Monday, 30 December 2024

2025

 काही दिवसांपूर्वी आमच्या कंपनीत लीडरशिप ट्रेनिंग देण्यासाठी निवृत्त मेजर जनरल नीरज बाली सर आले होते. त्यांचं ट्रेनिंग संपल्यावर मी त्यांना प्रश्न विचारला की लीडरशिप चे ऍट्रिब्युटस जे त्यांनी सांगितले ते प्रत्येक ट्रेनर, मेंटॉर सांगत असतो. अगदी पुण्यातील कुणी प्रथितयश उद्योजक घ्या, कोच घ्या, किंवा राष्ट्रीय स्तरावर गाजलेला ट्रेनर घ्या किंवा अगदी जागतिक स्तरावरचे सायमन सिनेक किंवा जॉन कॉलिन्स किंवा झिग झिगलर असं कुणालाही ऐकलं तरी लीडरशिप फुलवण्याचे मुद्दे सगळे सारखे असतात. 

माझा प्रश्न हा होता की इतके सगळे नावाजलेले गुरु हे सांगत असले तरी ७०% लोकांना त्यावर काम करावंसं वाटत नाही. व्यावसायिक नॉलेज सातत्याने अपग्रेड करणे, निर्णयक्षमता वाढवणे, पक्षपात न करता न्यायिक भावना ठेवणे, नैतिक आणि मानसिक धैर्य असणे, कामाप्रती एकनिष्ठ असणे, समाजाप्रती किंवा एकंदरीत मनुष्य जमातीबद्दल सजग आणि संवेदनशील असणे, विनोदबुद्धी जागृत ठेवणे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे पराकोटीची स्वयंशिस्तता आणि निष्कलंक चारित्र्य या लीडरच्या क्वालिटी आहेत. जगातल्या यच्चयावत यशस्वी उद्योजकांच्या आयुष्याचा अभ्यास केला तर हे गुण प्रकर्षाने समोर येतात. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं अवलोकन करून गुणमापन सातत्याने करणे आणि त्यात सुधारणा करणे हे या यशस्वी लोकांचं वैशिष्ट्य.  आणि हे प्रत्येक जण सांगतो. पण लोकांना मात्र या गुणांना आपलेसे करावे वाटत नाही. काय कारणं असावीत?

मेजर जनरल साहेबांनी सांगितलं की जगातल्या बहुसंख्य लोकांचा या थेअरी वर मुळात विश्वासच नाही. आजूबाजूला घडणाऱ्या प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्याच्या शॉर्टकट कडे लोक आकृष्ट होतात आणि हा जो अवघड मार्ग आहे तो कशासाठी घ्यायचा हा विचार वरील विचारांवर सातत्याने मात करत आला आहे. 

त्यांनी दुसरं कारण सांगितलं की लोकांना वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे. कधीतरी शिकू की, इतकी काय घाई आहे. हे एक शाश्वत सत्य आहे की आपण सर्व लक्झरीचा, छानछोकीच्या गोष्टींचा असा आस्वाद घेतो की जणू आपण उद्या मरणार आहोत, आणि ज्या गोष्टींमुळे आपलं व्यक्तिमत्व विकसित होतं त्यावर काम करताना मात्र आपल्याला वाटतं की काय घाई आहे, अख्ख आयुष्य पडलं आहे. काय परफेक्ट सांगितलं त्यांनी "We consume luxury so hurriedly, as if we are going to die tomorrow. And we refrain working on all important things for life as if there are so many years lying ahead." 

असो. येणाऱ्या २०२५ आणि नंतरच्या आयुष्यात आपली व्यावसायिकता, उत्पादकता, कौशल्यं यांचा विकास कसा होईल त्यावर साक्षेपी विचार करेल असं आश्वासन नी मेजर जनरल साहेबांना दिलं. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्या मी तुमच्या पर्यंत पोहोचवतो. 

