Tuesday, 29 April 2014

प्रहसन

फेसबुकमुळे मला माझ्यामधे विविध गुण आहेत याचा साक्षात्कार होत गेला. म्हणजे अगदी multifaceted का काय अशी माझी personality झाली आहे याची मला जाणीव होऊ लागली आहे.

- राजकारण आणि अर्थकारण या दोन नवीन विद्येचा शोध लागला आहे. राहुल, अरविंद दादा आणि मी लहानपणी क्रिकेट खेळायचो (प्रियांका सायकलवर खेळायची) आणि मी मारलेला बाॅल तिसर्या मजल्यावरच्या मोदीकाकांच्या खिडकीची काच फोडतोय इतकी घष्टन असल्याच्या सहजतेने मी त्यांच्यातल्या गुण दोषांची चिकित्सा करत असतो.

स्वत:च्या धंद्याची balance sheet न वाचता येणारा मी, चलनवाढ, भारतीय रूपयांची अंतरराष्ट्रीय बाजारात घसरण होण्याची कारणं याबद्दल हिरीरीने मतं मांडतो.

- आणि मला अचानक मला साक्षात्कार झाला की ते म्हणजे इतिहासातले नेते किती चुकीचं वागले ते. त्यातल्या त्यात गांधीजी आणि सावरकर यांच्याबद्दल लिहायचे म्हंटलं की माझी लेखणी सरसावते आणि मग मी फटकारे मारायला चालू करतो. आजकाल तर मी ज्ञानेश्वर आणि रामदास यांचं कसं चुकलं यावर नेहमीप्रमाणे अर्धवट अभ्यास चालू केला आहे. लवकरच येत आहे यावरचा लेख.

तरी बरं यावर खराखुरा अभ्यास असणारे हुशार लोकं माझ्या मित्रयादीत आहेत, पण मी त्यांनी लिहीलेल्या मतांच्या वाटेलाही जात नाही. मी माझ्यासारखी अर्धवट बुद्धी असणार्यांच्या वादविवादात रमतो.

- दुसरा गुण म्हणजे मला एक जाणवायला लागलं आहे की मी एक सिद्धहस्त लेखक झालो आहे. म्हणजे पुल आणि वपुंनंतर रामं च. (जरा जास्तच होतोय ना………… खर्च)

- computer वर copy-paste ह्या function चा बेफाम वापर चालू केला आहे. इतका कि परवा office मध्ये PDF format मधला content मी copy करून word मध्ये paste करण्याचा एक तास प्रयत्न केला. 

- आता राहिले माझ्यातले दोन गुण त्यातला एक म्हणजे photography. नाही म्हणायला फेसबुक वापरायला चालू करून दोन एक वर्ष झालीत पण तरीही माझ्यातला निद्रिस्त फोटोग्राफर अजून जागा कसा झाला नाही ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय. (तरी परवा झर्याचा फोटो टाकून रंगीत तालीम चालू केली आहे, बघू कसं जमतंय ते) आणि दुसरं म्हणजे कविता. तसं र ला र आणि 
ट ला ट जुळवतो हि मी. सध्या कागदावर खरडण चालू आहे. थोडं जमलं कि पाऊस च पाडतो बघा कवितांचा.  

(माझ्या मित्रायादीत ल्या नितांत सुंदर फोटो काढणारे मित्र आणि तेवढ्याच ताकदीच्या कविता लिहिणाऱ्या मित्रांची मन:पूर्वक क्षमा मागून)

अशा रितीने झुकेरबर्गांच्या च्या मार्कमुळे माझ्यात लपलेल्या सुप्त गुणांचा विकास होत आहे याबाबत माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

