Sunday, 19 June 2016

deactivate

नाही म्हणजे आता येणं भाग पडलं. काही फोन्स झाले, मेसेजेस आले. काहींनी काळजीपूर्वक चौकशी केली. काही मित्रांनी "अरे आहेस, की गेलास?" अशी प्रेमळ विचारणा ही केली. कुणी आम्हाला अन्फ्रेंड किंवा ब्लॉक केलं का, असं  दरडावून विचारलं. पुन्हा एकदा सांगतो, मी कधीही आता पर्यंत वैयक्तिक रित्या त्रास दिल्याशिवाय अन्फ्रेंड केलं नाही आहे. ब्लॉक तर फार दूरची गोष्ट. उलट आता वॉल वर आलो तर मित्र संख्या १५० एक जणांनी कमी झाल्यासारखी वाटते. अकौंट deactivate असताना मित्रांनी उडवलं असं दिसतंय. रोज दुधाचा रतीब टाकणाऱ्या गवळ्याने पंधरा दिवस दुध टाकले नाही की आपण त्याला बंद करतो. अगदी तसेच.

फेबु वर नसताना नेहमीच्या मंडळींशी भेटणं चालूच आहे. कालच मुकुंद,  दोन मेधा आणि सुबोध बरोबर जेवलो. अमेरिकेहून शिल्पा आली, तेव्हाही जयंतच्या घरी स्नेह संमेलन पार पडलं. फोन होतात. गणेश आहे, विनय गुप्ते आहेत आणि बरेच.

तर मित्रांनो, सुर्हुदानो, मी आहे बरं. अगदी व्यवस्थित आणि ठणठणीत. बरं मग deactivate का केलं अकौंट?. तर अगदी खरं सांगायचं तर काही कारणं आहेत. इंडस्ट्री च्या बऱ्याच लोकांना माहित आहे की दोन वर्ष रेसेशन चालू आहे. अच्छे दिन दृष्टीक्षेपात दिसत आहेत पण त्याला पकडावं तर मृगजळासारखे ते पुढे धावत आहेत. पावसाप्रमाणेच ते ही चकवा देत आहेत. ३१ मार्च पर्यंत एकदम झकास दिवस गेले. कंपनीत लोकं वाढवले, तिचं एक्स्पान्शन ही झालं, दिल्लीत माणूस  जॉईन झाला आणि अचानक सेल्स डाऊन झाला.

शेवटी आपण कितीही तारे तोडले तरी काही परफोर्मंस मेझर्स असतात हो. आणि कंपनीचा सेल हा त्यापैकी एक. तिथे गोता खाल्ला की काही सुधरत नाही. म्हणजे इथे येउन चार दीड शहाणपणाच्या गोष्टी पकवायच्या असतील तर धंदा जागेवर पाहिजे. तिकडे बेसिक मध्ये राडा झाला की इथल्या माझ्या पोपटपंचीला काही मतलब राहत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अभियंता ही पदवी मी पांघरून झोपतो आणि तिथेच  मला उबदार वाटतं.

त्यामुळे अजून एक दोन महिने तरी येणं होणार नाही अशी चिन्ह आहेत. शिल्पा केळकर नी विचारलं की, तुला लॉग आउट होऊन  जमत नाही का? तर उत्तर आहे, "नाही". Deactivate झालं की सायकोलॉजिकली मला असं माहित असतं की मी इथे नाही आहे. अगदी लॉग इन आणि activate च्या प्रोसेस मध्ये काहीही फरक नसला तरी.

ब्लॉग्ज  ही कमी लिहिले. अगदी दोन चार मस्त इन्स्पिरेशनल घटना घडल्या आहेत. अगदी तुमच्या माझ्या सारख्या लोकांची सक्सेस स्टोरी आहे. पण त्याही लिहायचा धीर होत नाही आहे.

काल चार जणांचे फोन आले. आणि आज एका फेसबुक फ्रेंडशी लांबलचक कॉल झाला. त्यामुळे विचार केला, माझी ख्यालीखुशाली तुम्हाला सांगावी आणि तुम्हा सगळ्यांचं दोन दिवसासाठी का होईना दर्शन घ्यावं. म्हणून हा पोस्ट प्रपंच.

बाकी निवांत



No comments:

Post a Comment