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 


Tuesday, 10 December 2024

एयरपोर्टचे कामकाज

 भारतातल्या एयरपोर्टचे कामकाज बघता बरेचदा "हे असं का?" हा प्रश्न पडतो. पण शेवटी शासनाची ह्यरारकी असते. नोकरशाही काही नियम बनवते आणि सी आय एस एफ ला ती फॉलो करावी लागते. त्यामुळे शक्यतो मी सी आय एस एफ च्या लोकांना ते निर्बुद्ध नियम पाळण्याबाबत हसत नाही इन फॅक्ट त्यांचं कौतुकच वाटतं. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर डीजी यात्रा हे ऍप शासनाने बनवलं आहे, त्याला रेफरन्स डीजी लॉकर चा घेतला जातो. पण जर काही कारणाने डीजी यात्रा ची सिस्टम बंद असेल आणि तुम्हाला मेन दरवाजातून जायचं असेल तर तुम्हाला डीजी यात्रा द्वारे प्रवेश मिळत नाही. तुम्हाला मोबाईल मधील किंवा प्रिंटेड बोर्डिंग पास आणि प्रिंटेड आय डी दाखवावं लागतं. तुम्ही कितीही हुज्जत घाला, सी आय एस एफ ऐकत नाहीच. 

पण या गोष्टी भारतातच होतात असंही नाही. बाकी देशात पण अशा नोकरशाहीच्या गंमती आहेत. 

यु एस व्हिसा असेल तर तैवान मध्ये ट्रॅव्हल ऍथोरायझेशन सर्टिफिकेट वर एंट्री मिळते जे ऑनलाईन प्रिंट करता येतं. त्यामध्ये माहिती भरताना आई वडिलांचे पण डिटेल्स द्यावे लागतात. त्या सेक्शन मध्ये पहिले ऑप्शन येतो अलाइव्ह ऑर डिसइज्ड. माझे वडील नाही आहेत त्यामुळे मी डिसइज्ड सिलेक्ट करतो. त्यानंतर त्यांचं नाव लिहावं लागतं, जे ठीक आहे. पण त्यांचा घरचा आणि मोबाईल नंबर पण द्यावाच लागतो. एस्टेरिक मार्क असतो, म्हणजे काहीतरी लिहावंच लागतं. आहे की  नाही गंमत. 

कालच अजून एक प्रकार कळला. यु एस व्हिसा वर तुम्ही तैवान मध्ये वर्षभरात सहा वेळा एंट्री करू शकता. सहाच का?, दोन किंवा पाच किंवा दहा का नाही, तर काहीच लॉजिक नाही. 

चीनचा व्हिसा एक वर्षाचा देतात, पण पहिला व्हिसा हा सिंगल एंट्रीच असतो. अरे बाबांनो, सिंगल एंट्री व्हिसा द्यायचा असेल तर वर्षभराची मुदत कशाला देता. शेंगेन सारखा जितका काळ राहायचं आहे त्या पिरियड चा व्हिसा द्या ना. पण नाही. व्हिसा एक वर्ष, पण सिंगल एंट्री.  दुसऱ्यांदा व्हिसा द्यायचा असेल तर डबल किंवा मल्टिपल एंट्री चालू होतो. का, तर कारण माहित नाही. 

सगळ्यात हाईट माझी बँकॉक एअरपोर्ट ला झाली होती. माझ्या केबिन बॅगेत एक परफ्युम ची बॉटल होती. पारदर्शक होती. त्यात अगदी तळाला ३० एक एम एल परफ्युम उरला होता. मुंबई एअरपोर्ट वर विचारलं पण नाही. पण बँकॉक एअरपोर्ट वर ताई म्हणाली, ही परफ्युम बॉटल फेकून द्यावी लागेल. मी विचारलं, का? तर तिने नियम दाखवला कि १०० एम एल परफ्युम असलेली बॉटल नेता येणार नाही. मी तळाशी असलेल्या ३० एम एल परफ्युम कडे बोट दाखवत म्हणालो, हे इतकंच उरलं आहे, १००  एम एल पेक्षा खूप कमी आहे. तर तिने बॉटल वर १०० ml लिहिलेलं दाखवलं आणि म्हणाली १०० ml, नॉट  अलाऊड. वर परत इंग्रजीचे वांदे. एक दोन वेळा सांगून पाहिलं तेव्हा मी बॉटल वर १०० एम एल लिहिलेली पण खरंतर ३० एम एल असणारी बॉटल तिथेच फेकून दिली. 