प्रहसन 

Monday, 28 April 2014

नील चं पहिलं स्फुट

इंडिया हे किती घाण आहे हे असं मी लिहीतो आहे. डस्टबीनच्या ऐवजी रोड वर जास्त कचरा दिसतो. एक चांगली टेम्पो जाते वाटतं की काही तरी चांगलं काम असेल. पण मग दिसतात २-३ गरीब बसलेले तिकडे. रोडच्या बाजूला दुकानं आणि घरांच्या ऐवजी एक झोपड्याचं गाव दिसतं. तिकडे ग़रीब बसलेले असतात़ आणि चांगले चांगले माणसं़ त्यांच्याकडे लक्षही देत नाहीत. आणि ते बिचारे उपाशी मरून जातात. एक चांगलं टेम्पल असतं, खूप लोकं जातात तिकडे. मग त्याच्या साईडला एक लाईन लागलेली असते गरीबांची आणि श्रीमंत माणसं़ फक्त त्यांच्या स्वत:साठी प्रेयर करतात. आता हे सगळं आहेच तर त्यांचं इकडे जगून काय तरी फ़ायदा आहे ते म्हणतात. आपण इकडे जगतो हे बरं आहे पण गरीबांसाठी इंडिया सर्वात चुकीची जागा आहे. कारण जिथे त्यांच्यासाठी काहीच पर्वा नाही तिकडे, तिथे राहून  काहीच फायदा नाही. 

Sunday, 27 April 2014

क़िस्सा गमतीचा

क़िस्सा गमतीचा (सहजच आठवला Mandar Kale यांच्या पोस्टवरून, पण त्यांच्याही लक्षात येणार नाही, कुठल्या पोस्टवरून ते)

१९९७-९८ असावं. मुंबईहून आलो होतो. डेक्कन क्वीन ने. (डेक्कनचं नाव घेतलं की मी आजही काॅलेजमधल्या एखाद्या सुंदर मुलीची आठवण आल्यासारखा लाजतो. काय ते crush काय म्हणतात ना तसंलंच काही तरी). शिवाजीनगरला उतरलो. हो, तेव्हा चतुश्रूंगीसमोर, विद्यापीठ रस्त्यावर रहायचो. (नाही म्हणजे घर होतं बरं का MSEB चं quarter, नाही तर तुम्ही म्हणणार............). रिक्शाने जायचं होतं. पुण्यातल्या रिक्शावाल्यांशी कसं वागायचं हे एव्हाना मी शिकलो होतो. समोर जणू मर्सिडीज़ उभी आहे, माझ्यासाठी या टेचात निघालो. (हिरो होंडाने संचार होता तेव्हा). एक जण आला मागे "कुठं जायचं".
मी "चतुश्रूंगी"
तो: मीटरवर १० रू द्या.
मी: ५ देईल
तो: ठीक आहे. या.

रिक्शा मिळाली (अवार्ड मिळाल्याच्या अविर्भावात). निघालो, असं म्हणेपर्यंत रिक्शा राहुलच्या समोरच्या पेट्रोल पंपावर जाउन थांबली. बर्यापैकी लाईन होती तिथे.

मी: काय हो
रिक्शाधिपती: पेट्रोल संपत आलं आहे, भरावं लागेल
मी: अहो, दाढ़ी करायचा धंदा काढला तर वाटी वस्तरा नको का बरोबर.
तो हसला फक्त.
मी: (घड्याळ्याकडे बघत) खूपंच वेळ लागतो हो. (खरंतर माझा एक डोळा मीटरकडे होता. तिथला flag पडला की कसंतरीच व्हायचं)
रि: (थोडा जरबेनंच) ट्रेनला १० मिनिटे उशीर झाला असता तर बोलला असता का काही. गपगुमान बसलाच असता ना?
सवाल बिनतोड होता.
मी: अहो दादा, ट्रेनचा ड्रायव्हर आला नव्हता माझ्यामागे निमंत्रण देत "या, बसा माझ्या गाडीत म्हणून"
उत्तर पण बिनतोड होते. नंबर आला, पेट्रोल भरले. त्याने किक मारली (खरंतर हात वापरतात, किक का म्हणावं) आणि म्हणाला
"इथं भेटलात वर नका भेटू"

मी: वर कसं भेटणार, तुम्ही स्वर्गात अन मी नरकात

मागं वळून त्यानं smile दिलं. ५ मिनीटात आलंच घर. पैसे दिले. मीटरच्यावरचे ५ रू त्याने परत दिले, म्हणाला "स्वर्गात जागा दिल्याबद्दल"

मी काही म्हणेपर्यंत गिअर टाकून गेलाही तो!!

