Sunday, 20 July 2025

रोहडू

तर झालं असं होतं की आमच्या कंपनीत एक मुलगा जॉईन झाला. एकदा  शिळोप्याच्या गोष्टी करताना मी सहज त्याचं मूळ गाव विचारलं. तर त्याने सांगितलं "रोहडू", सिमला च्या पुढे १०० किमी. आणि त्याच्या घराचे फोटो दाखवले. ते अप्रतिम फोटो बघून माझ्या तोंडून सहज एक वाक्य निघून गेलं " एकदा जायला हवं तुझ्या गावाला". (त्यावेळी नुकताच मी वैभव कुलकर्णी दिग्दर्शित रॅबिट हाऊस नावाचा पिक्चर बघितला होता आणि तिथली पार्श्वभूमी हिमाचल होती). त्या पोराने ते माझं वाक्य पकडलं "एकदा जायला हवं तुझ्या गावाला". मानेसरला आलो की त्याचा पहिला प्रश्न असायचा "सर, रोहडू जायचं आहे ना? घरचे लोक तुमची वाट बघत आहेत" म्हणजे त्याने घरी पण सांगून ठेवलं होतं. मी नाही म्हणायचो. की तो लागलीच "ठीक आहे नेक्स्ट व्हिजिट ला". 

यावेळेस पुण्यात भेटलो, तेव्हा त्याने परत तोच प्रश्न विचारला. यावेळेस मी ठरवूनच टाकलं की मानेसर ला गेलो की रोहडू ला जायचं. १९ आणि २० जुलै तशीही सुट्टी होतीच.

दिल्ली रोहडू व्होल्वो सर्व्हिस आहे. व्हाया चंदिगढ, सिमला. १३ तास प्रवास. पुणे ते बंगलोर मी के एस आर टी  सी च्या व्हॉल्वो तुन बेफाम प्रवास केला आहे. त्यामुळे गेल्या ६-७ वर्षात बसने प्रवास न केल्याचं मनात आलेलं खोडून टाकलं. बस १ तास लेट झाली आणि रोहडू ला उतरलो. सकाळचा प्रवास विस्मयचकित होऊन बघितला. सिमला ते रोहडू १०० किमी अंतर आहे पण त्याला चार तास लागले. पण त्या काळात जे निसर्ग दर्शन झालं त्याने पार येडा झालो. 

आणि त्याही पलीकडे पागल झालो ते पहाडी लोकांच्या आदरातिथ्य मुळे आणि ज्या कुटुंबाकडे मी आलो त्यांची सफरचंदाची आणि पेर (याला इथे नाशपती म्हणतात) ची बाग पाहून. अक्षरश: हजारो सफरचंद लगडलेल्या झाडांच्या मध्ये असलेलं ते घर, तिथली प्रचंड कष्ट करणारी यजमान लोक, त्यांची ती पहाडी हेल असणारी कानाला वेगळीच वाटणारी हिंदी, मनात विचार आला तरी वाहनाचा आवाज आणि रादर कुठलाही आवाज न येणारा भवताल, नीरव शांतता हे सगळं मी तीस तासा मध्ये अनुभवलं. शेतात खुडून आणलेल्या मश्रुमची भारी भाजी, राजमा भात, वेगळ्याच गव्हाची चपाती, बटाटयाची भाजी सारण म्हणून वापरलेलं आणि तळलेली जाड पुरी ज्याला इथे फोलडू म्हणतात, लाल रंगाचा भात, अफीम टाकून आपले उकडीचे मोदक असतात तसं सिडू, आपल्या धिरड्यासारखं लागणारं लौटे अशा लोकल डेलिकसी त्या कुटुंबाने आवर्जून खाऊ घातल्या. 

या सोबतीला दिला अमाप आदर आणि प्रेम. पंच्यांशी वर्षाच्या दादूपासून आणि उच्चशिक्षित समवयीन नानूपासून ते आमच्या माणसाच्या लहान बहिणीपर्यंत सगळ्यांनी आवर्जून गप्पा मारल्या. यजमान आणि यजमानीण त्यांची शेताची कामं सांभाळून माझी सरबराई करत होते. 

एका छोट्या ब्रेक नंतर पण आगळ्यावेगळ्या मोठ्या मनाच्या लोकांना भेटून परत निघालो आहे, ते पुन्हा कधी यायचं आहे त्याचा विचार करतच. 

(बाय द वे, वर उल्लेख केलेले नानू, त्यांची चेहरेपट्टी साधारण पणे नानाजी देशमुखांशी जुळणारी. रामभक्त आहेत ते. खरी गंमत पुढे आहे. माघ महिन्यात ते अस्खलित उर्दू मध्ये रामायण कथा सांगतात. आणि ती ऐकण्यासाठी दोन्ही धर्माचे लोक भक्तिभावाने आले असतात)

रोहडू 

No comments:

Post a Comment