असो. पण काही ठिकाणी हसू पण येतं, काही ठिकाणी मात्र ते फॉलो करणाऱ्या स्टाफ चं कौतुक पण वाटतं. जे आपल्या पण कंट्रोल मध्ये नाही आणि तो स्टाफ पण काही करू शकत नाही, तिथे आदळआपट करून काही फायदा नसतो, तर निमूटपणे जे नियम आहेत ते पाळण्यात शहाणपण असतं.  

Saturday, 30 November 2024

शेकडो उत्तरांची कहाणी साता उत्तरी सुफळ संपूर्ण

मुलाच्या लग्नाचं कवित्व संपताना मला माझ्या अनेक नातेवाईकांचे जणांचे फोन आले ते नियोजन आणि व्यवस्थापनाबद्दल. खूप कौतुक केलं. इतकं की दोन तीन फोन वेळी घसा दुखायला लागला. इथे सुद्धा मावस भाऊ आशिष देवडे ने भारी पोस्ट लिहिली. खोटा विनय म्हणून लिहीत नाही आहे, पण हे सगळं करत असताना मी काही वेगळं करतो आहे, स्पेशल करतो आहे याची थोडीसुद्धा भनक मला लागलेली नव्हती. 

हे सगळं ऐकल्यावर मी जेव्हा सर्व प्रसंग स्क्रोल डाऊन केले तेव्हा काही गोष्टी जाणवल्या त्याबद्दल मला लिहिल्याशिवाय राहवत नाही. 

१. नोव्हेंबर मध्ये लग्न होतं, पण मी काम जुलै मध्ये चालू केलं. जेव्हा पंधरा ऑगस्ट ला पत्रिका वाटायला चालू केल्या तेव्हा थोडं हसंही झालं. इतक्या लवकर कुठे निमंत्रण द्यायचं असतं का, अशी थोडी हेटाई झाली. पण माझ्या दोन ओव्हरसीज ट्रिप आणि इतर कामाचं शेड्युल बघता, तेच संयुक्तिक होतं. मी मला जे योग्य वाटलं ते केलं आणि आज मला ते योग्यच केलं असं वाटतं. माझा एक साहेब आम्हाला म्हणायचा "Usually, I complete my work in time. It does not mean that I am efficient or wiser than you. I just start early." मला असं वाटतं, कळत  न कळत मी ते शिकलो आहे. 

२. कंपनीत असते तशी या कार्यक्रमासाठी सुद्धा एक कोअर टीम तयार झाली. त्यात मी स्वतः, वैभवी, आई, लहान भाऊ उन्मेष आणि त्याची मिसेस अर्चना असे मेंबर तयार झाले. त्या सगळ्यांनी कामं हातात घेतली. माझ्याकडे बाहेरचं सगळं कम्युनिकेशन, को ऑर्डिनेशन, वैभवी कडे खरेदी, आईकडे देवाच्या संबंधित काम आणि उन्मेष कडे रिसेप्शन मॅनेजेमेंट  अशी आपसूक कामाची वाटणी झाली. टीम मेंबर त्या कामाचे लीडर असताना बाकी लोकांनी त्यांना पूरक भूमिका घेतली. म्हणजे एका जबाबदारीसाठी एक लीडर आणि बाकी फॉलोअर्स. लीडर म्हणेल ते प्रमाण. 

३. या बरोबर सोबतीला मदतीस नेहमी तत्पर असे मित्रवर्य विजय फळणीकर सर आणि त्यांचे काही सहकारी,  तसेच माझे काही कंपनीतील सहकारी अशी दुसरी फळी तयार झाली. इथे मला उल्लेख करावा वाटतो तो आमच्या रोहतकच्या पाहुण्यांचा. त्यांच्याकडे घरचे लोक आणि बरोबर कार्यकर्त्यांची फळीच तयार होती आणि त्यांची सॉलिड मदत झाली. 

स्वतः नवरदेव यश, चुलत भाऊ जयेश, साडू दिलीप तांबे आणि शिवकुमार, कौटुंबिक मित्र बीडकर काका यांची प्रासंगिक मदत खूप मोलाची ठरली. 

