Sunday, 27 April 2014

मुंबई-परभणी

Good morning मुंबई (असं म्हंटलं की मला लगे रहो मुन्नाभाई मधली केसांच्या बटा कानाच्या मागे सारणारी विद्या बालनच आठवते आणि लागोलाग तो पण आठवतो दैव देते आणि कर्म नेते वाला संजय दत्त, असो.)

फार दिवसांनी मुंबई त राहण्याचा योग आला. नाहीतर नेहमी आपलं सकाळी यायचं, काम आटपायचं आणि वस्तीला घरी. मुंबईतल्या लोकांची वेगवेगळ्या गरजेतून काम शोधण्याची वृत्ती मला नेहमीच अचंबित करत आली आहे. मग ते कार्यक्रमात प्लास्टिकच्या chair वर मऊ स्पंज टाकून त्यावर पांढरं कव्हर टाकून एकदम भारी खुर्ची बनवणं असो, की drink and drive ला जबरी fine असल्यामुळे रात्री बारच्या बाहेर तुमच्या कारने घरी सोडून येणारे ड्रायव्हर असो. लग्नाच्या हाॅलवर valet parking करण्याची सोय फक्त मुंबईत. Eastern express हायवे तसा तुलनेनं तुरळक वस्तीचा होता पूर्वी. मोबाईल रूळला तसा पुलाच्या पिलरवर पंक्चर काढणार्याचे मोबाईल नंबर. ज्याला हा रस्ता माहित आहे त्याला पटेल याचं महत्व.

आता हे सगळं ज्यावरून आठवलं ते. १९९४ पासून मी वेगवेगळ्या शहरात exhibition मधे भाग घेतो आहे. दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई, राजकोट, लुधियाना, अहमदाबाद अशा ठिकाणी. ३० एक वेळा तरी. परवा मुंबईत exhibition चं सामान घेऊन पोहोचलो. एक जण आला कार जवळ, म्हणाला "साब, आयटम ले जाऊ क्या stall पे" मी म्हणालो "कितना" तर म्हणाला "दोनशे" त्याच्या दोनशेवरून वाटलं हा मराठी आहे,confirm करावं म्हणून विचारलं "मराठी का" तर म्हणाला "हो". "बरं, घ्या चला"

सगळं सामान ठेवल्याबरोबर मला काळजी लागली पोस्टर्स लावायची. फारंच कंटाळवाणं काम असतं ते. Both side gum च्या पट्ट्या, त्यांची लेव्हल, wrinkles न पाडता लावणे, सगळं फारच जिकीरीचं. कष्ट नाही, पण ते माळ्यावरून पूजेसाठी पाट काढताना वैताग येतो़ ना तसं. त्या विचारातच असताना तो परत आला "साहेब, banner चिकटवून देऊ का?" मी चमकलो, म्हंटलं काय मन वाचतो का हा. गेल्या ३० exhibition मधे पहिल्यांदाच प्रश्न विचारला. "५० रू घेईन एका बॅनरचे" माझ्या मध्यमवर्गीय चेहर्यावरचं प्रश्नचिन्ह बघून त्याने लागलीच सांगून टाकलं. गुणाकार केला (गणित फार पक्कं) म्हंटलं "घे भाऊ" मी बाकीचे सामान द्यायला लागलो तर म्हणाला "सगळं आहे माझ्याकडे" मराठी माणसाची ही तत्परता बघून खूशच झालो मी.

नाव गाव विचारलं. "शिवाजी नाव अन गाव परभणी" आता तर मी पागल व्हायचं बाकी राहिलो. त्याला सांगितलं मी पण परभणीचा मुळचा. नेहमीप्रमाणे भरल्या गळ्याने मी माझं आजोळ सांगितलं मुक्ताजीन. (हे एक मला न कळलेलं गणित आहे, परभणी आणि त्यातल्या त्यात मुक्ताजीनचं नाव घेताना आवंढा येउन डोळ्यात धूसर का दिसतं ते, invariably).

तर म्हणाला "या हाॅल मधे जेव्हढी पोरं काम करतात ना ती बरीच परभणीची" दोन सेकंद थांबून म्हणाला "परभणीचे साहेब म्हणाल तर तुम्ही एकटेच"

आता या वाक्यावर दु:ख व्यक्त करावं का आनंद, ते कळलंच नाही.

कालवाकालव च झाली.


मुंबई-परभणी 

No comments:

Post a Comment