Tuesday, 9 September 2025

इंद्रा नूयी

"तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येईल की तुमच्या एका बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष तर दुसऱ्या बाजूला भारताचे पंतप्रधान असतील" असं लहानपणी इंद्रा कृष्णमूर्ती हिला सांगितलं असतं तर तिने हे म्हणणाऱ्याला एकतर वेडं म्हंटलं असतं किंवा ते बोलणं हसण्यावारी नेलं असतं. पण हे घडलं. २००९ साली पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना अमेरिकन उच्च पदस्थांची ओळख करून देताना अध्यक्ष बराक ओबामा एका स्त्री जवळ थांबले आणि मनमोहन सिंग यांना म्हणाले "या इंद्रा नूयी, पेप्सीको च्या सी इ ओ" तेव्हा श्री सिंग म्हणाले "पण या तर आमच्या आहेत". तेव्हा ओबामा हसत म्हणाले "त्या आता आमच्या सुद्धा आहेत." 

हे ऐकत असताना इंद्रा नूयी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या इंद्रा कृष्णमूर्ती या स्मितहास्य करत जगातल्या दोन नेत्यांशी हस्तांदोलन करत होत्या. त्या हास्यामागे त्यांची अमेरिकेतील ३० वर्षाची कडी मेहनत होती आणि त्याबरोबर त्यांच्या अंगभूत हुशारीची उभरत्या वयात झालेली जडणघडण. 

इंद्राचा जन्म मद्रास मध्ये, आजचे चेन्नई, एका अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत घरात झाला. एकत्र कुटुंबपद्धती असलेल्या या घरात लोकांचा गोतावळा मोठा. अनेक भाऊ बहिणींच्या मांदियाळीत इंद्रा चं बालपण हसत खेळत गेलं. 

तिचे आजोबा श्री नारायण सर्मा हे निवृत्त न्यायाधीश होते. त्यांच्यामुळे घरात शिक्षणासाठी पोषक वातावरण होतं. त्यामुळे इंद्रा, चंद्रिका आणि नंदू या तिघांनाही वाचनाची आवड सुरुवातीपासून होती. एकुणात इंद्राच्या आयुष्यावर तिच्या आजोबांचा, ताथा म्हणायचे त्यांना, विलक्षण प्रभाव होता. अत्यंत विचारपूर्वक त्यांनी आपल्या नात नातवांची जडणघडण केली होती. १९७५ साली जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा २० वर्षाची इंद्रा कोलमडून गेली होती. 

इंद्राचे आईवडील हे एकमेकांना पूरक दाम्पत्य होतं. घरातील सर्व काम आई, म्हणजे शांथा, करायच्या तर गणितात पोस्ट ग्रॅज्युएट असणारे वडील, श्री कृष्णमूर्ती, हे बँकेत अधिकारी होते. लौकिकार्थाने कुटुंब श्रीमंत नव्हतं पण संपन्न होतं. या सर्व वडीलकीच्या संस्काराबरोबर जगण्यातील सर्व गोष्टींचा म्हणजे संगीत, नाट्य, नृत्य, खेळ याचा आस्वाद घेत इंद्राचं बालपण फुलत होतं. घरामध्ये आपलं मत व्यक्त करण्याची मुभा होती (जे त्या काळात फारसं प्रचलित नव्हतं). 

इंद्रा ही हुशार आणि आपलं मत निर्भीडपणे व्यक्त करणारी मुलगी होती. लहानपणापासूनच तिचं दिसणं हे टॉम बॉय प्रमाणे असायचं. "तुला नवरा कोण देणार?" असं म्हणत नातेवाईक चिडवायचे सुद्धा. होली एंजल्स या कॉन्व्हेंट शाळेत इंद्रा शिक्षणाबरोबर खेळ आणि वक्तृत्वस्पर्धा यात हिरीरीने सहभागी व्हायची. आठवीत असतानाच इंद्रा दिल्लीला युनायटेड स्कुल्स ऑर्गनायझेशन आयोजित एका कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. दहावीत असताना इंद्रा घरच्यांच्या मनाविरुद्ध गिटार शिकली आणि त्या काळात आपल्या तीन मैत्रिणीसह, मेरी, ज्योती, हेमा, ऑल गर्ल्स बँड काढला, ज्याची त्या काळात मद्रास मध्ये खूप चर्चा झाली होती. त्याचं नाव होतं लॉगरिदम. त्याचे तीन वर्षे प्रयोग पण झाले. 