या सगळ्यांच्या मध्ये दोन हात आणि पाय काही न बोलता मदत करत होते आणि तो म्हणजे आमचा नील. काही लोक कॅटॅलीस्ट म्हणून काम करत असतात. त्यांचं अस्तित्व प्रत्यक्ष जाणवत नसतं पण एखादा प्रसंग सीमलेस पूर्ण होण्यासाठी त्यांचं योगदान मोलाचं असतं. नील याची जितीजागती मिसाल आहे.  

४. एक्सेल शीट आणि इतर अनेक कागदांवर सर्व प्लॅन व्यवस्थित लिहून काढला. "Pale ink is always effective than strong memory" ही उक्ती कायम मनात ठेवली आणि काही लक्षात आलं की लागलीच लिहून काढलं. त्या मध्ये पाहुण्यांची यादी, त्यांचे मोबाईल नंबर्स, रिमाइंडर्स, रेल्वे आणि विमान प्रवासी, त्यांच्या कार्स, गिफ्ट्स, दिवसागणिक नाश्ता, लंच आणि डिनर चा मेन्यू, नाचाची आणि मंगलाष्टक म्हणायची प्रॅक्टिस असं जे जे म्हणून लिहून काढता येईल ते सगळं लिहिलं. "Plan the work and then work on the plan". हे ध्यानात ठेवून प्लॅन इम्प्लिमेंट केला. 

५. त्याचा रिझल्ट असा आला की पूर्ण इव्हेन्ट अक्षरश: सर्जिकल प्रिसिजन प्रमाणे पार पडला. त्यात लग्नाच्या अगोदरच्या घरातील पूजा, मग पुणे-दिल्ली-रोहतक असा ट्रेन चा प्रवास तर परतीचा विमान प्रवास, (३५ जण आणि त्यांच्या ३९ बॅग्ज आणि २० हॅण्डबॅग्ज, यावरून थोडी कल्पना येईल), रोहतक येथील १६ ते १८ नोव्हेंबर वास्तव्य, तिथले सगळे कार्यक्रम, लग्नानंतर ची घरातील पूजा आणि सरतेशेवटी जवळपास १००० लोकांचं रिसेप्शन हे कोणताही ताण न घेता पार पडले. या ठिकाणी मला दीपक केटरर्स ला शंभर पैकी एकशे एक मार्क्स द्यावे वाटतात इतकी त्यांच्या फूड क्वालिटीची स्तुती मी उपस्थितांकडून ऐकली. 

(रोहतक च्या पाहुण्यांना मी विनंती केली होती की वरमाला कार्यक्रम साडे नऊ वाजता करू यात. तो साडेदहा वाजता झाला. आणि त्यांच्या स्टॅंडर्ड नुसार तो एकदम वेळेवर झाला.)

६. हे सगळं कार्य पार करण्यासाठी मी फक्त चार दिवस सुट्टी घेतली. वैभवीने पण लॅबमध्ये सुट्टी दिलेली आठवत नाही.  

७. हे सगळं लिहितोय, म्हणजे चुका झाल्याच नाही का? तर झाल्या. काही मित्रांना निमंत्रण द्यायचं विचारलो म्हणजे पूर्ण मिस झालं. विमानतळावर वृद्ध मंडळींसाठी व्हील चेअर ऑर्डर करायची राहिली अशा काही मेजर तर काही मायनर चुका झाल्या. पण कदाचित त्यांचा कुणी बभ्रा केला नाही हे नशीब.

कार्य पार पडताना ताण तणाव, मिस मॅनेजमेंट झाले असते तर नक्कीच वाईट वाटले असते. कारण ज्या व्यवस्थापनाचा, नियोजनाचा, निर्णय घेण्याचा, पाठपुरावा करण्याचा मी सातत्याने उल्लेख आणि पुरस्कार करत असतो, त्या तत्वांना मीच हरताळ फासला असं झालं असतं आणि मग "walk the talk" हे न राहता नुसतंच लोका सांगे ब्रह्मज्ञान असला प्रकार झाला असता. 

असो. असा नोव्हेंबर धामधुमीचा गेला आणि अशी शेकडो उत्तरांची कहाणी साता उत्तरी सुफळ संपूर्ण झाली. 