मतदान

१७ एप्रिल ते २० एप्रिल मुंबईला exhibition आहे. १७ ला सकाळी १०:३० वाजता inauguration होतं, कलामांच्या हस्ते. १६ ला आलो सकाळीच stall सजवायला. दिवसभर खपलो. Stall लावला. सकाळी ७ ला पहिल्या धारेचं मतदान करुन १०:३० वाजता कलामांचं धारेचं भाषण ऐकायचा जंगी प्रोग्राम बनवला. काल रात्री पोहोचलो १० वाजता परत पुण्याला. 

सकाळच्या पारी सजून धजून सेंट बिंट मारून ६:४५ ला हज़र झालो. पोलिंग बूथवरती लगीन घाई चालू होती. Voter slip फक्त बायकोची होती. पण तिच्या पुढं मागंच आपला असेल असं वाटलं. (खरं तर मागंच). पण हाय दुर्दैव. त्या यादी बरोबरच सर्व याद्या धुंडाळल्या. पण अस्मादिकाचं नाव काही सापडलं नाही. बायको voting करून बोट डोळ्यासमोर नाचवू लागली. ती मला बोटावर नाचवत असल्यामुळे मला फार वावगं वाटलं नाही.

मग माझं शोध कार्य सुरू झालं. माजी राष्ट्रपती मला भेटू शकणार नाहीत हे एव्हाना पक्कं झालं होतं. यच्चयावत बूथ, तिथल्या याद्या, रस्त्यावर दिसणारे अनेक संगणक इथे माझं नाव आहे का नाव असं करत फिरू लागलो. नंतर तर परेरा, कुतुबजीवाला, गांगुर्डे यांची नावं पण मी शोधून दिली, पण माझं काही सापडलं नाही.

एव्हाना दहा वाजले, pillar to post पळून (असंच म्हणतात ना) मी शेवटी वारेंची मनातल्या मनात क्षमा मागितली. बसनी परत मुंबईला येणार होतो. कंटाळा आला होता, शेवटी डार्लिंग टोयोटा एटिआॅस ला म्हणालो चल धन्नो.

अशा रितीने मताधिकार साठी मी बोट दाखवण्याऐवजी त्यांनीच मला अंगठा दाखवला. गंमत आहे ना, ड्रायव्हिंग लायसन्स, pan card, आधार कार्ड आणि पासपोर्ट घेऊन फिरणारा मी माझं नागरिकत्व १९९९ पासून मतदान करतो तिथं सिद्ध करू नाही शकलो.

इतिहास बघता बर्याचदा मी ज्यांना मत दिले त्यांनी धूळ खाल्ली आहे. पहिल्यांदाच मतदान चुकले आहे, वार्यांना त्यामुळे चमत्काराची अपेक्षा ठेवायला हरकत नाही.


मतदान 

पाणी

चला निवडणूक संपली, आता उन्हाळा जाणवायला लागेल. धरणाचा पाणीसाठा इतकाच टक्का आहे अशा बातम्या येतील, मग आपली धाकधूक वाढेल. याबाबतीत काही मुद्दे आहेत त्याला काही आधार नाही, पण आहेत. बघा पटले तर

१. केसावरून पाण्याचा हात फिरवताना, ब्रशनी दात घासताना नळ बंद ठेवा. 

२, शाॅवर आहे म्हणून वापरायलाच पाहिजे असं काही नाही. घरात खूप शोभेच्या वस्तु असतात. सहा दिवस तरी शाॅवरला तशी वस्तु समजायला हरकत नाही. एखादा दिवस करा enjoy.