पुढे इंद्रा मद्रास ख्रिस्तीयन कॉलेज मध्ये गेली. तिथे रसायनशास्त्र मुख्य विषय घेत पदवी साठी शिक्षण चालू झाले. एम सी सी मध्ये तिने महिला क्रिकेट टीम उभी केली आणि इतकंच नव्हे तर चार कॉलेजेस ला अशी टीम उभी करण्यास प्रवृत्त करून मद्रास मध्ये पहिली महिला क्रिकेट स्पर्धा भरवली. 

मद्रास ख्रिस्तीयन कॉलेज मधून पास आउट झाल्यावर इंद्रा बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत आय आय एम मध्ये दाखल झाल्या. फरक एकच होता, मोठी बहीण आय आय एम अहमदाबाद तर इंद्रा कोलकता मध्ये. त्या एम बी ए प्रोग्रॅम मध्ये इंद्रा आणि इतर ५ मुली होत्या. बाकी १९५ मुलं. साल होतं १९७४. 

एम सी सी आणि आय आय एम कोलकाता मधून इंद्रा अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक कार्यक्रमात झळकत राहिली. त्यातही चर्चात्मक वक्तृत्व स्पर्धेत इंद्राचा हिरीरीने सहभाग असायचा. कदाचित हेच गुण पुढे जेव्हा त्या द इंद्रा नूयी बनल्या आणि अनेक लीडर शिप रोल त्यांनी निभावले, त्याकामी उपयोगात आले. त्याची व्याप्ती इतकी मोठी होती की तरुण वयात इंद्रा पंतप्रधान इंदिरा गांधी किंवा विख्यात अर्थतज्ञ नानी पालखीवला यांच्याशी संवाद साधू शकल्या. बालपणी झालेल्या संस्कारातून आणि नंतरच्या अभ्यासामुळे तरुण इंद्रा राष्ट्रीय प्रश्नावर मतं मांडू शकतील इतक्या प्रगल्भ आणि बुद्धिमान झाल्या होत्या. 

आय आय एम च्या पहिल्या वर्षानंतर मुंबईच्या बी ए आर सी मध्ये इंटर्नशिप केल्यावर इंद्रा ने मार्केटिंग हा मेजर विषय घेत मास्टर्स डिग्री मिळवली आणि कॅम्पस इंटरव्ह्यू मधून त्यांची निवड झाली ती मद्रासस्थित मेत्तुर बर्डसेल या कंपनीत. व्यवसाय होता टेक्स्टाईल इंडस्ट्री साठी धागे पुरवणे. आणि इथेच तिची ओळख झाली ब्रिटिश नॉर्मन वेड, जे कंपनीचे सर्वेसर्वा होते. श्री वेड यांनी पहिल्यांदा इंद्रा ला अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याबद्दल सांगितलं.मेत्तुर बर्डसेल मध्ये त्यांना स्वतःच्या स्किल्स ची जाणीव झाली आणि दिलेलं काम त्या यशस्वी पणे पूर्ण करू शकतात हा आत्मविश्वास दिला. 

१९७७ साली दक्षिण भारतात टेक्स्टाईल इंडस्ट्री मध्ये संप झाला. आणि मेत्तुर बर्डसेल मध्ये काही काम उरलं नाही. त्यावेळेस इंद्रा मुंबईत जॉन्सन अँड जॉन्सन मध्ये हेल्द केअर प्रॉडक्टस, स्टे फ्री आणि केअर फ्री, च्या सेल्स मध्ये जॉईन झाल्या. इथे त्या पहिल्यांदा अमेरिकन मॅनेजमेंटबरोबर काम करू लागल्या. तिथं त्यांची सेल्स ची करिअर बहरत होती. 

पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं. एका सुट्टीसाठी मद्रास मध्ये असताना त्यांच्या नजरेला अमेरिके तील येल विद्यापीठाच्या एम बी ए कोर्स बद्दल लेख आला. त्यांच्या अनेक मित्र मैत्रिणी अमेरिकन ड्रीम बघायला आले पण होते. इंद्राने येल विद्यापीठासाठी अर्ज केला.अनपेक्षित रित्या त्यांना स्कॉलरशिप सकट ऍडमिशन मिळाली. इंद्रा आणि तिचे कुटुंबीय द्विधा मनस्थितीत होते. त्यात भर पडली ती मेत्तुर बर्डसेल परत चालू झाल्यामुळे नॉर्मन वेड, जे इंद्राच्या कामाच्या पद्धतीने प्रभावित झाले होते, यांनी इंद्राला पूर्ण व्यवसाय सांभाळण्याची ऑफर केली. 