 

Friday, 8 November 2024

मैयळागन

माझी स्टोरी त्या पिक्चरच्या स्टोरीच्या बरोबर उलटी आहे. ९६-९७ च्या सुमारास तो माझ्या कंपनीत जॉईन झाला. मी पुण्याचा सेल्स इंजिनियर तर तो दिल्लीचा. बंगलोर मध्ये भेटल्याक्षणी आमची दोस्ती झाली. हॉटेल मध्ये एकाच रूम मध्ये राहायचो आम्ही. त्याला इडली वडा बिलकुल आवडायचा नाही. आम्ही आमच्या हॉटेलचा क्लास इडली वडा सोडून एम जी रोड च्या मद्रास कॅफे मध्ये ब्रेड ऑम्लेट खायचो, मग ऑफिस, दुपारचा लंच बरोबर, रात्री बियर प्यायचो. आम्ही दोघे आणि आमचा बॉस, तिघांनाही नॉन व्हेज प्रिय. मस्त चिकन खायचो, रात्री गप्पा. 

दिल्लीला त्याच्या घरी गेलो, भाभी, त्याचे वडील, भाऊ, मुलगा-मुलगी सगळ्यांशी गट्टी जमली. तो ही पुण्याला आमच्या घरी आला. त्याचीही माझ्या घरच्यांशी दोस्ती झाली. 

मी जॉब सोडला, व्यवसाय चालू केला. त्या निमित्ताने दिल्लीला जायचो. बऱ्याचदा त्याच्या घरी उतरयचो. त्याच्या टेरेस वर आमची पार्टी व्हायची. कधी बियर तर कधी व्हिस्की. भाभी सणसणीत चिकन बनवायची. मग तो मला फर्माईश करायचा, गाण्याची. मी पण सुटायचो. अभी ना जाओ छोडकर, कभी कभी मेरे दिल मे, आज से पहले आज से ज्यादा, कही दूर जब दिन ढल जाए, तेरे मेरे सपने, मेरे सामने वाली खिड़की में . त्याने गाणं सांगायचं आणि मी म्हणायचं. एकच श्रोता, त्याचाच वन्स मोअर, त्याचीच शाबासकी अशा किती मैफली रंगल्या त्याची गणती नाही. दिल्लीहून पंजाब ला कामाला गेलो, परत यायला रात्रीचे दोन वाजले. पठया मी येईपर्यंत टक्क जागा होता. 

मला बडा भाई म्हणायचा. जॉब मध्ये काही त्रास झाला की मला फोन करायचा. एकेक तास फोन चालायचा. फोन गरम होऊन कानाला चटका बसायचा पण त्याचं बोलणं थांबायचं नाही. मी त्याचं कौन्सलिंग करायचो. फोन ठेवताना म्हणायचा "थैंक्स भाई, तेरे से बात करके अच्छा लगता है" 

नंतर तो एका मल्टी नॅशनल कंपनीचा एम डी झाला, बंगलोरमध्ये. आमच्या भेटी चालूच राहिल्या. कधी बंगलोर ला गेलो की राहिलो पण त्याच्या फ्लॅट वर. पण आता आधीसारखी मैफल सजायची नाही. हळूहळू भेटीत पण तुटकता येत गेली. गळाभेट व्हायची पण त्यात पहिलेसारखी कशीश नसायची. आम्ही नंतर भेटत राहिलो पण माझ्या लक्षात पण आलं की हे भेटणं नंतरच्या काळात न भेटण्यासाठी असेल. मग काही वेळा फोन कॉल्स झाले. तोंडदेखल्या भेटी झाल्या. पण नंतर त्याचा रिस्पॉन्स येणं कमी होत गेलं. मी फोन केला तरी उचलायचा नाही किंवा रिटर्न कॉल पण यायचा नाही. 

मोठी गंमत आहे. मला काही आमच्या दोघात अनबन झालेली आठवत नाही, दोघांकडून मोठी आगळीक झालेली आठवत नाही. आठवते ती फक्त विरत गेलेली मैत्री. 