3. "मला दिवसातून दोन वेळा आंघोळ केल्याशिवाय जमतच नाही" असो बापडे. पण हात पाय तोंड धुऊन सुद्धा माणूस fresh होऊ शकतो. (कष्टकरी असेल तर ठीक आहे, पण ac बेडरूम, ac कार, ac आॅफीस तरी हे मळतात कसे बुवा)

४. सोसायटीमधे स्विमींग पूल असणे यासारखी भंपक गोष्ट नाही. इनमिन ३/४ टाळक्यांसाठी दररोज पूल top up करणे, वर्षातून एकदा तो साफ़ करणे यात खूप पाणी वाया जाते. सार्वजनिक स्विमींग पूल बेस्ट. (Utilization व्हायला पाहिजे)

५. स्वच्छतेची आवड चांगलीच. पण cleanliness maniac असू नये. उगाच आपलं गॅलरीत पाणी मार, बेफाम बाथरूम धुवायचं यावर control हवा.

६. मोलकरणींवर लक्ष ठेवा (हे काय भलतंच), बिन कामाच्या धड़ाम नळ सोडून काम करतात. (माझ्या या अशा वाईट नजरेपायी १/२ बायका काम सोडून पण गेल्या)

७. टाॅयलेटमधे दोन knob चा flush बसवा. म्हणजे १ नंबरनंतर कमी पाण्याचा (२ ते ३ लिटर) आणि २ नंबरनंतर जास्त पाण्याचा (७ ते ८ लिटर) वापर करावा. नसेल तर urinal म्हणून वापरल्यावर water jet चा वापर करावा.

८. गाडी धूुणार्याला सांगावं " भाऊ जरा कोरड्या कपड्याचा वापर कर. गाडीला बादलीने आंघोळ घालू नको"

९. वेटरला सूचना आहे हो ग्लास रिकामा झाला की भर, पाण्याने. पण तुमच्या घशाला कळतं ना आता नको म्हणून, थांबवा की मग.

१०. World standard नुसार १२५ ते १३५ लिटर पाणी लागतं दरडोई दिवसाला. आपण मागतोय २०० लिटर. (कुठेतरी वाचलेली माहिती, चुक असु शकते) ६५x४० लाख लिटर इतकं पाणी आपण excess वापरतो. करा गुणाकार. (उपमुख्यमंत्री चिडणार नाहीत तर काय मग)

अगदीच झेपलं नाहीतर उन्हळ्यात परभणी/जालन्याला trip काढा, सहकुटुंब. लक्षात येईल मी का म्हणतो ते.


पाणी 

मुंबई-परभणी

Good morning मुंबई (असं म्हंटलं की मला लगे रहो मुन्नाभाई मधली केसांच्या बटा कानाच्या मागे सारणारी विद्या बालनच आठवते आणि लागोलाग तो पण आठवतो दैव देते आणि कर्म नेते वाला संजय दत्त, असो.)

फार दिवसांनी मुंबई त राहण्याचा योग आला. नाहीतर नेहमी आपलं सकाळी यायचं, काम आटपायचं आणि वस्तीला घरी. मुंबईतल्या लोकांची वेगवेगळ्या गरजेतून काम शोधण्याची वृत्ती मला नेहमीच अचंबित करत आली आहे. मग ते कार्यक्रमात प्लास्टिकच्या chair वर मऊ स्पंज टाकून त्यावर पांढरं कव्हर टाकून एकदम भारी खुर्ची बनवणं असो, की drink and drive ला जबरी fine असल्यामुळे रात्री बारच्या बाहेर तुमच्या कारने घरी सोडून येणारे ड्रायव्हर असो. लग्नाच्या हाॅलवर valet parking करण्याची सोय फक्त मुंबईत. Eastern express हायवे तसा तुलनेनं तुरळक वस्तीचा होता पूर्वी. मोबाईल रूळला तसा पुलाच्या पिलरवर पंक्चर काढणार्याचे मोबाईल नंबर. ज्याला हा रस्ता माहित आहे त्याला पटेल याचं महत्व.