हा तिढा नॉर्मन वेड यांनीच सोडवला. इंद्राने जेव्हा त्यांना येल युनिव्हर्सिटी च्या ऍडमिशन बद्दल सांगितले तेव्हा त्यांनी इंद्राच नव्हे तर कुटुंबियांना सुद्धा अमेरिकेत जाण्याबद्दल उद्युक्त केलं. 

१९७८ मध्ये इंद्रा कृष्णमूर्ती येल विद्यापीठात स्कुल ऑफ ऑरगनायझेशन अँड मॅनेजमेंट या नवीनच उघडलेल्या शिक्षण दालनात प्रवेश करती झाली. 

असंख्य प्रश्नांना तोंड देत, आव्हानं स्वीकारत, प्रचंड कष्ट करत इंद्रा यांनी  येल विद्यापीठाची मास्टर्स डिग्री मिळवली. लौकिकार्थाने ही त्यांची दुसरी मास्टर्स डिग्री. पण आय आय एम कोलकता आणि येल विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात खूप फरक होता. येल मध्ये प्रॅक्टिकल केस स्टडीज वर जास्त भर होता. भारताच्या मद्रास वरून आलेली तरुणी येल विद्यापीठातून अमेरिकेत आपलं स्वप्न साकारण्यासाठी तावून सुलाखून बाहेर पडत होती. 

इंद्रा कृष्णमूर्ती कॉर्पोरेट जग गाजवण्यासाठी सज्ज होताना त्यांची इंटर्नशिप होती शिकागो येथील कन्सल्टिंग फर्म मध्ये. नाव होतं बूझ अॅलन हॅमिल्टन. त्यांची पहिली असाइनमेंट होती इंडियाना स्टेट मधील एका अन्न प्रक्रिये संबंधित व्यवसायाची नीती धोरण आखणे. हे सगळं घडत असताना इंद्रा यांची  राज नूयी या स्मार्ट तरुणाशी. राज तेव्हा इटन नावाच्या इंजिनियरिंग कंपनीत काम करत होते. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याची परिणीती प्रेमात झाली. लवकरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि इंद्रा कृष्णमूर्ती या इंद्रा नूयी झाल्या. या समांतर घटना घडल्या १९८० मध्ये. 

पूर्ण मास्टर्स झाल्यावर इंद्रा नूयी जगप्रसिद्ध बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी) मध्ये रुजू झाल्या. बीसीजी तील त्यांची सहा वर्षे ही अनेक कडू गोड घटनांची साक्षीदार होती. त्याच काळात इंद्रा यांचे वडील श्री कृष्णमूर्ती यांचं निधन झालं. पण हे दुःख पचवताना इंद्रा आणि राज यांचं पहिलं अपत्य प्रिथा जन्माला आली. १९८६ मध्ये इंद्रा यांचा एक मोठा कार अपघात झाला. पण हे सगळं घडत असताना बीसीजी मध्ये त्यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं ते आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर. पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे इंद्रा जेव्हा कामावर असायच्या तेव्हा अमेरिकेत तुफान भ्रमंती करायच्या. कदाचित हेच कारण असावं की वडिलांचं निधन आणि कार अपघात या दोन्ही प्रसंगी बीसीजी त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिली. 

बीसीजी च्या वर्क प्रोफाइल मध्ये तक्रार करायला काहीच जागा नव्हती. पण एक हेड हंटिंग कंपनी इंद्रा यांना एक इंटरव्ह्यू अटेंड करण्यासाठी खूप मागे लागली होती. खूप फॉलो अप झाल्यावर शेवटी इंद्रा तो इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार झाल्या. कंपनी होती मोटोरोला. तिथे इंटरव्ह्यू दरम्यान ओळख झाली गेरहार्ड ब्ल्यूमेयर यांच्याशी. राज यांच्याबरोबर चर्चा करत इंद्रा यांनी ती जॉब ऑफर स्वीकारली. आणि पुढील आठ वर्षात गेरहार्ड यांच्या मेंटरशिप खाली एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून आपलं स्थान बळकट केलं. आव्हानं होतीच. प्रिथा पण मोठी होत होती. राज यांचं करिअर पण जोरात चालू होतं. या सगळ्या दरम्यान मोटोरोला ची नीती ध्येय धोरणे आखण्यामागे इंद्रा यांचा लक्षणीय सहभाग होता. स्ट्रॅटेजिस्ट म्हणून इंद्रा यांचं नाव अमेरिकन कॉर्पोरेट क्षेत्रात दुमदुमायला लागलं होतं. 

