Thursday 25 July 2013

ते दोघं

आयुष्यात आपल्या आई वडीलांशिवाय अनेक व्यक्तिंचा आपल्यावर कळत नकळत प्रभाव पड़त असतो. माझ्या आयुष्याच्या सकाळी अशीच दोघं जण आली आणि जन्म भराची साथ देउन गेली. दूर्दैवाने आज ते दोघंही जगात नाहीत पण त्यांची आजही आठवण येताच आजही मन गलबलतं पण सरतेशेवटी प्रसन्नता देतं.

यातील पहिली व्यक्ति म्हणजे माझे काका शरद मंडलीक. अत्यंत लाघवी आणि प्रसन्न व्यक्तिमत्व. खूपच कष्टाळू आणि विनोदी स्वभाव. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या आयुष्याला आकार देण्याची धडपड आज आठवली तर स्तिमीत व्हायला होतं. मला ते आठवतात ते इराण मधे असल्यापासून. ते व्यवसायाने draftsman होते. एम एस इ बी तला आरामाचा जाॅब सोडून त्याकाळी इराणला जाणे हेच मोठं दिव्य होतं. ५-६ वर्ष तिथं राहिल्यानंतर शहा- खोमेनीच्या संघर्षात त्यांना इराण सोडून यावं लागलं. त्या सगळ्या प्रकारात त्यांचं बरच नुक़सान झालं असावं असा माझा अंदाज आहे. पण ते डगमगले नाहीत. इथे परत आल्यानंतर त्यांनी पूरंदरे नावाच्या एका बड्या consultant कड़े नोकरी पकड़ली. (माझ्या आठवणीप्रमाणे धन्वंतरी पूरंदरेंचे हे भाऊ). एव्हाना आमचा मुक्काम उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत ठाण्यात नीलकमल मधे पडू लागला. काका सकाळी ठाण्याहून फोर्ट ला नोकरी ला जात. संध्याकाळी ते आल्यावर पुढचे चार तास अक्षरश: धमाल असायची. खरं तर ते दमत असावेत. पण दाखवत नसत. काकू पण कामावरून परत यायच्या. मग खाणे, पिणे, बाहेर फिरणे, त्यांच्याबरोबर मस्ती, गप्पा यात रात्र कधी व्हायची ते कळायचेच नाही. या नीलकमल मधेच मी कॅरम खूप खेळलो. ठाण्याची दिवाळी म्हणजे आठवणींचा एक खजिना आहे. फटाके, करंज्या, लाडू, नवीन कपडे- काका अगदी धमाल उडवून द्यायचे. काका competition लावायचे, कोण जास्त पुरणपोळ्या खातो त्याला एक रुपया बक्षीस. एकंदर मजा असायची. त्या ४५० sq ft च्या राजमहालात, हो राजमहालच तो, आम्ही चार भावंडं, आई बाबा, काका काकू, आणि आजोबा असे ९ जण झोपी जायचो. पण मला आठवतय सर्वजण झोपल्यावर, किंवा, सर्वजण उठायच्या आधी, काका drawing वर काम करत असायचे. हे बहुधा additional काम असावे.

काकांकडे एक फियाट होती, त्यानी आम्ही खूप फिरायचो. काका सांगत परदेशात कसं कुणी हाॅर्न वाजवत नाही. (ते माझ्या मनावर इतकं ठसलय की मी भारतातल्या कुठल्याही शहरांत कार चालवताना हाॅर्न वाजवत नाही. विश्वास बसतो का ?).

काका काकू जयेश स्वाती नाशिकलाही यायचे. तिथेही ते कमालीचे लोकप्रिय. आमच्या शाळेतही यायचे. काकानी इराणहून खूप coins आणले होते. त्यावर मी खूप भाव खायचो. मला लहानपणांपासून वाहनांची खूप आवड. काकांनी मला निळ्या रंगाची सायकल घेउन दिली, मला बहुधा त्यांनी एक घड्याळ पण गिफ्ट दिले़ होते. मला असं वाटायचं की, किंबहुना अजूनही वाटत की या पूतण्यावर जरा त्यांचा जास्तच लोभ होता. खरंतर असं प्रत्येकालाच वाटत असावं. तो माणूसच असा ज़िंदादिल होता.  माझ्या आईचे आणि काकांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. दोघांचं बालपण आणि तरूणाईचे दिवस परभणीत गेलं. तिथल्या आईच्या काही मैत्रीणी काकांवर कशा फ़िदा होत्या हे आई रंगवून सांगायची. काकापण मस्त चिडवून घ्यायचे, मोहकपणे.

आम्ही सर्वांनी मिळून दोन टूर केल्या. एक गोवा, आणि दूसरी उत्तर भारत. दोन्ही अविस्मरणीय. आजही त्या टूरची आठवण आली की मनातून हालतो.

सगळं काही मजेत चाललं होतं, आणि काकांच्या कॅन्सर चं निदान झालं. कळण्या न कळण्याचे दिवस, पण एक विचित्र मळभ सगळ्यांच्या आयुष्यात आलं. प्रयत्न भरपूर झाले. पंण काही उपयोग झाला नाही. जयेश आणि मी दहावीची परीक्षा १३ जून १९८३ ला पास झालों आणि चारच दिवसानी १७ जूनला काका अनंताच्या प्रवासाला निघून गेले. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी. माझ्या आयुष्याला झालेली मृत्युची ही पहिली ओळख. मृत्यु कुणाचाही दू:खदायीच पण हा मनाला चटका लावून झालेला. अकाली.

काकांनंतर..........................



सगळ्यांच्याच मनात एक पोकळी निर्माण झाली होती. पण काकू, जयेश आणि स्वातीवर आघात झाला होता. स्वाती तर लहान होती, पण जयेश तारूण्यात पदार्पण करत होता. काकूंनी चैतन्य हरवलेल्या आयुष्यात जान फूंकून दोघांनाही मोठं केले. स्वत:च्या पायावर ऊभे केले. स्वाती कॅनडात असते तर जयेश ठाण्यात. काकूंची तब्येत सध्या बरी नसते, पण जयेश आणि कविता त्यांची काळजी घेतात .

मी तर वैभवी ला बर्याचदा सांगतो की आज काका असले असते तर आपल्या सगळ्यांनाच डोक्यावर घेउन नाचले असते. काळ हे सगळ्या दु:खावर औषध आहे, असं म्हणतात. असो बापडे. डिप्लोमाला काकांचा फोटो कंपासमधे ठेवून मी हे औषध रिचवत होतो. अजूनही काकांची बर्याचदा अनावर आठवण येते. गेल्या आठवडाभर तर बेफाम झाली म्हणून हा लेखप्रपंच.

(क्रमश:, दुसर्या बद्दल रविवारी)


No comments:

Post a Comment