आता हे सगळं ज्यावरून आठवलं ते. १९९४ पासून मी वेगवेगळ्या शहरात exhibition मधे भाग घेतो आहे. दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई, राजकोट, लुधियाना, अहमदाबाद अशा ठिकाणी. ३० एक वेळा तरी. परवा मुंबईत exhibition चं सामान घेऊन पोहोचलो. एक जण आला कार जवळ, म्हणाला "साब, आयटम ले जाऊ क्या stall पे" मी म्हणालो "कितना" तर म्हणाला "दोनशे" त्याच्या दोनशेवरून वाटलं हा मराठी आहे,confirm करावं म्हणून विचारलं "मराठी का" तर म्हणाला "हो". "बरं, घ्या चला"

सगळं सामान ठेवल्याबरोबर मला काळजी लागली पोस्टर्स लावायची. फारंच कंटाळवाणं काम असतं ते. Both side gum च्या पट्ट्या, त्यांची लेव्हल, wrinkles न पाडता लावणे, सगळं फारच जिकीरीचं. कष्ट नाही, पण ते माळ्यावरून पूजेसाठी पाट काढताना वैताग येतो़ ना तसं. त्या विचारातच असताना तो परत आला "साहेब, banner चिकटवून देऊ का?" मी चमकलो, म्हंटलं काय मन वाचतो का हा. गेल्या ३० exhibition मधे पहिल्यांदाच प्रश्न विचारला. "५० रू घेईन एका बॅनरचे" माझ्या मध्यमवर्गीय चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह बघून त्याने लागलीच सांगून टाकलं. गुणाकार केला (गणित फार पक्कं) म्हंटलं "घे भाऊ" मी बाकीचे सामान द्यायला लागलो तर म्हणाला "सगळं आहे माझ्याकडे" मराठी माणसाची ही तत्परता बघून खूशच झालो मी.

नाव गाव विचारलं. "शिवाजी नाव अन गाव परभणी" आता तर मी पागल व्हायचं बाकी राहिलो. त्याला सांगितलं मी पण परभणीचा मुळचा. नेहमीप्रमाणे भरल्या गळ्याने मी माझं आजोळ सांगितलं मुक्ताजीन. (हे एक मला न कळलेलं गणित आहे, परभणी आणि त्यातल्या त्यात मुक्ताजीनचं नाव घेताना आवंढा येउन डोळ्यात धूसर का दिसतं ते, invariably).

तर म्हणाला "या हाॅल मधे जेव्हढी पोरं काम करतात ना ती बरीच परभणीची" दोन सेकंद थांबून म्हणाला "परभणीचे साहेब म्हणाल तर तुम्ही एकटेच"

आता या वाक्यावर दु:ख व्यक्त करावं का आनंद, ते कळलंच नाही.

कालवाकालव च झाली.


मुंबई-परभणी 

Saturday, 12 April 2014

चाल

तसं लाच दयायचा प्रसंग राकेश वर कमी वेळा आला. म्हणजे २/३ वेळा.  पण जेव्हा आला, एकदम खणखणीत. शे मध्ये नाही, एकदम हजारात. ठाण्याच्या एका बंद पडलेल्या विभागात १९९६ मध्ये मोजले होते रु २००००. मटेरिअल सोडवण्यासाठी. १५ दिवस करमत नव्हतं, सारखी १०० ची दोन बंडलं दिसायची स्वप्नात.

दुसर्या एका ठिकाणी एक परवानगी हवी होती. राकेश गेला  केबिन मध्ये. बाई होत्या. सावंत नावाच्या. (नाव बदललं आहे). बापू नावाचा accounts चा माणूस होता बरोबर. रु ५००० पर्यंत द्यावं लागेल. आधीच सांगितलं होतं. सावंत बाईंचे मिस्टर *********** नावाच्या वाहन उदयोगात Sr Manager होते.

राकेश : सावंत साहेब ओळखीचे आहेत. (५ चे काय ४ किंवा ३ होतात का या आशेवर)
बाई: हो का? अरे वा छान.
(बाकी पेपर तपासल्यावर)
बाई: हा, ठीक आहे १०००० दया
(केबिन चा दरवाजा उघडा, पण आवाज खणखणीत)
राकेश: वरचे ५ कसली फी का? receipt मिळेल का?
बाई: अहो नाही, माझेच १००००.
राकेश: अहो फार होतात.  छोटी कंपनी आहे
बाई: होईल कि मोठी. ********** चे supplier ना तुम्ही. छोटे का राहणार आहात. ते काही नाही देऊन टाका १०. मिळून जाईन permission ३-४ दिवसात.

