Monday, 27 June 2016

ब्रेक्झिट

इंग्लंड इयु मधून दूर होणार, या निर्णयाचा भारताच्या इकॉनॉमी वर किती दूरगामी परिणाम होतील याबद्दल मी काही भाष्य करावं अशी काही परिस्थिती नाही. म्हणजे त्या बद्दल काही ढेकळं करत नाही. मग युरो चढला तर काय, सोन्या चांदीचे भाव एल एम इ ठरवते याचा आपल्यावर काय फरक पडेल यावर हिरीरीने मतं मांडणाऱ्या पंडितांबद्दल मला अतीव आदर आहे. जी बी पी थोडा झोपला तर वेस्टविंड चे स्पेअर्स मला स्वस्त मिळतील आणि कस्टमर मला लागलीच उद्यापासून डिस्काउंट साठी फोन करतील या काळजीने फक्त मला ग्रासलं आहे. त्या पलीकडे मार्केट १००० पॉईंट ने का पडलं, आणि राजन साहेबांना स्टेटमेंट का द्यावं लागलं हे आपल्या छोटा असलेल्या मोठ्या मेंदूच्या पलीकडचं आहे.

ते बाकी काही असलं, तरी त्या सार्वमताच्या प्रक्रियेने मात्र मी चकित झालो आहे. मुळात असं मत अजमावण्याचं धाडस करणं आणि अतिशय छोट्या मार्जिन ने विरोधात मत गेल्यावर राष्ट्रप्रमुखाने राजीनामा देणं हे तिथली लोकशाही प्रगल्भ असण्याचे लक्षण नव्हे काय? मध्ये शशी थरूर यांचं लंडन मधील भाषण ऐकलं. सगळ्या गोर्यांच्या मध्ये उभं राहून थरूर साहेब इंग्लंड ने भारताला कसं लुटलं यावर धुलाई करत होते. आणि ते ब्रिटिश खुल्या मनाने त्या टीकेला टाळ्या वाजवून दाद देत होते.

आपल्या देशात राहून फक्त वेगळं राज्य मागणाऱ्या तेलंगण ला कशाला सामोरं जावं लागलं हा इतिहास अगदी ताजा आहे. अतिशय जायज अशा वेगळं विदर्भ मागणाऱ्या लोकांना कसं हिणवलं जातं, अस्मितेच्या नावाखाली त्यांच्या तोंडाला कशी पानं पुसली जातात हे आपण सोयीस्कर पणे विसरतो. काश्मीर ला भारतात राहायचं की नाही यावर सार्वमत घ्या असं चौकात उभं राहून म्हणायची कुणाची प्राज्ञा आहे ते सांगा.  ह्या देशात राहणाऱ्या लोकांनी त्या इंग्लंडच्या एकूणच प्रक्रियेवर भाष्य करणे हेच मुळात गमतीशीर आहे.

यावर असं म्हंटल्यावर माझा एक दोस्त म्हणाला "नंतरच्या प्रतिक्रियेवरून वाटत नाही की ती लोकशाही प्रगल्भ आहे" मी त्याला म्हणालो "हा आपला प्रॉब्लेम आहे. आपण क्रियेपेक्षा प्रतिक्रियेवर जास्त लक्ष देतो"

असो. गोर्यांचा माझ्यावर सत्तर वर्षानंतर ही प्रभाव आहे असं म्हणा पण भौगोलिक दृष्टया ब्रिटन आता काही भारी उरलं नसेल पण लोकशाहीच्या दृष्टीने मात्र ते ग्रेट ब्रिटन आहे असं आपलं मला वाटतं.

No comments:

Post a Comment