सगळं व्यवस्थित चालू होतं. पण बदल तर घडतात. त्या न्यायाने गेरहार्ड यांनी मोटोरोला ला अलविदा करत आपल्या मूळ देशात आसिया ब्राऊन बोव्हरी (एबीबी) नावाची प्रसिद्ध कंपनी जॉईन केली. आठ वर्षाच्या काळात गेरहार्ड इंद्रा यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित झाले होते. म्हणून त्यांनी इंद्रा यांना एबीबी चा अमेरिकेतील व्यवसाय सेट व्हावा यासाठी पाचारण केलं. एबीबी च्या कार्यकाळात त्यांना दुसरी मुलगी झाली, तारा. इंद्रा आपलं करिअर आणि दोन्ही मुलींना मोठं करणं यामुळे खूप व्यस्त झाल्या. त्यांची आई शांता त्याच्या मदतीला आल्या होत्या. इंद्रा यांचा व्यावसायिक आलेख वर जात होता. पण एबीबी च्या व्यवस्थापनात अनेक बदल झाले आणि इंद्रा यांनी तिला अलविदा करत अशा कंपनीत जॉईन झाल्या ज्याने त्यांना केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगाच्या पटलावर ओळख दिली. 

कंपनीचं नाव होतं, पेप्सिको आणि दिवस होता ३० मार्च १९९४. 

आव्हान तर स्वीकारलं होतं. बदल तर मोठा होता. गेली १४ वर्षे त्या इंजिनियरिंग क्षेत्रात कार्यरत होत्या आणि पेप्सिको होती फूड अँड बेव्हरेज क्षेत्रातील एक धुरंधर कंपनी. पेप्सिको तील कार्यसंस्कृती आणि त्या नोकरीतून त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी ही इंद्रा यांच्या व्यक्तिमत्वाला पूरक ठरली. पेप्सिको ही त्या काळात अमेरिकेतील पंधरावी मोठी कंपनी होती आणि जगभरात त्यांचे ४५०००० कर्मचारी काम करत होते. इंद्रा यांचा आत्मविश्वासपूर्ण वावर चालू झाला आणि पेप्सिको मध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या स्वीकारत गेल्या. अनेक देशातले बिझिनेस प्लॅन्स, महत्वाचे टेक ओव्हर्स, मर्जर्स इंद्रा नूयी यांच्या अभ्यासपूर्ण सल्ल्याने पूर्ण झाले. त्याची परिणीती जी व्हायची तीच झाली. एकविसावं शतक उजाडताना इंद्रा या पेप्सिको च्या प्रेसिडेंट झाल्या. इंद्रा आता अजून जोमाने काम करू लागल्या. कंपनीचं विमान त्यांच्या दिमतीला होतं. अमेरिकेतच नव्हे तर जगभरात त्यांचे झंझावती दौरे चालू असायचे. 

२००६ साली ती अद्भुत घोषणा झाली. इंद्रा नूयी पेप्सिको या जगड्व्याळ कंपनीच्या पहिल्या स्त्री सीईओ म्हणून विराजमान झाल्या. त्याशिवाय त्या पहिल्या इमिग्रंट आणि ब्राऊन कलर सीईओ झाल्या. अनेक अर्थाने इंद्रा यांची कामगिरी ऐतिहासिक होती. आणि भारत सरकारने पुढच्याच वर्षी म्हणजे २००७ साली त्यांना पदमभूषण पुरस्काराने गौरान्वित केलं आणि त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीचं यथोचित कौतुक केलं. त्या काळात अजून एक गौरवाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील फॉर्च्युन ५०० कंपनीत फक्त ११ स्त्री सीईओ होत्या, अन त्यापैकी एक होत्या इंद्रा नूयी. 