झक मारली आणि मिस्टर सावंतांची ओळख सांगितली असं झालं.

मुंबई ला गेला  होता. असंच मटेरियल अडकलं होतं एका ठिकाणी. courier कंपनीचा फोन आला सप्लायर ने invoice मध्ये चुकीचा आयटम लिहिला आहे. माहिती नव्हतं आणि त्यातून गोंधळ उडाला होता, पैसे दयावे लागतील. राकेशनी  विचारले "किती" तर म्हणाला "आणा १० पर्यंत" अडकलेल्या material ची किंमत साधारण लाखापर्यंत होती. राकेश गेला साहेबाच्या केबिन मध्ये. साहेब म्हणजे स्मार्ट पोरगा होता तिशीतला. जीन्स trouser, उंची t shirt, Italian shoes थाट होता नुसता. तिवारी नाव ठेवू त्याचं.

तिवारी: (खुर्चीवर रेलत, हात डोक्यावर नेत) हा, क्या है भाई.
राकेश: साब वो मटेरियल
तिवारी: हा बोलो
राकेश: आप ही बोलो
तिवारी: ३०,००० लगेगा
(राकेश  उडालाच )
राकेश: साब, गलतीसे हो गया, मालूम नहीं था. छोटी गलती, उसकी इतनी बड़ी सजा.
तिवारी: (बाजूच्या माणसाला) अरे सुन, इनका केस डाल दे. (राकेशला) छः महीने के बाद आना, जो decision होगा देखा जायेगा। ६० तक फ़ाईन हो जायेगा।
राकेश ढिम्म उभा
तिवारी: अच्छा ठीक है, २५ दे दो. बस इसके नीचे नहीं। अरे यंहा पे ५/६ लोगोंको देना पड़ता है, मै अकेला थोड़ी ना हु. इसके बाद किसीको देना नहीं पड़ेगा। ८ दिन में मटेरियल आएगा।

खिशात १० च होते. जवळच भाऊ राहत होता. त्याच्याकडून १५ आणले. आणि गेला  परत तिथे. courier कंपनीच्या माणसाला विचारलं, जाऊ का दयायला आत. तो तोंडावर हात ठेवत म्हणाला "अहो, येडे आहात का तुम्ही. तिथे शेवटच्या केबिन मध्ये वाट बघा. तिथे येईल एक जण" राकेश  गेला . २-४ लोकं खाली मान घालून काम करत होती. मग आला, कोंकणातला मराठी होता. सुरेश म्हणू त्याला.

सुरेश: राकेश  का?
राकेश: हो
सुरेश: २५ घायचे, बरोबर
राकेश: (आश्चर्याने) पण तुम्ही
सुरेश: तुम्हाला काय करायचं, २५ ठरले आहेत ना! दया तेवढे
राकेश नि दिले, आणि थोडया गप्पा मारल्या. हळूहळू कळलं. पण जे कळलं ते धक्कादायक होतं.

सुरेश एका c & f मध्ये कामाला होता. १५००० पर्यंत पगार होता. सारखा यायचा या विभागात. साहेब लोकं ओळखू लागले त्याला. त्यांना गरज लागू लागली, मध्ये कोणीतरी पैसे घेण्यासाठी. मग ते सुरेश ला सांगू लागले. सुरेश गोळा करायचा आणि मग साहेब लोकं त्याला त्या बदल्यात ५००-१००० रु देऊ लागले. पैसा खुळखुळू लागला. काम फारच वाढलं. मग सुरेश नि रेट च फिक्स करून टाकला, रकमेच्या २%. काम वाढलं.  महिन्याची कमाई ४०००० झाली. जॉब सोडला आणि फुल टाइम हाच उदयोग. राकेश नि विचारलं "टेन्शन नाही येत" तर म्हणाला "सवय झाली" राकेश नि विचारलं "फसवा फसवी नाही?" "अजिबात नाही, जागच्या जागी हिशोब. इमानदार आहेत लोकं" हसलाच राकेश . बोलता बोलता पैसे मोजले. राकेशनी  विचारलं "भाऊ, मटेरीअल येईल ना व्यवस्थित" तर टेचात म्हणाला "बिनधास्त जावा घरी. मी सांगितलं ना, इमानदार आहेत लोकं"

कपाळावर मारून घेतलं आणि निघाला राकेश.

