लिव्हर मध्ये मेट्स आहेत. (इतके प्रॉब्लेम असूनही) तुझ्या चेहऱ्यावर इतकं तेज कसं काय, हे म्हंटल्यावर ती सहजतेने म्हणते Its important that everyone knows I am so much more than the bad things happen to me. 

ती गाणं म्हणायला सुरु करते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मिलियन डॉलर स्माईल येतं. आणि नंतर ती जे म्हणते, आपल्याला जाणवतं की ती फक्त तिच्यासाठी गाते आहे. गाण्याचे शब्द आणि तिचा अत्यंत तरल आवाज, हे एक अप्रतिम कॉम्बिनेशन असतं. 

I moved to California in the summertime
I changed my name, thinkin' that it would change my mind
I thought that all my problems, they would stay behind
I was a stick of dynamite and it just was a matter of time, yeah

ती आपलं गाव सोडून उपचारासाठी कॅलिफोर्नियाला आली आहे. नावही तिने बदललं आहे. तिला वाटतं की माझे प्रश्न संपतील, पण नाही, तिला माहित झालं आहे की आता फक्त काही काळाची सोबत आहे.

It's okay, it's okay, it's okay, it's okay
If you're lost
We're all a little lost and it's alright
It's okay, it's okay, it's okay, it's okay
If you're lost
We're all a little lost and it's alright

आयुष्याची लढाई जरी हरावी लागली तरी ठीक आहे. आपल्याला कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पराभवाचा सामना करावा लागतो, ते ही ठीकच आहे.

Oh dang, oh my, now I can't hide
Said I knew what I wanted, but I guess I lied

ती कबुली देते की मी आयुष्याकडून काय हवं ते मला माहित होतं असं मला वाटायचं पण बहुतेक मी स्वतःशी खोटं बोलत होते.

it's alright
To be lost sometimes

असं म्हणत आपल्या मुलायम आवाजात ती गाणं संपवते आणि त्या तीन चार हजार लोक असलेल्या हॉल मध्ये टाचणी आवाज करेल इतकी शांतता दोन सेकंदासाठी पसरते. नंतरच्या टाळ्यांपेक्षा ही शांतता तिच्या गाण्याला मिळालेली खरी पावती असते. सायमन कॉवेल सारखा इतर वेळेस धीरोदात्त जज सुद्धा मनातून हलतो. तो म्हणतो सुद्धा की तुझा संघर्ष ज्या सहजतेने सांगत गेलीस ते स्तिमित करणारं होतं. त्यावर ती जे उत्तर देते ते जीवन मृत्यू कोळून पिलेल्या एखाद्या तत्वज्ञापेक्षा कमी नसतं. ती म्हणते "You can't wait unless life is not hard anymore before you decide to be happy" आयुष्यात खुश राहण्याचा निर्णय घेण्यासाठी अजून कुठली परीक्षा घेण्याची मी कशासाठी वाट पाहू.

गाणं संपल्यावर ती बॅक स्टेज मध्ये येऊन म्हणते की मी जगण्याची २% शक्यता आहे. पण २% म्हणजे शून्य नाही. ही २% जगण्याची आशा पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.

सात एक मिनिटांचा हा व्हिडीओ संपल्यावर दोन मिनिटे मला काहीच बोलावंसं वाटत नाही. जेनच्या प्रश्नासमोर अत्यंत खुजे असणाऱ्या पण मला स्वतःला खूप मोठे वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी तयार होतो.

No comments:

Post a Comment