Wednesday, 31 July 2013

त्या दोघातला दूसरा

आयुष्यात आपल्या आई वडीलांशिवाय अनेक व्यक्तिंचा आपल्यावर कळत नकळत प्रभाव पड़त असतो. माझ्या आयुष्याच्या सकाळी अशीच दोघं जण आली आणि जन्म भराची साथ देउन गेली. दूर्दैवाने आज ते दोघंही जगात नाहीत पण त्यांची आजही आठवण येताच आजही मन गलबलतं पण सरतेशेवटी प्रसन्नता देतं. 

काही नात्यांची वीण घट्ट बसते. मनं जुळतात आणि कायमचं सख्य जुळून जातं. असंच नातं आमच्या कुटुंबाचे, औरंगाबाद च्या कुलकर्णी कुटुंबाशी. आणि हे नातं बांधलं गेलं आहे विलास भाऊ च्या दणकट धाग्याने. काका, बाई, नाना, नागेश दादा, तिन्ही वहिनी, मीना ताई या सर्वांनीच मला आणि आमच्या घरातील प्रत्येकालाच अपरांपार प्रेम दिलं,  आणि या सगळ्यात अग्रणी होता भाऊ. 

बाई ह्या माझ्या आत्या. नातं तसं दूरचं, पण काही नात्यांबद्दल "ते" कसं हे शोधा़यचं नसतं, तसंच हे. यवतमाळपासून ऋणानुबंध जुळले, ते औरंगाबाद ला दृढ़ झाले. विलासभाऊ मला तेव्हापासून आठवतो. त्यांच्या प्रत्येक बाबतीत एक वेगळाच रूबाब होता. राजदूत ला किक मारणे, ती तो चालवताना असं वाटायचं की तो मर्सिडीज़ चालवतोय. त्याचं ते ऐटीत पान खाणे. मला त्या पानाचा वास फ़ार आवडायचा. विल्कोसमोर उभा असताना त्याला अगणित नमस्कार झडायचे, आणि तो प्रत्येकालाच reciprocate करायचा, न कंटाळता, आत्मीयतेने. घड्याळ्याच्या पट्ट्याशी, बोटातल्या अंगठीशी तो खेळायचा, पण ते कधी विचित्र नाही वाटलं. त्याच्या पाया पडलं की तो एक धपाटा द्यायचा, पण त्यात आशिर्वादाबरोबरच एक वेगळाच स्नेह असायचा. बर्याचदा तर मी तो धपाटा खाण्यासाठी त्याच्या पाया पडायचो. भाऊ मला "राजा" म्हणून हाक मारायचा (आणि काका सुद्धा). त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्टय म्हणजे मी त्याला चिडलेला कधीच बघीतलं नाही, कुणावरही नाही. त्याच्या चेहर्यावर नेहमी एक स्मित हास्य असायचं. त्याला त्रासलेला, किंवा तणावाखाली मी तरी कधीच बघितले नाही. क़ायम स्वागतासाठी तयार. 

माझे बाबा तसे भाऊचे मामा. पण त्यांचं नातं मित्रत्वाचं होतं. त्याच्या मित्रमंडळीत मंडलीक मामा हे लोकप्रिय नाव होतं. मामा भाच्याची जोडी बरीच famous होती. मला डिप्लोमाला पुणे, मुंबई आणि औरंगाबाद ला admission मिळत होती. बाबांनी औरंगाबाद ला झूकतं माप दिलं. कारण का तर "विल्को" चं घर आहे, पोरावर लक्ष राहील. त्या सगळ्यांनी असं लक्ष ठेवलं की मला त्या तीन वर्षात घरची उणीव भासलीच नाही. पैठण गेटचं ते दुकान आणि वरती तीन मजले घर, प्रत्येक मजल्यावर तीन खोल्या. खोल्या तशा लहान होत्या पण त्या घरात राहणार्या प्रत्येकाचं मन फ़ार मोठं होतं. १२बाय १२ च्या dining room मधे कितजण जेवून जायचे त्याला काही हिशोब नव्हता. कधीही जा, द्रौपदी च्या थाळीत जेवण तयार. अर्थात त्याचं श्रेय वासंती वहिनी आणि अस्मिता वहिनींना.

भाऊ पुण्याला यायचा, बाबांची स्कूटर घेउन जायचा. बाबा नेहमी १-३० पेट्रोल भरायचे. भाऊनी स्कूटर नेली की तो मात्र टाकी फूल करूनच आणायचा. मला या दिलदारपणाचे नेहमीच आश्चर्य वाटायचे, आणि मनात यायचं की मोठेपणी असं भाऊसारखंच वागायचं, दिलदारपणे. 


माझं बजाज आॅटो औरंगाबाद ला selection झालं होतं. आम्ही १२ जणं joining साठी आलो होतो. त्यापैकी मी एकटाच मेडिकल मधे reject झालो. भाऊने डाॅक्टर बर्वे ना सांगून परत टेस्ट घेतली, पण दुर्दैव. माझा रक्तदाब कमी आलाच नाही. खिन्न मनाने मी पुण्याला परत आलों.

कधी ते आठवत नाही, पण नानाची बायपास झाली, रूबी हाॅलला. कुणी बॅनर्जी डाॅक्टर होते. मी झोपायला जायचो हाॅस्पिटलला. आॅपरेशन नंतर भाऊ सगळयांना सांगत होता "तब्येत एकदम चांगली आहे" भाऊनीच सांगितले म्हणजे सर्व निर्धास्त घरी जायचे. मी आणि तो पान खायला चाललो होतो, माझा हात हलकेच दाबून भाऊ म्हणाला " नानाची तब्येत ज़रा नाज़ुक आहे." मी चरकलो. एवढा वेळ प्रत्येक जण भाऊकडे बघून खुशीत परतायचा. स्वत: भाऊ मात्र टेन्शन झेलत होता, हसतमुखाने. सुदैवाने सगळं सुखरूप झालं. नानाची तब्येत सुधारली.


मी spindle repairs चा business चालू केला ९२ साली. भाऊला त्यांचं भलतंच अप्रूप. माझ्या बरोबर १०*१० च्या shop वर आला. मी spindle repair करतों म्हणजे काय हे समजावून घेतले. आणि मनापासून आशिर्वाद दिले़. कष्टाबरोबरच अशा आशिर्वादामुळेच माझी वाटचाल चालू आहे, यावर दृढ़ विश्वास आहे.

साधारण १० वर्षापूर्वी सकाळी ४ ला फ़ोन आला जय भाऊजींचा, भाऊला severe heart attack आला आहे. लवकर चला. आईला सोडायला येरवड्याला गेलो. मीनाताईचा चेहरा बघून काय झाले याची कल्पना आली. घरी परत आलो, पण मन काही लागेना. ६:३० च्या बसनी औरंगाबाद ला निघालो. पण अशाप्रसंगी चमत्कार होत नाही, खेळ रात्रीच संपला होता.

आजही औरंगाबाद ला गेलो की बाई-काका आणि भाऊची आठवण हटकून येते. अर्थात नाना-अस्मिता वहिनी आणि वासंती वहिनींना भेटून येतो़, यथेच्छ पाहूणचार झोडून घेतो. ज़र जायला जमले नाही, तर चुकल्यासारखे होते. एवढं प्रेम आणि आशीर्वाद त्या घरातून मिळाले की या जन्मात तरी आटणार नाही.




No comments:

Post a Comment