पुढील १३ वर्षात पेप्सिको ने इंद्रा यांच्या नेतृत्वाखाली आकाशाला गवसणी घालणारी कामगिरी केली. सेल्स, प्रॉफिट, मार्केट कॅप, इन्व्हेस्टर रिटर्न्स या प्रत्येक व्यावसायिक मेझर्स मध्ये पेप्सिको ने लक्षणीय वृद्धी केली. पण इंद्रा यांच्या कारकिर्दीचं सगळ्यात आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पी डब्ल्यू पी प्रोग्रॅम. परफॉर्मन्स विथ पर्पज. पेप्सिको ची उत्पादनं ही तब्येतीस हानिकारक आहेत हा आरोप वर्षानुवर्षे होत होता. त्याला उत्तर देण्यासाठी पी डब्ल्यू पी या कार्यक्रमाद्वारे पेप्सीकोने आपल्या उत्पादनाच्या हेल्दी कंटेंट मध्ये खूप सुधारणा केली. या कारकिर्दीत इंद्रा नूयी यांना अनेक पुरस्कार मिळाले, मानसन्मान मिळाले. 

२०१८ साली आपल्या एकूण कारकिर्दीची चाळीस वर्षे, आणि पेप्सिको मध्ये २४ वर्षे पूर्ण केल्यावर इंद्रा नूयी या पेप्सिको च्या सी इ ओ या पदावरून सन्मानाने पायउतार झाल्या. 

इंद्रा नूयी यांच्या झळाळत्या कारकिर्दीबद्दल वाचताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवल्या. घर आणि अत्यंत व्यस्त जबाबदारीची नोकरी करताना त्यांची चांगलीच कसरत झाली. एक किस्सा त्यांनी अनेक ठिकाणी सांगितला की पेप्सिको च्या प्रेसिडेंट झाल्यावर त्या अत्यंत उत्साहात घरी गेल्या तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. आणि त्यांना ही खुशखबरी घरी सांगायची होती. त्यांनी घरात प्रवेश करताना ही बातमी आईला सांगितली. तर त्या बातमीकडे फारसे लक्ष न देता त्यांची आई इंद्रा यांना म्हणाली की घरातील दूध संपलं आहे. ते आधी घेऊन ये. इंद्रा साहजिक आहे, नाराज झाल्या. त्या आईला म्हणाल्या सुद्धा "मी इतकी आनंदाची बातमी घेऊन आले आणि त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत तू मला दूध आणायला सांगितले हा  अन्याय नाही का?" त्यावर त्यांची आई म्हणाली "घरात येताना तो तुझा राजमुकुट गॅरेज मध्ये सोडायचा. इथे घरात तू आधी तुझ्या नवऱ्याची बायको, मुलींची आई आणि माझी मुलगी आधी आहेस. मग तुझी पेप्सिको ची पोझिशन". त्यांच्या यशस्वीतेचा विचार करताना त्यांचे पती श्री राज नूयी यांनी जी सपोर्ट सिस्टम उभी केली ती कौतुकास्पद आहे. मला खात्री आहे की इंद्रा यांची कारकीर्द बहरावी यासाठी त्यांनी स्वतःच्या घौडदौडीला लगाम घातला असावा. 

पेप्सिको मधून निवृत्ती घेतल्यावर सुद्धा इंद्रा  अमेरिकेत खूप व्यस्त  आयुष्य जगत आहेत. अनेक कंपन्यांच्या बोर्ड वर त्या सल्लागार म्हणून काम करतात. 

अमेरिकन कंपनीची सीईओ म्हणून एकदा इंद्रा यांना इंग्लंड मध्ये आमंत्रित केलं होतं. हाय प्रोफाइल चर्चेत इंग्लंडचे पंतप्रधान पण त्यावेळी सामील होते. त्यांनी नूयी यांना विचारलं की "तुम्ही ३० वर्षांपूर्वी इंग्लंड ला न येता अमेरिकेला का गेल्या?" हजरजबाबी इंद्रा पटकन म्हणाल्या "मी इंग्लंडला आले असते तर आज तुमच्या बरोबर जेवायचं निमंत्रण मिळालं नसतं." अमेरिकेतील संधी आणि त्या काळातील प्रगतीशील इकॉनॉमी चं सार त्या उत्तरात दडलं होतं. 

कर्माने अमेरिकन आणि मनाने अजूनही जिथे जन्म झाला त्या भारताची कास धरून ठेवलेल्या पद्मभूषण इंद्रा नूयी यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा