Wednesday, 6 July 2016

कॉपी पेस्ट, शेयर आणि मी.

कॉपी पेस्ट, शेयर आणि मी.

(इडली, ऑर्किड आणि मी च्या चालीवर)

मी इथे अधून मधून लिहितो. त्याचा दर्जा वगैरे काय असतो हा वादाचा मुद्दा आहे. माझा एक कॉलेज चा मित्र म्हणतो, "तू काय लिहितोस ते काही फार भारी नाही आहे. समोर आलेले अनुभव शब्दबद्ध करतोस. लिखाण म्हणजे, जे तुम्ही बघत नाही त्या पलीकडे जाऊन लिहिणं. तिथे कल्पकता दिसते. त्यामुळे तू काही फार हुरळून जाऊ नको" असो. तो काहीही म्हणत असला तरी इथे मला वेगळ्या प्रतिक्रिया ऐकू येतात. इतकंच नाही तर विविध लोकं ते शेयर करतात. यात वेगवेगळ्या वयोगटातले लोकं आले. माझ्यापेक्षा वयाने लहान, मोठे आणि समवयीन.  गंमत अशी की काही जण शेयर करताना माझी परवानगी मागतात. तिथे मात्र मी पाणी पाणी होतो.

मला सगळ्यांना हेच सांगणं आहे की शेयर करताना माझी परवानगी ची गरज नाही आहे. तुम्ही ते खुशाल शेयर करू शकता.

काय आहे, हा प्लॅटफॉर्म असा आहे की जिथे शेयर करू नका असा अट्टहास ठेवण्यात काही मतलब नाही. शेयर करताना माझं नाव लिहिलंत तर आनंद आहे. ते नाही लिहिलं तरी मला स्वतः ला काही फरक पडत नाही. अगदी थोडक्यात सांगतो की जो पर्यंत माझ्या शब्दांचा वापर करून कुणी पैसे कमवत नाही तो पर्यँत हे या इंटरनेट च्या नभंगणात कुठेही फिरलं तरी माझी काही हरकत नाही. पैसे जरी कमावले तरी आकांडतांडव करण्या पलीकडे मी काही करू शकत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे आणि तो करण्याचा हक्क बजावेल हे नक्की. अर्थात हे सगळं इतकं आत्मविश्वासाने लिहिण्याचं कारण हे आहे की त्या लिहिण्याला व्हॅल्यू , काही लोकं म्हणतात तशी, असेलही कदाचित, पण त्याला किंमत नाही याची मला मनोमन कल्पना आहे.

याचं कारण आहे. माझं फुटकळ लिहिणं फुकट लोकांपर्यंत पोहोचेल अशी या फेसबुकची किमया आहे. अन ते तसं पोहचावं हा माझा निर्णय आहे. एका लाइक ला पाच रुपये पडतील आणि ते गोळा करण्यामागे कितीही उदात्त हेतू लिहिला तरी माझ्या पोस्टवर लाइक करणे तर दूर, मित्र यादीत किती जण ठेवतील हा प्रश्न आहे. त्यामुळे फेसबुक अन व्हाट्स ऍप वर लिहून जर नंतर माझं नाव काढून कुणी शेयर केलं तर आरडाओरड करण्यात काही मजा नाही असं मला वाटतं. मायक्रोसॉफ्ट ने सुरुवातीला स्वतः पायरेटेड सॉफ्टवेयर मार्केट मध्ये वाटले अन नंतर त्यावर बोंब मारण्यासारखा प्रकार आहे तो.

ज्यांच्या विचारांची, लिखाणाची लोकं किंमत करतात ते ती कशी वाजवून घेतात हे मी पाहतो. काही चांगलं ऐकायला मिळावं यासाठी मी २००० रुपये तासाला मोजले आहेत. बाकीच्यांचं काय घ्या, फार काही तारे न तोडता सुद्धा शिरपूरच्या प्राचार्यांनी पाकीट दिलंच की मला.  फेसबुकच्या मित्रांनी सुद्धा पुस्तकं, काव्य संग्रह प्रकशित केलीच आहेत. 

एकदा एका कॉन्फरन्स मध्ये एक उद्योजक आपण ट्रेन केलेली लोकं, शिकून झालं की कसं दुसरीकडे जातात याची कैफियत मांडत होता. वक्ता की जो एका जापनिज कंपनीचा एम डी होता, म्हणाला "इतकी पण काळजी करू नका. तुम्ही ट्रेन केलेला माणूस तुमच्या सेगमेंट मध्ये, मग दुसऱ्या इंडस्ट्रीत का असेना, काम करतोय यात समाधान माना. इंडस्ट्री प्रति, समाजाप्रती तुमची काही लायबेलिटी आहे, ती पूर्ण केली असं समजा". त्याच धर्तीवर माझे शब्द स्वतः चे म्हणून कुणी खपवले तर गालातल्या गालात हसून आनंद घेण्यात काय हरकत आहे.

अर्थात हे माझं स्वतः चं मत आहे. बाकी अनेक विचाराप्रमाणे त्याला ही काही फारशी किंमत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. ☺☺

No comments:

Post a Comment