मध्ये अशीच एक पोस्ट वाचली की आजकाल फोन्स फक्त कामासाठी येतात, सहज असे फोन येत नाहीत. माझंही झालं आहे असं खरं. माझ्या कॉलेज चे आणि शाळेचे काही मित्र यांच्याशी कधीतरी माझा मूड झाला की फोन करतो. नाही म्हणायला फेसबुकच्या काही लोकांना पण माझे असे उगाच फोन झाले आहेत. पण प्रमाण फार कमी.
पण आमच्या घरात दोघे जण आहेत, ज्यांचे त्यांच्या सुहृद लोकांशी असे सहज फोन चालू असतात. एक आई आणि दुसरी वैभवी. आईचं तर समजू शकतो मी. मागच्या पिढीची आहे ती, परत मी दिवसभर घरात नसतो. आजकाल नील पण नसतो. मग फोन वर बोलण्याशिवाय दुसरा विरंगुळा कुठला?
पण वैभवी. ती डॉक्टर आहे. लॅब चालवते. पण तिचे दररोज असे कुठले ना कुठले सहज फोन चालू असतात. तिचे तीन ग्रुप आहेत. एक बी जे तल्या मैत्रिणींचा. चार जणी आहेत त्या. त्यांचा मूड झाला की चार जणी मिळून व्हाट्स अप कॉल करतात आणि अमाप गप्पा मारतात.
दुसरा ग्रुप, चुलत बहिणींचा. तिथे त्या पाच जणी आहेत. तिथे पण ग्रुप कॉल चालू झाला की एक दीड तासाची निश्चिंती असते.
तिसरा ग्रुप आहे मामे मावस भाऊ बहिणींचा. ९ जणांचा. तिथे परत मामे मावस बहिणींचा सब ग्रुप आहे. म्हणजे त्यात तीन भाऊ नाही आहेत. हा कहर ग्रुप आहे. प्रत्येकाच्या वाढदिवसानंतर त्यांचा तो व्हर्च्युअल साजरा होतो. मग त्यात ते सर्व गाणे म्हणतात, ज्याचा कुणाचा वाढदिवस आहे त्याच्या किंवा तिच्यासाठी. कुठलाही फॅमिली प्रोग्रॅम झाला की त्याबद्दल एक फोन होतो. आणि कार्यक्रमात केलेली मजा ते परत झूम कॉल करून अनुभवतात.
या सगळ्या ग्रुप कॉल्स ची वेळ पण ठरली आहे. रात्री साडे नऊ. मग तो कधी एक तास, कधी दीड तर कधी अगदी दोन तास पण चालतो. बरं या ग्रुप कॉल शिवाय यातील प्रत्येकाशी परत दोन तीन दिवसातून वैयक्तिक फोन होतोच.
आणि याशिवाय मग वैभवीची आई, बहीण, मुलगा यश यांच्या बरोबर अलमोस्ट दररोज, तर भाऊ अमोल, दीर उन्मेष, नव्याने नाते जोडलेल्या विहिणबाई, अजून काही बी जे च्या मित्र मैत्रिणी यांच्याबरोबर आठवड्यातून एखादा फोन होतोच होतो.
गंमत म्हणजे तिच्या ग्रुप कॉल मध्ये बऱ्याचदा फक्त हसण्याचे आवाज येतात. शब्द काहीच ऐकू येत नाहीत. इथे फोन झाल्यावर, त्यातही ग्रुप कॉल नंतर ती डबल फ्रेश होते.
असे आम्ही फोनच्या बाबतीतले दोघे दोन ध्रुव. कधी मला तिच्या या फोन्स चा राग पण येतो पण बहुतेकवेळा तिचा हेवा वाटतो. खुश राहण्यासाठी मला काहीतरी अफाट घडावं असं वाटतं, वैभवी मात्र अशा एखाद्या सहज केलेल्या फोनने सुद्धा खुश खुश होऊन जाते.
No comments:
Post a Comment