Tuesday 7 June 2016

शिल्पभेट

शिल्पाचा चार सहा महिन्यापुर्वीच मेसेज आला होता, की ती भारतात येतेय म्हणून. इतक्या आधी कार्यक्रम ठरवणाऱ्या लोकांबद्दल मला नेहमीच असूयामिश्रित आदर वाटत आला आहे. मी पण अगदी टेचात सांगितलं, मी आहे, काही काळजी करू नकोस. मेसेंजर वर ग्रुप बनला. मेसेजमेसेजी चालू झाली. मेसेंजर वापरण्याबाबत मी फारच कंजूष आहे. काही स्त्री वर्ग याबद्दल माझ्यावर नाराज पण आहे.

४ जून तारीख मुक्रर झाली. जयंताने त्याच्या घराची दारे ग्रुप साठी उघडी केली, अन रात्रीच्या जेवणाची व्यवस्था अंगावर घेतली.

शिल्पा आणि बाकींना भेटायच्या अगोदर संतोष आला. माझ्यासारख्या नॅनो साईझ च्या भांडवलदाराबद्दल त्याच्या मनात जरा शंकाच आहे. त्याने मला काही अवघड प्रश्न विचारले. मी त्याला काही यथाबुद्धी उत्तरं दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मॉर्निंग वॉक ला गेलो. तिथून  ते नाष्टा होईपर्यंत संतोष ने प्रगती म्हणजे काय यावर माझं बौद्धिक घेतलं. तुम्हाला सांगतो, संतोष जर माझ्याबरोबर १५ दिवस राहिला तर हा मंडलू कमंडलू घेऊन विरक्तीच्या रस्त्यावर हिमालयाकडे कूच करेल. 

मग दिवस रेणुकादास बाळकृष्ण देशपांडे असं भारदस्त नाव असलेल्या, पण आर बी डी असं छोटं नामकरण केलेल्या तरल मनाच्या पण विद्वान माणसाची वाट पाहण्यात गेला. प्रत्येक गावाची हिसका देण्याची पद्धत वेगळी आहे. आम्ही परभणीचे लोकं वेळ न पाळून आपला हिसका दाखवतो.  त्याप्रमाणे आर बी डी नी तो खूप वेळा दाखवला. मला अगदी आपलं माणूस भेटल्याचे जाणवले. पुण्यात राहून मी ही आजकाल भेटण्याची दिलेली वेळ पाळण्याचा अतोनात प्रयत्न करतो. पण ३० वर्षं पुण्यात राहूनही माझ्यातला परभणीकर अजूनही जिवंत आहे, याचं मला खुप समाधान वाटलं. 

माझ्या मनात दोन गाड्यात बसून १० जणांनी जयंत कडे जावं असं होतं. पण नियती असा रंग दाखवते की आपण हतबल होतो. आम्ही चार जण तीन गाड्यात बसून गेलो. मी, संतोष, अतुल अन सगळ्यात तरुण सुकुमार राजेंद्र गानू. गानू सरांच्या एजिंग प्रोसेस चा बहुधा रिव्हर्स गियर पडला आहे. 

वरात पोहोचली. वराती मागून यजमान पोहोचले. नमस्कार चमत्कार, हातमिळवणी, गळाभेट यथामैत्री पार पडली. आणि मग गप्पा कुटायला सुरुवात झाली. रमा, संतोष, आर बी डी यांच्या कोपरखळ्या रंग भरू लागल्या. तोंडी लावायला जयंत चे वन लायनर्स पंचेस होतेच. स्वरूपा खर्डेघाशी प्रमाणेच इथेही सगळ्यावर करडी नजर ठेवून होती. ऋचा तिच्या मोगऱ्यासारखा आनंद प्रसवत राहिली. आर बी डी आणि जयंत यांनी लेखन या विषयावर मेलामेली केली त्याचं वाचन झालं. मी थक्क झालो. 

संतोष, आर बी डी देवरूखला जायचा प्लॅन बनवत होते. मला हे माहित नाही की ते कधी जमवतील. पण मला त्यांचा हेवा वाटला. सध्या मला असं कुठे जाण्याचं विचार करण्याचं स्वातंत्र्य ही नाही आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली.

जिने हा सगळा भेटीचा घाट घडवून आणली ती शिल्पा मात्र शांत होती. तिच्या मनात काय चालू होतं याचा काही थांगपत्ता लागत नव्हता. ती इनमिन चार पाच वाक्य बोलली असेल. गेली २५ वर्ष ती देशाबाहेर आहे. भारतात आल्यावर नातेवाईक आणि मित्र यांच्याबरोबर वेळ घालवून ते क्षण ती पदरात जमा करत होती जणू. बहुधा परत गेल्यावर वेळ मिळेल तसा ती त्या क्षणात डुंबत असावी. अर्थात हा माझा आपला अंदाज. 

रात्री उदरभरण झाल्यावर स्वरूपा ने साद दिली, विंदा. एखादं लहान मूल twinkle twinkle little star म्हणतं आणि मग पाहुणे टाळ्या वाजवतात अन ते पोर खुश होतं. माझं सध्या तसं झालं आहे. नुसती चावी मारायचा अवकाश की मी चालू होतो. नंदू ने मध्ये त्याचे काही कडक शेर ऐकवले. शिल्पाने माझ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला संदेश वाचून दाखवला. मला माझाच हेवा वाटला. त्यानंतर ही माझी काही थांबायची तयारी नव्हती. शेवटी कुणीतरी विषय बदलून मैफल संपली असं जाहीर केलं आणि माझ्या उत्साहावर पाणी फिरलं.

खरं तर मी हे काही लिहिणार नव्हतो. पण कुणीच काही लिहिलं नाही असं मला कळलं. संतोष ने आणलेली जांभळाची वाईन आणि क्षमा वहिनींनी केलेला स्वयंपाक माझ्या अंगात सळसळू लागला आणि मग आज आठवड्यानंतर हे लिहून एका कर्तव्यपूर्तीचं समाधान मला लाभतंय. अगदी खरं सांगायचं तर 'राजेश कविता छान म्हणतो" अशी माझी कुणीही पब्लिसिटी केली नाही हे ही खूप डाचत होतं. 

आज शांत झोप लागेल.  

शार्दुल तिथे फारच स्थितप्रज्ञ होता. त्याला आमच्या सगळ्याबद्दल काय वाटलं असेल हा विचार मला आजही भेडसावतो आहे. 


No comments:

Post a Comment