Thursday 21 July 2016

लायर्स प्रॉस्पर

Liars prosper

दोनच शब्दांची पोस्ट पण डोकं घुसळवून गेली. अर्थात पोस्ट शिवा ची होती. त्याचं असं आहे, थोडक्यात खूप काही सांगून जातो.

पण ही संपन्नता आपण कशात मोजतो यावर सगळं अवलंबून आहे. ती पैशात च मोजणार असू तर त्यात नक्कीच तथ्य आहे. पण prosperity ही नेहमी पैशात च मोजली जात नाही हे ही तितकं च खरं आहे. दोन्ही वाक्यातला च फार महत्वाचा आहे.

आता हेच बघा ना, अंबानी आणि टाटा. दोन अत्यंत भारदस्त नावं. भौतिक संपत्तीचा विचार करता अंबानी कित्येक मैल टाटांच्या पुढे. पण संपन्नता जेव्हा नैतिकतेच्या तराजूत तोलली जाते तेव्हा मात्र टाटा कुठं आहेत हे सांगायला कुणा बिझिनेस पंडितांची गरज नाही आहे.

जिम कोलिन्स नावाच्या लेखकाचं पुस्तक नुकतंच वाचलं "built to last". थोडं किचकट आहे, पण ज्यांना आपला बिझिनेस १०० वर्षं चालावा असं वाटत असेल त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं. ज्यांची झेप "आपल्या नंतर कोण बघणार हा बिझिनेस?" असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी या पुस्तकाच्या वाटेला जाऊ नये.

तुमच्या स्वतः च्या core values (मूळ सिद्धांत) आणि core purpose (मूळ उद्देश) बिझिनेस करताना काय आहेत, हे शोधायला हे पुस्तक मदत करते. आणि हे सिद्धांत पैशाच्या पलीकडे आहेत. अत्यंत अवघड असा exercise आहे. आपलं असणं हे कशासाठी आहे हे शोधणं.

तुम्ही कधी आर्मी च्या कुठल्या ऑफिस ला गेला आहात का? तिथल्या कोअर वॅल्यूज वाचाच. अंगावर काटा उभा राहतो. आर्मीचा जवान देशावर आपली जान न्योछावर करायला कसा तयार होतो हे ते सिद्धांत वाचून कळतं.

आणि प्रत्यक्ष जीवनातही हे मूळ सिद्धांत आणि मूळ उद्देश असेच असावेत की साला जीव गेला तरी बेहत्तर पण मी माझ्या वॅल्यूज पासून ढळणार नाही. आर्मी आणि आपल्यात हाच फरक आहे की बिझिनेस डेथ बेड वर असेल तर तुम्हाला कन्सेशन आहे.

काही जिवंत उदाहरणं आहेत. आपलं घर चे विजय फळणीकर, स्नेहालय चे गिरीश कुलकर्णी, आणि फार दूर कशाला फेबु वर ऍक्टिव्ह असणाऱ्या प्रथितयश लेखिका कविता महाजन यांचं जीवन म्हणजे संपन्नता काय आहे याचा वस्तुपाठ आहे. ही लोकं आपल्या जगण्यातून त्यांचा उद्देश आणि ते कुठल्या सिद्धांतावर, याचा वेळोवेळी प्रत्यय देत असतात. भौतिक संपन्नतेच्या निकषावर ही मंडळी 'फोर्ब्स' च्या लिस्ट वर आसपास ही पोहोचणार नाहीत, पण माझ्या लेखी ह्यांच्या सारखी जमात जगात अतिशय दुर्मिळ आहे हे नि:संशय.

ज्यांचं असणं हे बाह्यरूपानं तोललं जातं, पण त्यांचं अंतरंग काही वॅल्युज जपत असतं, अशांना मात्र त्या शोधाव्या लागतात. आणि त्या एकदा सापडल्या की जगणं हा एक सोहळा असतो. एखाद्या ग्लायडर ला ते भलं मोठं शीड घेऊन धावावं लागतं तशा त्या वॅल्युज मग खांद्यावर वाहाव्या लागतात आणि एकदा की मग कड्यावरून दरीत झेप घेतली की आपण विनासायास विहार करत राहतो.

संपन्नता ह्याला म्हणतात राजा!

No comments:

Post a Comment