आता जवळपास पाच एक वर्षे झाली असावीत, आमचा संवाद नाही. आता पुन्हा होईल असं वाटत नाही. मला त्याचं नव्हे तर भाभी, त्याच्या मुलामुलींचं, भावाचं सगळ्यांचं नाव आठवतं.

कामाच्या धबडग्यात ते कष्ट केलेले दिवस, त्या शिळोप्याच्या गोष्टी, त्या टेरेसवर सजलेल्या मैफिली यांची कधीतरी आठवण येते. 

काल पिक्चर बघितल्यावर त्याच आठवणींची खपली निघाली ती अशी. 

Saturday, 26 October 2024

माणसं वयाने मोठी झाली तरी बदलत नाहीत हे फक्त पिक्चर मध्ये दाखवू शकतात हे मला थ्री इडियट मधला चतुर बघून वाटलं. कारण प्रत्यक्ष आयुष्यात लोक अंतर्बाह्य बदललेले बघितले आहेत. लहानपणी गळ्यात गळे घालून फिरणारे मित्र नंतरच्या आयुष्यात मोघम हाय हॅलो करून निघून जातात, अत्यंत जवळचे कौटुंबिक मित्र अगदी घराजवळ येऊन भेटायचं टाळतात, आईचा पदर वयाच्या अठरा पर्यन्त धरतात आणि नंतरच्या आयुष्यात आई वडिलांशी बोलत ही नाहीत. याच्या उलट पण होतं. काहींच्या मनात विनाकारण ग्रज असतो, मोठेपणी तो दूर होऊन छान मैत्रीचं नातं तयार होतं, माझ्यासारखा लहानपणी अबोल आणि शिष्ट वाटणारा माणूस नेटवर्किंग मध्ये विश्वास ठेवतो. 

पण मागच्या आठवड्यात या थेअरीला छेद देणारे चार मित्र भेटले. चतुरच जणू. आम्ही सर्व ट्रेनी म्हणून जॉईन झालेलो. आम्ही बरेच जण आपल्या कामात गर्क असायचो तेव्हा या चौघांचं काम एकच काम असायचं. आमच्यातल्या कुणा एकाची विनाकारण खिल्ली उडवायची. कुणी खूप काम करत असेल तर "च्युत्या आहे तो. आता आपले मजा करायचे दिवस आहेत". कुणी साहेब कधी झेरॉक्स काढायला पाठवायचे तर हे चौघे "साहेबांचा चमचा आहे रे". त्यातल्या राणे नावाच्या पोरावर हे विशेष खार खाऊन असायचे. राणे सगळ्यांना मदत करायचा. आम्हा बाकी पोरांचा आणि साहेब लोकांचा तो विशेष लाडका. आर्टिझन होता, विशेष स्किल होतं त्याच्या हातात. इंजिनियरिंग स्किल्स तर होतेच पण इतरही कला होती. ही चौकडी इतरांची तर खिल्ली उडवायचीच पण राणे त्यांच्या विशेष रडार वर होता. 

बरं गंमत म्हणजे, राणे यांना फुल फाट्यावर मारायचा. आपण बरं, आपलं काम बरं या न्यायाने तो कामाला यायचा, काम चोख करायचा अन घरी जायचा. 

परवा ही चौकडी आणि मी भेटलो. त्यातला एक जण बंगलोर मध्ये ए व्ही पी आहे, एक जण गुडगाव मध्ये जनरल मॅनेजर आहे आणि बाकी दोघे पुण्यात इंडस्ट्री मध्ये वयाच्या ५६ व्या वर्षी मॅनेजरियल लॅडर वर साधारण जिथं असायला  पाहिजे तसे आहेत. त्यातल्या एकाने तुच्छतेचा टोन काढत मला विचारलं "तो बावळ्या राणे कुठं असतो रे आता?" माझ्या लक्षात आलं या चौघांचं फक्त शारीरिक वय वाढलं आहे, वयानुसार नोकरीत जी वृद्धी व्हायची झाली ती झाली पण बुद्धीने मात्र हे अजून बालिशच आहेत. 

