व्यवसायासाठी माझा विमानप्रवास १९९५-९६ साली चालू झाला असला तरी ज्याला आपण फ्रिक्वेन्ट एअर ट्रॅव्हलर म्हणतो ते २००६ पासून चालू झालं. अर्थात त्यासाठी एअर डेक्कन, स्पाईस जेट, इंडिगो या नो फ्रील्स एअरलाईन्स ला धन्यवाद द्यायला हवेत. त्या काळात एअर इंडिया, जेट किंवा किंग फिशर या फुल सर्व्हिस कॅरिअर ने प्रवास करणं अवघडच होतं, कारण तिकिटांच्या किंमतीत बराच फरक असायचा. मला आठवत आहे त्या प्रमाणे मी पहिला एअर इंडिया चा प्रवास जवळपास २०१६ साली केला. त्यानंतरही एअर इंडिया ने प्रवास अगदीच क्वचितच केला. तिकीटाची किंमत हा तर इश्यू होताच पण त्याच्या बेकार सर्व्हिस चे किस्से पण खूप कानावर पडायचे.
२०२२ ला टाटा ने एअर इंडियाला विकत घेतलं. अनेक भारतीयांप्रमाणे मलाही टाटा ब्रँड बद्दल ममत्व होतंच. आणि एव्हाना सर्वच एअरलाईनची प्राइसिंग स्पर्धेमुळे जवळपास आली होती. मग मी माझ्या विमान प्रवासासाठी एअर इंडिया ऑप्शन हिरीरीने घेऊ लागलो. सगळ्यात फायदा झाला मला, अमेरिकेच्या प्रवासात. सॅन फ्रान्सिस्को, न्यू यॉर्क आणि शिकागो ला त्यांची डायरेक्ट सर्व्हिस होती. बऱ्याच लोकांना पंधरा-सोळा तासांचा सलग विमानप्रवास आवडत नाही. मला आवडायचा. कदाचित बसने असे अनेक प्रवास केल्यामुळे सवय असावी. अंतर्देशीय प्रवासात पुणे-दिल्ली-पुणे मी आवर्जून एअर इंडिया घेतो.
सुदैवाने, या सगळ्या प्रवासात मला तो एअर इंडिया चा कुप्रसिद्ध सर्व्हिस इश्यू कधी आला नाही. फक्त डिले मात्र असायचा, तो ही आंतरराष्ट्रीय प्रवासात. किंबहुना मला प्रत्येक प्रवासागणिक खूप सुधारणा जाणवायच्या. विमानात मिळणारे अन्न, स्वच्छता वगैरे गोष्टींमध्ये सुधारणा दिसत होती. मला आजकाल सारखं वाटत होतं की जे आर डी च्या सत्तरच्या दशकातील एअर इंडिया कि जि जगातल्या सर्वोत्तम एअरलाईन पैकी एक होती, परत आता दिसेल.
या पार्श्वभूमीवर कालचा ए आय १७१ चा अपघात खूपच धक्कादायक होता. प्रचंड दुःख झालं. त्या अपघाताची तीव्रता खूपच भयानक होती. २४१ विमानातले आणि हॉस्टेल मधील २०-२५ जीव आपण गमावले. त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात हा विचारांच्या पलीकडे आहे. मृतकांच्या नातेवाइकांच्या मनाची सहवेदना झाली तरी हृदय पिळवटून जातं. जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यापलीकडे आपण फार काही करू शकत नाही ही हतबलता पण त्रास देते.
मला आशाच नव्हे तर खात्री आहे की या अपघाताच्या धक्क्यातून एअर इंडिया पण सावरेल. यानंतर ते विमानप्रवासाची सुरक्षा यावर काहीतरी ठोस उपाययोजना करतील. या अपघाताचे सुद्धा मूळ कारण ते शोधून काढतील आणि असं काही परत होण्याची शक्यता सुद्धा तयार होणार नाही अशा पद्धतीची कार्यप्रणाली तयार करतील. देश विदेशातील प्रवासी एअर इंडिया च्या विमानात प्रवेश करताना सुरक्षिततेची भावना घेऊन येतील असा विश्वास तयार करावा लागेल. त्यांनी निवडलेला सुधारणेचा मार्ग अजून ताकदीने ते फॉलो करतील आणि येणाऱ्या वर्षात तो सकारात्मक बदल आपल्याला दिसावा अशी मनोमन प्रार्थना करतो .
पुन्हा एकदा या प्रवासात निधन पावलेले सर्व प्रवासी, हॉस्टेल मधील डॉक्टर यांच्या प्रति भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या नातेवाईकांना हा लॉस सहन करण्याचे धैर्य मिळो ही प्रार्थना.
No comments:
Post a Comment