काही काही लोकांचा मला लहानपणापासूनच दरारा जाणवतो. पोलीस एक आणि दुसरे लोकं म्हणजे रेल्वे चे टी सी. अगदी आता आता पर्यंत टी सी रेल्वे त तिकीट चेक करायला आला की ते चेक करून मला परत देईपर्यंत माझ्या हृदयाची धडधड वाढलेली असायची.
तसं बघायला गेलं तर निवांत लोकं असतात, ही टी सी मंडळी. बरं पोलिसांसारखा राकट भाव ही नसतो त्यांच्या चेहऱ्यावर. तरीहि त्यांच्याबद्दल माझ्या मनात दहशत का होती हे एक न सुटलेलं कोडं आहे.
त्यांच्या प्रोफेशन बद्दल आकर्षण ही आहे. कदाचित ते घालत असलेला कोट अन टाय यामुळे ते निर्माण झालेलं असावं. पूर्वी तर ते टोपी ही घालायचे. काही टी सी जरी कडक बिडक कोट घालत असले तरी बहुतांश जरा जुनाट च घालतात. समाजातल्या सर्व वर्गाशी संबंध येणाऱ्या या लोकांच्या गणवेशात कोट अन टाय चा समावेश कुणी आणि का केला असावा हा प्रश्न माझ्या मनात बऱ्याचदा येऊन गेला आहे. आजकाल दिसत नाही, पण पूर्वी यांची नियमानुसार आणि टॉयलेट च्या बाजूला होणारी वसुली बरीच असायची. त्यामुळे पैशांची देवाणघेवाण होताना ते कोटाच्या खिशातून बऱ्याच नोटा काढायचे. ते सुद्धा आकर्षणाचे कारण असावे.
त्यांची बाकीची आयुधं अगदी कित्येक वर्ष जशीच्या तशी आहेत. एक ब्रिफकेस अन हातात तिकिटाच्या लिस्ट चं भेंडोळं. पूर्वीच्या टंक सदृश लोखंडी पेट्यांची जागा आता व्ही आय पी ने घेतली हाच तो काय फरक. त्या ब्रिफकेस मध्ये काय असेल याचा मी आता अंदाज बांधू शकत असलो तरी लहानपणी बरीच उत्सुकता असायची. बहुधा त्यात नोटाच असाव्यात असं वाटायचं.
दिवसा किंवा रात्री कधीही तिकीट चेक करायला आले तर टी सी च्या डोळ्यावर मी कधीही झोप बघितली नाही आहे. ही किमया ते कशी साधू शकतात हे एक आश्चर्यच आहे. ते स्वतः ला ठेवतात ही व्यवस्थित. घोटलेली दाढी, व्यवस्थित भांग, अगदी शुभ्र नसले तरी बऱ्यापैकी पांढरी शर्ट पँट, वर उल्लेखलेला कोट, त्यावर एकीकडे त्यांचं नाव, तर दुसरीकडे भारतीय रेल्वे चा शिक्का कोरलेला बिल्ला असा वेष घातलेली एक कुटुंब वत्सल व्यक्ती समोर येते. आपल्याला असलेल्या अधिकाराचा अत्यंत सुयोग्य वापर करत असल्यामुळे त्यांच्या बद्दल आदर मिश्रित भीती वाटते. आता पर्यंत मी हजारो रेल्वे प्रवास केले आहेत. पण या प्रवासात एका ही टीसी शी कडक्याचं तर सोडाच पण आवाज चढवून भांडण पाहिल्याचं माझ्या लक्षात नाही आहे. बरं इतके लोकं डब्यात असले तरी त्यांच्याशी वायफळ बडबड करताना ही मी त्यांना कधी बघितलं नाही आहे. एखाद्या सुंदर तरुणींचे किंवा माझ्यासारख्या अजागळ माणसाचं तिकीट बघताना एकच प्रकारचा स्थितप्रज्ञ भाव तोंडावर ठेवणे हे योगी माणसाचं लक्षण आहे. आपण बरं आणि आपलं काम बरं असा त्यांचा खाक्या असतो.
ही लोकं कधी त्यांच्या कामाबद्दल फारशा कंप्लेंट करताना ही दिसत नाहीत. कधी संपावर गेल्याचं आठवत नाही. डब्यात त्यांचा वावर अगदी उत्फुल दिसत नसला तरी त्यांच्या चेहऱ्यावर वैफल्य ही दिसत नाही. अत्यंत निर्विकारपणे ते काम करतात अन डब्यातून निघून ही जातात.
त्यांच्या कामाच्या वेळा हा माझा आजही कुतूहलाचा विषय आहे. ते डब्यात शिरतात अन साधारण चार पाच तासाने कुठल्याशा स्टेशन वर उतरतात. त्यांचं घर कुठल्या गावाला असतं, जिथे चढतात की जिथे उतरतात तिथे, की अजून भलत्याच गावाला, उतरल्यावर ते राहतात कुठे, जेवतात कुठे, ते जर इतके फिरतात तर त्यांचे घरचे लोकं त्यांची काळजी करतात का, आपली पोरं प्रवासातून घरी आलो की चिकटतात, त्यांची ही तसंच करत असतील का, डब्यात तिकीट चेक केल्यावर अन चार्ट वर अतिशय बारीक अक्षरात काही लिहिल्यावर ही लोकं पुढचं स्टेशन येईपर्यंत गायब असतात, मग तेव्हा ते काय करतात, ते नेहमीच रेल्वे च्या पँट्री चं खातात का, त्यांचे कपडे पांढरे कसे राहतात, शूज नेहमीच पॉलिश केलेले कसे असतात असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात कायम रुंजी घालतात.
खरं तर त्या चार तासाच्या प्रवासासाठी टीसी त्या दोन किंवा तीन डब्यांचा अनभिषिक्त सम्राट च असतो. पण तरीही त्यांच्या वागणुकीत तो तोरा नसतो. अगदी आऊट ऑफ वे जाऊन त्यांना फारसे निर्णय घेता येत नसावेत पण मी बऱ्याच टीसी ना एखाद्या कुटुंबाला, अडलेल्याला जमेल तशी मदत करताना कैक वार बघितलं आहे.
ज्या कुणी या लोकांचा गणवेश, कामाच्या वेळा, जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ठरवल्या असतील तो प्रोफेसर ग्रेट च म्हंटला पाहिजे.
वर्षानुवर्षे अत्यंत निगर्वीपणे काम करणाऱ्या या टीसी जमातीला प्रेमभरा नमस्कार.
(खरं तर मानाचा मुजरा वगैरे लिहिणार होतो, पण टीसी मुजरा केल्यावर येऊन आपले दोन्ही हात पकडतील आणि म्हणतील "अहो, मुजरा कशाला, आपला नमस्कार बराय")
No comments:
Post a Comment