(ध चा मा झाला, तसा ज चा क झाला असं कुणाला वाटत असेल तर ते बरोबर आहे. आणि एकदम विषयाला हात कशाला घालावा म्हणून लेखाचं शीर्षक लाच नाही तर चाल)

Monday, 7 April 2014

khushi

मागे वळून बघताना (२५ वर्ष इंडस्ट्रीत घासल्यावर असं नक्कीच म्हणू शकतो नाही का. खरं तर २४, कारण शेवटचं एक वर्ष फेसबुकवर घासतो आहे) असं माझ्या लक्षात आलं आहे की काही गोष्टींबाबत माझे फारच वांदे झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे प्रवास. म्हणजे मी पुण्याहून destination ला पोहोचायचो व्यवस्थित. पण ते लोकल फिरायचं म्हणजे ताप व्हायचा. गुजरात मध्ये छ्त्राल च्या रणरणत्या उन्हात मी बसची वाट बघत उभा राहायचो. (हो, तेव्हा मोदी मुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे त्याकाळी  उन्हाळ्यात उनच लागायचं. आता सारखे गुजरातचे रस्ते वातानुकुलीत नव्हते). कार समोरून निघून जायच्या पण कुणी लिफ्ट म्हणून द्यायचं नाही. शेवटी मी कुठल्या तरी ट्रक मध्ये बसून अहमदाबादला यायचो. मार्केटींगच्या च्या करिअर मधील फारच विचित्र प्रकार होता तो. (इथे सांगायचं म्हणजे मोदी मुख्यमंत्री झाले आणि माझा तो जॉब सुटला. गुजरात माझा मुख्य area होता सेल्स चा. विचार करा. कसला मुर्ख आहे ना मी. जॉब सोडला नसता तर लोळलो असतो पैशांच्या राशीत. जाऊ द्या ते. उसासे सोडण्याशिवाय काही नाही आता).

तर आठवलं यासाठी कि काही दिवसांपूर्वी औरंगाबाद हून येत होतो. एकटाच होतो कार मध्ये. दुपारची वेळ साडेतीन ची. वाळूज च्या मनमंदिर चौकात एक हरहुन्नरी दिसणारा सेल्स चा माणूस उभा होता. मला माझे दिवस आठवले. मी हळूच त्याच्या बाजूला गाडी उभी केली. काच खाली घेऊन त्याला विचारलं "कुठे जायचं?". त्याला मी बहुधा गाडीवर ठेवलेला ड्रायवर वाटलो असावा. त्याची पण काही चूक नाही, दिसतोच मी तसा. तो ;म्हणाला "नगर ला सोडणार का" मी म्हणालो "बसा लवकर" तर तो साळसूदपणे मागचा दरवाजा उघडून बसू लागला. मी म्हणालो "पुढे बसा, तेव्हढ्याच गप्पा मारत जाऊ." मग किती वर्षांपासून गाडी चालवता, हीच लाईन कि भारतभर प्रवास केलाय वैगेरे सामन्यात: ड्रायवर ला जे प्रश्न विचारून आपण time पास करतो, ते प्रश्न विचारून तो तरुण त्याची कहाणी सांगू लागला. सेल्स, त्याचे फिरणे, कंपनीची expense voucher sanction करतानाची टाळाटाळ, उन वैगेरे वैगेरे.

नगर आले, तर म्हंटला बस स्थानकासमोर सोडा. मी गाडी थांबवली. तर त्याने खिशातून १०० ची नोट काढून मला दाखवली.

मी: काय हे.

तो: एवढे राहू द्या.

मी: एवढ्यानं काय होणार.
तो: मग किती
मी: ५०० लागतील
तो: अहो एवढे कसे
मी: एवढेच
तो: अहो आधीतरी सांगायचं
मी: तुम्ही विचारलं का?