मी शांतपणे सांगितलं "राणे सध्या जर्मनी मध्ये एका हायड्रॉलिक्स व्हॉल्व्ह बनवणाऱ्या कंपनीत डायरेक्टर झाला. फॅमिली मॅनेज बिझिनेस आहे. त्या मालकांनी राणेंचं काम बघून त्याला शेअर्स पण दिले आहेत." काय बोलणार ते, गप्प बसले पण त्यांच्या तोंडून राणेंच्या कौतुकाचे काही शब्द पडले नाहीत. निर्लज्जसारखे दुसऱ्या कुणाची खिल्ली उडवत एकमेकांना टाळ्या देत बसले. 

कुठून यांना भेटलो असं झालं मला. जंजिरा तुन बाहेर पडलो तेव्हा या मुर्खांना परत कधी भेटायचं नाही हे ठरवूनच. 


Thursday, 19 September 2024

वीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. स्पिंडल रिपेयर चा कॉल अटेंड करायला गेलो होतो. इकडच्या तिकडच्या रेफरन्स मधून मला कस्टमरची माहिती मिळाली होती. त्या कंपनीचं नाव होतं मार्केट मध्ये. चांगला बिझिनेस करत होते. साठीच्या आसपास त्यांचे ओनर असावेत. त्यांचं मेंटेनन्स डिपार्टमेंट होतं, जे त्यांचे स्पिंडल रिपेयर करायचे. 

मी अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटायला गेलो. मी कॉल वर गेलो की शोधक नजरेने आजूबाजूला बघतो. त्यादिवशी त्यांचे मेंटेनन्स चे लोक कुठं स्पिंडल रिपेयर करतात ते बघितलं होतं. साहेब आले. मी माझं सेल्स पीच चालू केलं. 

"आम्ही स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रात आहोत. मी येताना बघितलं तुम्ही कुठे स्पिंडल रिपेयर करता ते. सर, तुम्ही जागा एअर कंडिशन्ड ठेवली नाही आहे आणि तिथे स्वच्छता पण मेंटेन नाही आहे. परत मी बघितलं की स्पिंडल डिसमँटल करण्यासाठी प्रेस पण वापरत नाही आहात. आणि......" 

मी पुढं काही बोलायच्या आत त्या साहेबांनी मला थांबवलं आणि म्हणाले "तुम्ही कशासाठी आला आहात माझ्याकडे? तुम्ही काय बिझिनेस करता ते सांगायला आला आहात की माझ्या कामाचं ऑडिट करता आहात? एक तर तुम्ही स्वतः फोन करून मला भेटायला आला आहात, ते ही बिझिनेस मागण्यासाठी. मी काय चुकीचं करतो यावर तुम्ही सेल्स पीच करणं चुकीचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला?"

मी त्यांचं स्पष्ट बोलणं ऐकून गांगरून गेलो. आणि माझ्या चेहऱ्यावर ते दिसलं. मग त्यांनी मला समजावून सांगितलं "असं दिसतंय की तुमचा नवीन बिझिनेस आहे. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पहिल्याच भेटीमध्ये, कस्टमरकडे काय चुकीचं आहे यावर तुमचं सेल्स चं बोलणं बिल्ड नाही करायचं. त्या पद्धतीने पहिले तुम्ही कस्टमरच्या मनात तुमच्या बद्दल चं निगेटिव्ह इम्प्रेशन तयार करता. आलं लक्षात. हं, आता बोला, तुमच्या काय फॅसिलिटी आहेत?"

त्यांनी दिलेला मंत्र मी नंतरच्या सेल्स च्या करिअर मध्ये कटाक्षाने पाळला. कस्टमर कडे जाताना शोधक नजर कायम ठेवली पण तिचा वापर केला की मी त्यांच्या वर्किंग प्लेस मध्ये चांगलं काय आहे ते सांगत गेलो. कस्टमर पण ते ऐकून खुश व्हायचा आणि पुढचं संभाषण मस्त व्हायचं आणि शक्यतो तो कस्टमर आम्हाला बिझिनेस द्यायचा. 

