Thursday, 21 July 2016

आपलं घर

आपलं घर........खुपदा गेलो आहे मी तिथे. आता सवय झाली. भावूक वगैरे होत नाही. तिथल्या मुलामुलींची निरागसता, आजी आजोबांची व्याकुळता, तिथली नि:शब्द शांतता हे पाहून डोळ्यातील पाणी थोपवण्याची गरज पडत नाही. फळणीकर तिथल्या म्हाताऱ्या आजीचा सुरकुतलेला गाल ओढून "माझी माय गं तू" हे म्हणतात तेव्हा मी तिथल्या ताई सारखा फसकन हसतो. आधी सारखा आवंढा गिळत नाही. तिथे पोहोचलो की पोरं पोरी एकसुरात "नमस्कार काका" तेव्हा सराईत पणे हात दाखवतो. जेवायला बसलो की मोठमोठ्याने "वदन कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे" म्हणताना आता अवघडल्यासारखं वाटत नाही.

फळणीकर म्हणाले "आमच्या मुलांशी संवाद साधा. बाहेरच्या जगात काय चालू आहे त्याचा अंदाज येऊ द्या. तुम्ही फिरता इतके". त्या बिचार्यांना काय माहित की मलाच कळत नाही अजून पाण्याची खोली किती आहे ते. अजूनही दोन्ही पाय बुडवून बघतो मी आणि मग गटांगळ्या खातो. पण माझ्या बद्दलच्या गैरसमजाला तडा नव्हता जाऊ द्यायचा. मी पटकन हो म्हंटलं.

या फोटोतली मुलं मुली बघताय? कुणाला आय पी एस, तर कुणाला कॉम्पुटर इंजिनियर, कुणी आर्किटेकट, तर कुणी वकील बनू इच्छितं. दोन मुलींना एअर होस्टेस व्हायचं आणि ज्याच्या खांद्यावर माझा हात आहे त्याला डॉक्टर व्हायचं आहे. त्याला मी विचारलं "हृदयाचा डॉक्टर होणार का?" तर म्हणाला "नाही, मला मेंदूचा डॉक्टर व्हायचंय?" मी त्याला सांगितलं "तू हो बाबा. तसंही मेंदूवरच्या इलाजाची बऱ्याच जणांना गरज आहे" हं, आणि पोरगा आठवीला आहे. फळणीकरांनी या मुलामुलींना उभं केलं हे कर्तृत्व वादातीत आहे पण ही जगण्याची उमेद निर्माण केली आहे ती अद्भुत आहे.

सव्वा तास बोललो. इतक्या लहान मुलांशी संवाद पहिल्यांदा साधला. अवघड असतं ते. किती convey करू शकलो देवच जाणे. शाळेतल्या शिक्षक मंडळींसमोर मी मनोमन नतमस्तक झालो.

त्यांच्या बरोबर जेवण करून निघालो. मुलं परत किलबिल करत म्हणाली "काका, परत या". मी ही हसत त्यांचा निरोप घेतला. आता गलबलून येत नाही, कारण मी परत तिथे लवकर जाणार असतो.

रविवार नखशिखांत सत्कारणी लागतो. 

No comments:

Post a Comment