असं म्हणाल्यावर चिडलाच तो. माझी पण अभिनयक्षमता संपली. म्हणालो "मित्रा, हे राहू दे तुझ्याकडेच." मी माझे कार्ड दिले आणि त्याला म्हणालो "तुझ्या जागी मी मलाच पाहिले, १५ वर्षापूर्वीचा. पार्श्वभाग बाहेर काढून रिक्षाच्या दांडीवर बसून भोर रस्त्यावरून सातारा रोड ला यायचे आणि मग तिथून पुण्याला. मनाला वाटले मी जे भोगले  तसे तू कशाला भोगावेस. आणि पैसे तरी कसले घेणार या खेळणाऱ्या थंड हवेचे" मघाच्या  रागाची जागा आता आश्चर्याने घेतली होती. सरांना चहाचे निमंत्रण झाले. मी म्हणालो "नंतर कधीतरी" सस्मित चेहर्याने त्याने मला प्रेमभराने हस्तांदोलन केलं आणि बाय म्हणाला. मी सुद्धा शीळ वाजवत पुण्याच्या दिशेने निघालो.  जमेल तसा आनंद द्यावा, यालाच जगणे म्हणत असावे बहुधा. मी तेच अनुभवत निघालो……जरा खुशीतच.

Tuesday, 1 April 2014

अस्ताव्यस्त

तसेही वर्षभर मी मूर्ख बनवलाच जात असतो. कधी supplier कडून,  तर कधी customer कडून. कधी juniors येडे समजत असतात तर कधी seniors. दुश्मन तर वाटच बघत असतात कधी गुंडाळतो याला, पण मित्रसुद्धा देतात बर्याचदा झटका.

मला कशाला असेल आजच्या दिवसाचे अप्रूप.
*********************************************************************************

वर्षाला कंपनीच्या कमाईपैकी ३३% सरकारी खजिन्यात गोळा करतो . सेल्स टॅक्स, excise, सर्विस टॅक्स सारं काही भरतो इमानऐतबारे. जास्त काही मागत नाही, एक जनरल टॅक्स करा आणि distribute करा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला. हो, पण ते income tax abolish करण्याचं ते अशक्य स्वप्न नका दाखवू.

आधीच्या दोन शुभेच्छा़ अबधित ठेवून नवीन आर्थिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा़.

गर्व से कहो हम व्यावसायिक है!  (आपल्यालाही जमतात बरं का घोषणा वैगेरे)
*********************************************************************************

माझ्याकडूनही चुका झाल्यात, अगदी अक्षम्य म्हणाव्यात अशाही. काहींचं परिमार्जन मीच केलं तरी काहींचं नियतीनं. आणि कधी कधी तर सुहृदांनी ही कान पिरगाळला तेव्हा कुठे गाडी पटरीवर व्यवस्थित चालू आहे. नाहीतर घसरायला काही वेळ लागत नाही.

सिलसिला आभासी जगातही चालूच आहे.
*********************************************************************************

कशी पोस्ट आहे ना .............. विस्कळीत

न आवरलेल्या आंथरूणासारखी.

कधी कधी लिहावं असं असंबद्ध

अस्ताव्यस्त
********************************************************************************


असा मी जसा मी कसाही मी संस्कार तुमचे
काळजीने चिंब नकारातही होकार तुमचे
न ऐकून ऐकता सोडलेले हुंकार तुमचे
आयुष्य घेई आकार आमचे स्वप्न होई साकार तुमचे

निसरड्या रस्त्यावरून घसरताना सावरणारे पुण्य तुमचे
दलदलीतून चालताना चिखलाचे डाग उडू न देणारे सत्व तुमचे
उपहासाच्या अविर्भावात दडलेले ममत्व तुमचे
पोटाला चिमटा तुमच्या पण सुख वाटी आमच्या असे विचित्र तत्व तुमचे

यशोशिखरावर नजर खिळवताना उभा राहिलो ते खांदे तुमचे
भविष्याचा वेध ज्याने घेतला ते डोळे तुमचे
मायेची मुक्त उधळण करणारे हात तुमचे
साष्टांग दंडवत मायबाप हो घ्या पुढे पाय तुमचे