Wednesday, 18 September 2024

सतीश

 चेन्नई ला मी ज्या हॉटेल मध्ये राहतो तिथं एक वेटर काम करतो, सतीश नाव त्याचं. बाकी वेटर पेक्षा कामात तो उजवा आहे हे सारखं जाणवायचं. गेस्ट ब्रेकफास्ट ला आला की त्याचं हसून स्वागत करणार, गुड मॉर्निंग म्हणणार, काय हवं नको ते पाहणार, पाण्याचा ग्लास रिकामा झाला की पाणी द्यायला येणार, कॉफी, टोस्ट, चटणी वगैरे काही एक्स्ट्रा आयटम हवा असल्यास लागलीच आणून देणार, ब्रेकफास्ट व्यवस्थित झाला का हे निघताना आवर्जून विचारणार. बाकी पण तीन चार वेटर्स तिथं असायचे पण त्यांच्यापैकी सतीश एकदम बिझी असायचा. बाकी वेटर टंगळमंगळ करत असताना सतीशचा मात्र कायम कामावर फोकस असायचा. त्याला अजिबात फुरसत नसायची. 

कोविड नंतर फिरणं जस्ट चालू झालं होतं. हॉटेल मध्ये गजबज नसायची. एकदा तर मी एकटाच होतो ब्रेकफास्ट रूम मध्ये. वेटर मध्ये पण फक्त सतीश आणि किचन मध्ये एकदोन कुक असावेत. त्या दिवशी मी सतीशशी थोड्या गप्पा मारल्या. मी विचारलं की  तू चेन्नई चा आहेस का की कोविड च्या भीतीने इतर गावचे वेटर येत नसल्यामुळे तुला बोलावून घेतलं. तर कळलं की सतीशचं गाव पण १८० किमी लांब आहे चेन्नई पासून. कोविडमुळे अगोदरच प्रॉब्लेम मध्ये असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट ने अनेक वेटर्स ला बोलावून घ्यायचा प्रयत्न केला होता. पण कुणी दाद दिली नव्हती, अगदी चेन्नई तल्या वेटर्स ने पण नाही. सतीश तयार झाला. हॉटेलच्या मालकाने कार पाठवून सतीशला बोलावून घेतलं. 

मला त्यादिवशी कळलं की सतीशच्या घरी अगदी गरिबी. काम शोधण्यासाठी तो चेन्नईत आला. सध्याच्या हॉटेल च्या बाजूला एक रेस्टोरंट आहे तिथे टेबल साफ करायला म्हणून काम चालू केलं. असंच एकदा माहिती झालं की या शेजारच्याच हॉटेल मध्ये, जिथे मी राहतो तिथे, वेटर्स हवे आहेत. तिथं त्याने जॉब मिळवला आणि प्रचंड कष्टाने आपलं बस्तान बसवलं, सेट केलं. 

मी जेव्हा कधी गेलो तेव्हा सतीश असायचाच जॉब वर. मी त्याला त्या दिवशी गप्पा मारताना विचारलं "तू कधी सुट्टी घेतलेली बघितली नाही मी. सणासुदीला किंवा घरी काही पूजा वगैरे असेल तर जात नाहीस का घरी". तो म्हणाला "जातो की. पण इथे माझी सुट्टी वगैरे होत नसेल तरच. कारण मला या नोकरीने इतकं काही दिलं आहे की माझ्यासाठी कर्म ही पहिली प्रायोरिटी." आणि मग साऊथ इंडियन टोन मध्ये बोलत म्हणाला "this work is worship for me and this work place is temple." 

आज सकाळी त्याच हॉटेल मध्ये ब्रेकफास्ट करताना माझी नजर सतीशला शोधत होती. माझ्या शेजारी सुटाबुटातील एक कॅप्टन येऊन उभा राहिला आणि मला त्याने विचारलं "सर, मला ओळखलं नाही तुम्ही" मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिलो. तुम्ही बरोबर ओळखलं, तो सतीशच होता. मॅनेजेमेंट ने त्याचे कष्ट, त्याचं निष्ठा जाणली होती. त्याच्या छातीवर त्याच्या नावाची नेमप्लेट होती, आणि खाली लिहिलं होतं "मॅनेजर". मी झटकन उभा राहिलो आणि त्याचा हात प्रेमभराने दाबत त्याचं मनापासून अभिनंदन केलं. 

मी कुठे तरी वाचलं होतं "Walk that extra mile and you will find that road is not much crowded" सतीश त्या वाक्याची जितीजागती मिसाल होता.