Wednesday, 5 February 2025

मुलगा अतिशय प्रसिद्ध इंजिनियरिंग कॉलेज मधून मेकॅनिकल इंजिनियर झालेला. घरच्या व्यवसायात एक वर्ष हातभार लावला. मग परत एका चांगल्या कॉलेज मधून एम बी ए झाला. 

मला जॉब साठी फोन केला तेव्हा हा मेकॅनिकल इंजिनियर आणि एम बी ए मुलगा एका कन्स्ट्रक्शन कंपनीत मार्केटिंग इंटर्न म्हणून काम करत होता. त्याने फोन केल्यावर मी त्याला पहिले ही भानगड विचारली की मेकॅनिकल केल्यावर कन्स्ट्रक्शन कंपनीत का काम करतो आहेस? त्यावर त्याने कुठे जॉब मिळत नाही म्हणून जो मिळाला तो घेतला हे सांगितलं. 

मी म्हणालो, ते ही ठीक आहे, पण घरच्या व्यवसायाला का पुढे नेत नाही? तर म्हणाला की लहान आहे व्यवसाय आणि खूप चॅलेंजेस आहेत. 

मी म्हणालो, मी जॉबसाठी तुझा इंटरव्ह्यू घेईल पण त्या आधी घरचा व्यवसाय का पुढे नेऊ नाही शकत याची मला समाधानकारक उत्तरं दे. ती मिळाली तर मी पुढे जाणार नाही. 

फोन ठेवताना तो मुलगा म्हणाला "इतके इंटरव्ह्यू झाले माझे. पण व्यवसायात काय आव्हानं आहेत आणि तो पुढे का चालवत नाही यावर कुणी चर्चा केली नाही."

बहुतेक त्याच्या टोन मध्ये कौतुक असावं. पण त्याला बिचार्याला काय माहित की मी आणि माझा बिझिनेस पार्टनर वाघेला यांनी उभ्या केलेल्या बिझिनेस कडे आमची पुढची पिढी ढुंकूनही बघत नाही. आणि त्याचा बदला म्हणून ज्यांच्या घरात व्यवसाय आहे, ते जॉब मागायला आले की त्यांनी घरातल्या व्यवसायाला पुढे न्यावं यासाठी अर्ध्या एक तासाचं लेक्चर घेतो. 

पण खरंच सांगतो, माझ्या या प्रयत्नाला अजून एकदाही यश मिळालं नाही. हा तरी मुलगा इंटरव्ह्यू झाल्यावर घरी जाऊन आई वडिलांना "मी घरच्या व्यवसायात जॉईन होतो" असं सांगतो का हे बघायचं आहे. 

No comments:

Post a Comment