Sunday 31 July 2016

व्हिजन

नुकतंच आम्ही कंपनीचं एक्स्पान्शन केलं. जवळपास ३५०० स्क्वे. फूट ने कंपनी वाढवली. तीन शेड रेंट वर घेतल्या. पण हे जेव्हा मी ठरवत होतो तेव्हा माझ्या मनाची तयारी तीन शेड पैकी फक्त एका शेडची होती. ऑफिस मध्ये जागा खूप कमी झाली होती अन पोरं एकमेकांना धक्के मारत चालत होती. आणि एक मला छोटी कॉन्फरन्स रम बनवायची होती. मी आपलं एक शेड घेऊन ते कसं बसवायचं याचा विचार करत होतो.

अमेरिकन जेफ आला होता. सगळं ऐकल्यावर म्हणाला, तू कमीतकमी दोन शेड घे, जर तीन घ्यायला भीती वाटत असेल तर. मी त्याला एक शेड कशी आपले एक्स्पेनसेस कमी ठेवेल वगैरे पटवला. जाताना क्लोजिंग मिटींगला म्हणाला, दोन शेड घे. तुला लागतील. मी हो बोललो. शेड मालक एक दिवशी आला अन म्हणाला "आता एक शेड उरली ती कुणाला देत शोधू. तुम्हीच घ्या" मी जेफला फोन करून विचारलं तर म्हणाला "I would love to have all three of them. It is good for future. I envision that you will occupy all of them"

आज आमची कंपनी दृष्ट काढण्याइतकी चांगली झाली आहे.

सांगायचा मुद्दा हा की ही जी व्हिजन, दूरदृष्टी असणं हे फार गरजेचं आहे. आज खर्च करण्याची क्षमता आणि भविष्य डोळ्यासमोर ठेवून काही प्लॅन करणे ही तारेवरची कसरत असते खरी. पण एकदा जमली की बिझिनेस मधील आयुष्याचा बगीचा बनून जातो. (खरं तर पहिल्या क्वार्टर मध्ये आमची लागली आहे. म्हणजे माणसं वाढवली, एरिया वाढला आणि सेल गंडला. पण हा जेफ म्हणतोय की मी सांगतोय, it will pay off. )

व्हिजनरी लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांच्या कल्पनाशक्तीतून जेव्हा ते काही प्रत्यक्षात आणतात त्याचे परिणाम दूरगामी असतात. पन्नास वर्षे, कदाचित शंभर वर्षानंतर सुद्धा आपण हे कसं सुचलं असेल हा विचार करून अचंबित होतो.

आजचं सी एस टी (जुनं व्ही टी) स्टेशन तुम्ही बहुतांश लोकांनी अनुभवलं असेलच. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी बनवलेल्या या वास्तूत आज लोकांची इतकी गर्दी वाढली तरी त्याला ती सामावून घेते. माणूस गुदमरत नाही. याउलट पन्नास वर्षांपूर्वी बांधलेल्या चर्चगेट ला जा. कधी एकदा तिथून बाहेर पडतो असं होतं.

सुमंत मूळगावकारांनी पिंपरीचा टेल्को चा प्लांट बनवला. साठच्या दशकात. प्रशस्त. चार पदरी रस्ते आणि बिल्डिंग पण भव्य. इथल्या ऑफिस ब्लॉक मध्ये अजिबात ए सी लागत नाहीत. या उलट १९९६ साली बांधलेला पॅसेंजर कार चा प्लांट बघा. व्हिजन मध्ये फरक म्हणजे काय ते जाणवतं.

चंदिगढ, मुंबई चा फोर्ट आणि फाउंटन एरिया, साऊथ दिल्ली हा भाग बघितला असेलच. आज इतक्या वर्षानंतर आपली ओळख टिकवून आहे.

भारतातील आय आय टी वा आय आय एम, स्पेस प्रोग्रॅम, काही प्रदेशात मोक्याच्या जागी बांधलेली धरणं हे दूरदृष्टी असण्याची काही उदाहरणं. (अर्थात आज ही आपण पाण्याच्या उपलब्धतेबद्दल काळजी करतो हे त्या दूरदृष्टीची व्याप्ती मोठी नसल्याचं एक उदाहरण)

माझ्या कंपनीच्या बाजूला नांदेड सिटी बांधली जात आहे. सध्या जवळपास २० ते २५% कन्स्ट्रक्शन झालं आहे. मला आतलं इन्फ्रास्ट्रक्चर भारी वगैरे वाटतं. परवा पार्टनर मात्र या विषयावर बोलताना म्हणाला "पाच वर्षांनी जेव्हा ही सिटी पूर्ण भरेल तेव्हा राडा होणार आहे. हे जे काय इन्फ्रा स्ट्रक्चर बनवलं आहे हे त्यावेळेला अपूर्ण असेल. पुढे जाऊन तो हे ही म्हणाला "अर्थात अकरा माजली बिल्डिंग मध्ये वरच्या मजल्यावर कुणी गचकला तर त्याची डेड बॉडी कशी आणायची याची सोय न करणाऱ्या किंवा बिल्डिंगमध्ये पार्क होणाऱ्या वाहनांसाठी आजही शहराच्या रस्त्याकडे आशाळभूत नजरेने बघणाऱ्या लोकांकडून तू काही फार अपेक्षा ठेवू नकोस"

सिक्रेट नावाचं पुस्तक आहे. कल्पनाशक्तीला ताण देऊन जेव्हा आपण भविष्यात डोकावून बघणं ही एक कला आहे. या पुस्तकात हे फार वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. आजपासून पाच किंवा दहा वर्षांनी मी असा असेल हे चित्र जो रंगवू शकतो ते प्रत्यक्षात येतं असं त्यांनी त्याच्यात लिहिलं आहे. भले त्या चित्रावर आज तुमचे जवळचे लोकं हसतील किंवा चिडचिड करतील. पण तुम्ही त्याने खचून न जाता ते चित्र पुन्हा रंगवा, चित्र फिकट झाले असेल तर पुन्हा गडद करा. ते मूर्त स्वरूपात येतं. असं मी नाही म्हणत, त्या पुस्तकात लिहिलं आहे

एकंदरीतच दूर दृष्टीची सृष्टी बसवणं अवघड असतं हे खरं!

(पुस्तकाचा दाखला दिला की तुम्ही माझ्यावर हसणार नाहीत किंवा चिडचिड करणार नाहीत 😊😊)

No comments:

Post a Comment